दिल्लीचे परिवहन मंत्री कैशाल गहलोत यांनी रविवारी स्विच दिल्ली अभियानाच्या पहिल्या सप्ताहाची सुरुवात केली. यावेळी त्यांनी काही ट्विट्स केले. त्यात त्यांनी म्हटलं की, तुमची स्कूटर इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये स्विच केलीत तर पेट्रोल स्कूटरच्या तुलनेत तुम्ही दरवर्षी २२,००० रुपयांची बचत करु शकता. तर पेट्रोल बाईकच्या तुलनेत दरवर्षी २०,००० हजार रुपयांची बचत करु शकता. गहलोत यांनी अजून एक ट्विट केलं आहे, त्यात त्यांनी म्हटलंय की, टू-व्हीलर सेगमेंटसह आम्ही ‘स्विच दिल्ली अभियाना’ची सुरुवात करत आहोत. ग्राहकांना होणाऱ्या आर्थिक फायद्यां व्यतिरिक्त महत्त्वपूर्ण पर्यावरणीय लाभांचादेखल यामध्ये समावेश आहे. पेट्रोलवर चालणाऱ्या एका दुचाकी वाहनाच्या तुलनेत इलेक्ट्रिक टू-व्हीलर सरासरी १.९८ टन कमी कार्बन उत्सर्जन करेल. ११ झाडं लावल्यानंतरच हे शक्य होतं. याचाच अर्थ तुम्ही एक इलेक्ट्रिक स्कूटर वापरत असाल तर ११ झाडं लावल्यानंतर पर्यावरणाचा जितका फायदा होतो, तितकी पर्यावरणाची मदत तुम्ही करु शकाल.
दिल्ली सरकारने देशातील सर्वात मोठ्या इलेक्ट्रिक व्हेइकल चार्जिंगसाठीचं निविदा काढल्या आहेत. ऊर्जा मंत्री सत्येंद्र जैन यांनी एका पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की, दिल्ली सरकारकडून देशातील सर्वात मोठ्या ईव्ही चार्जिंगसाठीचं निविदा काढण्यात आले आहे. याद्वारे दिल्लीत १०० ठिकाणी तब्बल ५०० चार्जर पॉईंट उभारले जाणार आहेत. त्यासाठी नाममात्र शुल्क भरावं लागणार आहे. चार्जिंगसाठी ४ किंवा ५ रुपये प्रति युनिट शुल्क आकारलं जाईल.
प्रदूषण आणि पेट्रोल, डिझेल यांच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढत चालला आहे. त्यामुळे २०२१ मध्ये अनेक मोठ्या कार कंपन्या इलेक्ट्रिक व्हेइकल लाँच करण्याच्या तयारीत आहेत. पूर्वी इलेक्ट्रिक कार्सच्या बजेटमुळे लोक चिंतेत असायचे, परंतु आता तसे चित्र राहिले नाही. कार कंपन्या कमीत कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त फिचर्स देणाऱ्या इलेक्ट्रिक कार्स आणि इलेक्ट्रिक स्कूटर्स लाँच करत आहेत. तसेच यापूर्वीदेखील देशात काही इलेक्ट्रिक वाहनं लाँच झाली आहेत. दरम्यान, जास्तीत जास्त नागरिकांनी इलेक्ट्रिक वाहनं, प्रामुख्याने ईलेक्ट्रिक टू-व्हिलर वापराव्यात, यासाठी दिल्ली सरकारने पुढाकार घेतला आहे.
दोन चाकी वाहनाप्रमाणे चारचाकी वाहन कंपन्यांनीही यामध्ये उडी घेतली आहे. MG Motor ने त्यांची नवीन अपग्रेडेड मिड साईज एसयूवी MG ZS EV भारतात लाँच करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने ८ फेब्रुवारीला याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. कंपनीने म्हटलं आहे की, अपग्रेडेड MG ZS EV भारतीय बाजारात 8 फेब्रुवारी रोजी लाँच केली जाणार आहे. कंपनीने नवीन MG ZS EV या कारबात सध्या कोणतीही माहिती दिलेली नाही. परंतु असं म्हटलं जातंय की, MG ZS EV च्या नवीन वर्जनमध्ये कारच्या इंटीरियर आणि इक्स्टीरीअर फीचर्समध्ये बदल केला जाऊ शकतो. कंपनीने दावा केला आहे की, ही कार एकदा चार्ज केल्यानंतर जवळपास ३४० किलोमीटरपर्यंत धावेल.