भारतात प्रत्येक प्रांतात विविध तऱ्हेचे पाककलेचे आविष्कार पहायला मिळतात. प्रांत बदलला कि त्यानुसार तिथल्या सर्वच पद्धती बदलत जातात. अगदी राहणीमानापासून ते जेवणापर्यंत सर्वच. शेवटी प्रत्येक प्रांताने स्वत:ची अशी आगळीवेगळी शैली निर्माण केली आहे. शाकाहारी व मांसाहारी या दोन्ही प्रकारचे पदार्थ भारतातील प्रत्येक प्रांतात चवीने चाखले जातात. महाराष्ट्रात सुद्धा कोकण, देश, विदर्भ, मराठवाडा इत्यादि भागांप्रमाणे वेगळ्या जीवनशैली आणि वेगवेगळे पदार्थ पहायला मिळतात. प्रत्येक भागात वापरले जाणारे विशिष्ट जिन्नस, तिखट-गोड चवींबद्दलची आवड निवड यातील बदल याचा त्या भागातील पाककलेवर परिणाम झालेला आहे.
अग्नी किंवा उष्णतेचा वापर करून अन्न हे एकतर घरी शिजविल्या जाते अथवा, हॉटेल किंवा रेस्टॉरंट मध्ये स्वयंपाक करणे ही क्रिया आपल्यात रूढ आहे. शेतीचा व्यापक प्रसार, वाणिज्य व व्यापार तसेच विभिन्न प्रांतात असलेल्या संस्कृतींमधील दळणवळण याद्वारे स्वयंपाक करणाऱ्यांना अनेक पदार्थांचा शोध लगत गेला. नविन शोध तसेच तंत्रज्ञानाचा विस्तार, स्वयंपाकासाठी लागणारी विविध प्रकारची, आकारची भांडी, स्वयंपाकाची अत्याधुनिक नवनविन साधने इत्यादी गोष्टींनी यात भर पडत गेली. खाद्यपदार्थ तयार करण्याचा कालावधी कमी होत गेला. काही स्वयंपाकी तर प्रगत वैज्ञानिक तंत्रज्ञानाद्वारे खाण्यासाठी देण्यात आलेल्या थाळीची लज्जत कित्येक पट वाढविताना दिसतात. कमी वेळामध्ये चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ बनविण्याकडे सगळ्यांचा कल दिसण्यात येतो आहे.
जगभर स्वयंपाकाचे घटक व पद्धतींमध्ये अनेकदा बदलत असतात. सध्या मोकळ्या जागेत ग्रुपने एकत्र येऊन लाइव्ह जेवण बनविणे, त्यासाठी कोळशाची भट्टी म्हणजेच बार्बिक्यू म्हणजेच खुल्या अग्नीचा वापर करुन जाळीवर भाजणे, वेगवेगळ्या भट्ट्यांचा वापर, वाफेचा वापर, सौर ऊर्जेचा वापर इत्यादी प्रकारांचा ट्रेंड आहे. यात वेगवेगळे पर्यावरणीय, आर्थिक, सांस्कृतिक परंपरा व पद्धतींचा वापर होतो. स्वयंपाक हा तो करणाऱ्याच्या कुशलतेवर व प्रकारावर अवलंबुन असतो तसेच त्या व्यक्तिला मिळालेल्या त्याच्या शिक्षणानुसार. व्यक्तिनुसार व प्रांतानुसार त्यात बदल घडतात. रेस्टॉरंट्समध्ये व्यावसायिक स्वयंपाकी व शेफ यांच्या द्वारे पाककला केली जाते.
त्याचप्रमाणे हल्ली चुलीवरील जेवणाला सुद्धा मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. मोठ्या प्रमाणात लागलेले बोर्ड्स हॉटेल, रेस्टॉरंटच्या बाहेर दिसतात. सध्या कोरोनाच्या काळामध्ये तर खाद्य संस्कृतीचा प्रत्येक घराघरामध्ये विशेष अनुभव आले असतील. बाहेरील खाणे बंद झाल्याने घरातच वेगवेगळे पदार्थ बनविले गेले. त्यामुळे अगदी घरापासून ते हॉटेल पर्यंत खाद्य संस्कृती प्रसिद्धच आहे. गरज आहे ती फक्त विविधता स्वीकारण्याची.