प्रसिद्ध भजन गायक नरेंद्र चंचल यांचे निधन झालं आहे. नरेंद्र चंचल यांनी शुक्रवारी दुपारी अखेरचा श्वास घेतला. भजन गायक चंचल गेल्या ३ महिन्यांपासून आजारी होते. त्यांना दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जेथे नरेंद्र चंचल बराच काळ उपचार घेत होते. नरेंद्र चंचल यांनी अनेक स्तोत्रांसह हिंदी चित्रपटातही गाणी गायली आहेत. ते विशेषतः भजन गीतासाठी परिचित होते. बॉबी चित्रपटानंतर नरेंद्र चंचल यांनी १९७४ मध्ये बेनाम और रोटी कपडा और मकान या चित्रपटासाठी गाणी गायली होती. लता मंगेशकर यांच्यासोबत नरेंद्र चंचल यांनी महंगाई मार गई नावाचं गाणं गायलं होतं. याशिवाय त्यांनी १९८० मध्ये मोहम्मद रफी यांच्यासोबत तूने मुझे बुलाया शेरा वालिए, १९८३ मध्ये आशा भोसले यांच्यासह चलो बुलावा आया है माता ने बुलाया है, दो घूंट पिला के साकिया, हुए हैं कुछ ऐसे वो हमने पराए यासारखी अजरामर गाणी गायली आहेत.
नरेंद्र चंचल यांचा जन्म १६ ऑक्टोबर १९४० रोजी अमृतसरमध्ये एका धार्मिक पंजाबी कुटुंबात झाला. ते एका धार्मिक वातावरणात मोठे झाले, ज्यामुळे त्यांना सुरुवातीपासूनच भजन कीर्तन गाणे आवडत होते. त्यांनी प्रसिद्ध भजनांसह हिंदी चित्रपटांतही पार्श्वगायन केले होते. त्यांनी केवळ शास्त्रीय संगीतानेच नव्हे तर लोक संगीताद्वारेही लोकांची मनं जिंकली. ‘बॉबी’ या चित्रपटातील ‘बेशक मंदिर-मस्जिद तोडो’ या आणि ‘आशा’ सिनेमातील ‘चलो बुलावा आया है, माताने बुलाया है’ या भजनांमुळे ते घराघरांत पोहोचले होते. मातारानीची भजन तर ते लहानपणापासून गात असायचे. त्यांची आई त्यांची पहिली गुरु होती. त्यानंतर त्यांनी प्रेम त्रिखा यांच्याकडून संगीताचे शिक्षण घेतले होते.
मार्च २०२० मध्ये नरेंद्र चंचल यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात ते दुर्गामातेचं भजन गाताना दिसले होते. या व्हिडिओत ते कोरोनावरील गाणे गाताना दिसले होते. ‘डेंगू भी आया और स्वाईन फ्लू भी आया, चिकन गुनिया ने शोर मचाया, कित्थे आया कोरोना. हे गाणे गाताना ते व्हिडिओमध्ये दिसले होते. १९४४ पासून ते दरवर्षी वैष्णो देवीच्या दरबारात आयोजित होणा-या वार्षिक जागरणाला हजेरी लावत असे. मागील वर्षी कोरोनामुळे ते सहभागी होऊ शकले नव्हते. तसेच ते दीर्घ काळापासून आजारी होते आणि मागील तीन दिवसांपासून दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल होते. आज दुपारी १२.१५ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.