Monday, March 1, 2021
Home Entertainment Bollywood अभिनेते राजीव कपूर यांचे निधन

अभिनेते राजीव कपूर यांचे निधन

राज कपूर यांचे धाकटे चिरंजीव आणि अभिनेते राजीव कपूर यांचे निधन झाल्याचे वृत्त आहे. हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली. राजीव कपूर हे रणधीर कपूर आणि दिवंगत ऋषी कपूर यांचे छोटे बंधू आहेत. वयाच्या ५८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना चेंबूरच्या इनलाक्स रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. पण त्याठिकाणी पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. रणधीर कपूर यांनी एका न्यूज वेबसाइटसोबत बोलताना म्हटले, मी माझा धाकटा भाऊ आज गमावला आहे. आता तो या जगात नाही. डॉक्टरांनी त्याला वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. मात्र, त्याचे प्राण वाचवता आले नाहीत. मी आता रुग्णालयात आहे आणि त्याचं शव मिळण्याची वाट पाहतोय. राजीव यांचे मोठे भाऊ ऋषी कपूर यांचे ७ महिन्यांपूर्वीच निधन झाले होते. नीतू कपूर व त्यांची मुलगी रीधिमा यांनीही सोशल मीडियावर राजीव यांचा फोटो शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली.

राज कपूर यांनी १९८५ मध्ये राम तेरी गंगा मैली  हा चित्रपट बनवून आपला मुलगा राजीवला पुन्हा सिनेसृष्टीत लाँच केले. हा चित्रपट सुपरहिट ठरला पण त्याचे श्रेय राजीवला मिळाले नाही, त्याऐवजी चित्रपटाची नायिका मंदाकिनी हिला सर्व श्रेय मिळाले. हा चित्रपट जसाजसा लोकप्रिय होत गेला, तसेतसे राजीव कपूर वडील राज कपूरवर नाराज झाले. या चित्रपटानंतर वडील आणि मुलात वाद निर्माण झाला होता. राम तेरी गंगा मैली नंतर राज कपूर यांनी पुन्हा कधीही राजीव सोबत चित्रपट बनवला नाही. यामुळे राजीव वडिलांवर नाराज राहिले. राजीव यांनी आपल्या छोट्याशा करिअरमध्ये ‘लव्हर बॉय’, ‘हम तो चले परदेस’, ‘अंगारे’, ‘थँक यू’ यासारख्या चित्रपटात भूमिका केल्या, पण ते बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण करू शकले नाहीत. ऋषी कपूर यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘प्रेमग्रंथ’ सिनेमाचं दिग्दर्शनही त्यांनी केलं होतं.

राज कपूर यांचा मुलगा राजीव कपूर यांनी आपल्या बॉलिवूड कारकिर्दीत बरेच चढ-उतार पाहिले. कुटुंबातल्या काही सदस्यांसारखे त्यांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपली कमाल दाखवू शकले नाहीत. मात्र वडील राज कपूर यांनी तयार केलेल्या आर. के. स्टुडिओशी त्यांच नेहमीच एक खास नात होत. त्यामुळेच कधी काळी आर. के. स्टुडिओच्या मॅनेजर पदावर असलेले ९४ वर्षीय विश्व मेहरा हे देखील राजीव कपूर यांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी आणि त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments