अरविंद जोशी यांना गुजराती नाट्य अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून ओळखले जात होते. अभिनेता शरमन जोशीचे वडील आणि ज्येष्ठ नाट्य अभिनेते अरविंद जोशी यांचे निधन झाले आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, त्यांना मुंबईच्या नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तेथे २९ जानेवारी रोजी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
पाहूया अरविंद जोशींची कारकीर्द थोडक्यात, अरविंद जोशी यांनी अनेक गुजराती चित्रपटात काम केलं आहे. परंतु त्यांना खरी ओळख ही गुजराती नाटकांनी मिळवून दिली. त्यांनी अनेक गुजराती नाटकात काम केलं आहे आणि त्याचे दिग्दर्शनही केलं आहे. अरविंद जोशी यांनी ‘इत्तेफाक’, ”शोले’ अपमान की आग, ‘खरीदार’, ‘ठीकाना’ ‘नाम’ यासारख्या अनेक हिंदी चित्रपटात सहाय्यक कलाकाराची भूमिका केली आहे. तसेच त्यांनी अनेक मालिकामधूनही अभिनय केला आहे. १९६९ मध्ये अरविंद यांनी यश चोप्रा यांना राजेश खन्ना आणि नंदा स्टारर ‘इत्तेफाक’ मध्ये असिस्ट केले होते. याशिवाय त्यांनी १९९० च्या ‘अपमान की आग’ मध्ये इंस्पेक्टर प्रभाकरची भूमिका साकारली होती, हा चित्रपट सरदार तालुकर यांनी दिग्दर्शित केला होता.
अरविंद जोशी हे प्रेम चोप्रांचे व्याही होते. अभिनेता प्रेम चोप्रा म्हणाले की, अरविंद एक चांगले व्यक्ती होते. गेल्या दोन आठवड्यापासून ते नानावटी हॉस्पिटलमध्ये भरती होते. वयोमानाने त्यांची तब्बेत खराब झाल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं होतं. गुजराती थिएटरमध्ये त्यांनी दिलेल्या योगदानाची नेहमी दखल घेतली जाईल.”गुजराती सिनेसृष्टीतला एक मोठा कलाकार काळाच्या पडद्याआड गेला आहे. अभिनेता प्रेम चोप्रा यांनी त्यांच्या निधनाच्या वृत्ताची पुष्टी केली.
अरविंद जोशी यांचे अंतिम संस्कार मुंबईतील विले पार्ले या ठिकाणच्या स्मशान भूमीत हिंदू पद्धतीने करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा अभिनेता शर्मन जोशी, पत्नी आणि एक मुलगी मानसी जोशी रॉय असा परिवार आहे. त्यांचा मुलगा शरमनचे लग्न प्रेम चोप्रा यांची मुलगी प्रेरणा चोप्राशी झाले आहे. मानसी जोशी रॉय हे नाव मनोरंजनाच्या दुनियेतील एक प्रसिद्ध नाव आहे आणि त्या अभिनेता रोहित रॉय यांच्या पत्नी आहेत. रोहित हा अभिनेता रोनीत रॉयचा भाऊ आहे. अरविंद हे प्रसिद्ध टीव्ही आणि चित्रपट अभिनेत्री सरिता जोशी यांचे दीर होते आणि अभिनेत्री केतकी दवे आणि पूरब जोशी यांचे काका होते. अशा महान अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली..