कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात जनजागृतीमध्ये करण्याच्या कामातही अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते. गेल्या अनेक महिन्यांत कलाकारांनी पुढाकार घेत आपापल्या परीनं गरजूंसाठी मदतीचा हात दिला आहे. सीनियर नर्ससाठी आवश्यक ती पदवी संपादन केल्यानंतर शिखा दिल्लीहून मुंबईत दाखल झाली ती मनोरंजन विश्वात काम करण्यासाठी. इथे आल्यावर काही चित्रपटांमध्ये तिनं कामदेखील केलं. पण, गेल्या सहा महिन्यांपासून ती मुंबईतील एका रुग्णालयात कोव्हीड रुग्णांसाठी कोणतंही वेतन न घेता काम करत होती. अभिनेत्री शिखा मल्होत्रा अतिदक्षता विभागात कोविड रुग्णांची अविरत सेवा करत होती. मनोरंजन सृष्टीतली ही अभिनेत्री जी गेल्या अनेक महिन्यांपासून रुग्णसेवा करत होती.
शिखा नर्स म्हणून रोजच्या दिवसातला निम्म्याहून अधिक वेळ ती रुग्णालयात कार्यरत होती. परिचारिका म्हणून कोविड रुग्णांची सेवा करणारी अभिनेत्री शिखा मल्होत्रा हिला दुर्दैवानं अर्धांगवायूचा झटका आला आणि ही करोना योद्धा सध्या अंथरुणाला खिळलेल्या अवस्थेत आहे. शिखाच्या शरीराच्या उजव्या भागाला अर्धांगवायूचा झटका आल्यानं कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. पण शिखाच्या तब्येतीत हवी तशी सुधारणा दिसून येत नव्हती त्यामुळं तिला केईएम रुग्णालायात दाखल करण्यात आले आहे. शिखाच्या प्रकृतीत काहीशी सुधारणा दिसून येत असल्याचे तिने स्वत: सांगितले आहे. ‘हा माझ्या आयुष्यातील सर्वात अवघड असा काळ आहे. यातून बाहेर पडण्यासाठी मला तुमच्या सर्वांच्या पाठिंब्याची आणि आशिर्वादाची गरज आहे. माझी तब्येत हळूहळू सुधारतेय. पण पुन्हा पहिल्यासारखं मी कधी चालू शकेन हे मलाही माहिती नाही’, असं शिखा म्हणाली. अर्धांगवायूचा झटका येण्यापूर्वी शिखाला कोरोनाचीही लागण झाली होती. कोरोना योद्धा शिखा यावरही मात करून सुखरूप बाहेर पडली, तर अर्धांगवायूचा झटका आल्याने चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली होती.
शिखाच्या या अमूल्य योगदानाबद्दल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तिचं कौतुक केले होते. मुख्यमंत्री कार्यलयाच्या ट्विटवर अकाऊंटवरुन शिखाची ही सेवा महाराष्ट्र कधीच विसरणार नाही असं म्हटलं गेलं होतं. ‘शिखाजी, या कठीण काळात आपण करत असलेली रुग्णसेवा महाराष्ट्र राज्य कधीही विसरणार नाही. आपण करत असलेल्या कार्यासाठी शुभेच्छा आणि स्वतःची काळजी घ्या,’ असे ट्विट मुख्यमंत्री कार्यलयाच्या अकाऊंटवरुन करण्यात आले होते.