Monday, March 1, 2021
Home Entertainment जगजीत सिंग यांची ८० वी जयंती

जगजीत सिंग यांची ८० वी जयंती

गझल नवाज जगजीत सिंग यांची आज ८० वी जयंती आहे. ८ फेब्रुवारी १९४१  रोजी राजस्थानात श्रीगंगानगर येथे अमरसिंग धीमन आणि बचन कौर यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला होता. चार बहिणी आणि दोन भावांसह राहणाऱ्या जगजीत सिंग यांना घरी जीत  या टोपण नावाने बोलावत असत. तब्बल पाच दशकांचा प्रदीर्घ काळ रसिकांच्या हृदयावर अधिराज्य करणाऱ्या जगजीत सिंग यांनी हजारो गझल गायल्या आणि अजरामर केल्या. जगजीत सिंग यांचे ८० अल्बम संगीत जगतात विक्रम नोंदवणारे ठरले. संगीत अल्बम ही संकल्पनाच जगजीत सिंग आणि चित्रा सिंग या दांपत्याने भारतात पहिल्यांदा रुजवली.

जगजीत सिंग यांनी संगीत क्षेत्रात पदार्पण करण्यास त्यांच्या वडिलांचा तीव्र विरोध होता. जगजित सिंग यांनी ब्युरोक्रेट व्हावे, अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. मात्र आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी जगजीत यांना आपल्या कुटुंबीयांच्या विरोधाला सामोरे जावे लागले होते. मुंबईत दाखल झाल्यानंतर जगजित सिंग यांना आर्थिक अचडणींचा प्रचंड सामना करावा लागला होता. आपल्या उदरनिर्वाहासाठी ते लग्न समारंभात गात होते. अल्बमच्या विक्रीतून होणा-या नफ्यातील काही भाग गीतकारांना देण्याची पद्धत जगजीत सिंग यांनी स्वत: सुरु केली होती. सुरुवातीला गीतकाराला केवळ गाणं लिहून द्यायचे पैसे मिळत होते. अल्बमच्या विक्रीतून होणारा नफा त्यांना मिळत नव्हता. मात्र जगजीत सिंग यांनी गीतकारांना नफा मिळवून देणे सुरु केले होते.

डिजिटल सीडी अल्बम लाँच करणारे जगजीत सिंग भारतातील पहिले संगीतकार होते. त्यांनी १९८७ साली बियॉन्ड टाईम या नावाने पहिला डिजिटल सीडी अल्बम लाँच केला होता. १९८२ साली आयोजित करण्यात आलेल्या जगजीत सिंग यांच्या लाईव अ‍ॅट रॉयल अल्बर्ट हॉल या लाईव्ह कॉन्सर्टच्या तिकीट केवळ तीन तासांत विकल्या गेल्या होत्या. पार्श्वगायक कुमार शानू यांना त्यांचा पहिला मोठा ब्रेक जगजीत सिंग यांनीच दिला होता.

Jagjit Singh's 80th birthday

प्रत्येक सुखाच्या मागे, काहीतरी दुखरी बाजू असते तसेच यांच्या आयुष्यातील ही बाजू दुखरी आहे. जगजीत सिंग यांचा एकुलता एक मुलगा विवेक सिंग याचे १९९० साली एका कार दुर्घटनेत निधन झाले. त्यावेळी त्यांच्या मुलाचे वय केवळ २१ वर्षे होते. ही त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी दुःखद घटना होती. मुलाला गमावल्याचा त्यांना खूप मोठा धक्का बसला होता. मुलाच्या मृत्यून ते खचले होते. सहा महिने ते या धक्क्यातून सावरु शकले नव्हते. जगजीत सिंग यांनी ‘ना चिठ्ठी ना कोई संदेश..’ ही गझल आपल्या मुलाच्या मृत्यूने दुःखी होऊन लिहिली होती. जगजीत सिंग यांची पत्नी चित्रा सिंग आपल्या मुलाच्या मृत्यूचा धक्का सहन करु शकल्या नाही. आपल्या मुलाच्या मृत्यूचा एवढा परिणाम त्यांच्यावर झाला, की त्यांनी गाणेच सोडून दिले होते. समवन समव्हेअर हा त्यांचा शेवटचा अल्बम होता. सर्वसामान्य रसिकांपर्यंत गझल पोहोचवणारे जगजीत सिंग यांनी १० ऑक्टोबर २०११  या दिवशी जगाचा कायमचा निरोप घेतला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments