Saturday, March 6, 2021
Home India News केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कार जाहीर

केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कार जाहीर

केंद्र सरकारकडून यंदाच्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. जापानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यासह सात जणांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. पद्मभूषण या विभागात महाराष्ट्रातील रजनीकांत श्रॉफ यांचा समावेश आहे. तर पद्मश्री पुरस्कारामध्ये गिरीश प्रभूणे, सिंधुताई सपकाळ, जसवंतीबेन पोपट, नामदेव कांबळे, परशूराम गंगावणे यांचा समावेश आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून युनिफॉस कंपनीचे रजनीकांत श्रॉफ यांना पद्मभूषण तर ज्येष्ठ समाजसेविका व अनाथांची आई म्हणून ओळख असलेल्या सिंधूताई सपकाळ यांच्यासह महाराष्ट्रातील पाच जणांना पद्मश्री पुरस्कार जाहिर झाला आहे.

जाहीर करण्यात आलेले पुरस्कार त्यांच्या विशेष आणि अमुल्य कामगिरीबद्दल आहेत. पाहूया कोणाला कोणत्या क्षेत्रात पुरस्कार जाहीर झाले.

रजनीकांत देविदास श्रॉफ – पद्मभूषण (व्यापार), परशुराम आत्माराम गंगावणे – पद्मश्री (कला), नामदेव सी. कांबळे – पद्मश्री (शिक्षण आणि साहित्य), जसवंतीबेन जमनादास पोपट – पद्मश्री (व्यापार आणि व्यवसाय), गिरीश प्रभुणे, सिंधुताई सपकाळ – पद्मश्री (सामाजिक कार्य).

रजनीकांत देविदास श्रॉफ हे एक अब्जाधीश उद्योगपती आहेत. राजू श्रॉफ या नावाने ते ओळखले जातात. ते युनिफॉस लि. कंपनीचे संस्थापक आहेत.

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असून आबेंसह एकूण सात जणांना पद्मविभूषण, १० जणांना पद्मभूषण, तर १०२ जणांना पद्मश्री पुरस्कार घोषित केले आहेत. पद्मविभूषण पुरस्कार प्राप्त मान्यवरांमध्ये एस.पी. बालसुब्रह्मण्यम (मरणोत्तर), डॉ.नरिंदर सिंह कपानी आणि सुदर्शन साहू यांचा समावेश आहे.

शिक्षण व साहित्यातील योगदानासाठी तसेच स्त्रियांच्या वेदना मांडणारे विदर्भातील लेखक नामदेव कांबळे यांना साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातला पद्मश्री पुरस्कार घोषित झाला आहे. ‘राघववेळ’ या कांदबरीसाठी १९९५ साली साहित्य अकदमीच्या पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला होता.

लिज्जत पापडच्या संस्थापिका जसवंतीबेन पोपट यांनाही यंदाचा पद्मश्री पुरस्कार जाहिर झाला आहे. ८० रुपये उधारीवर जसवंतीबेन यांनी मैत्रिणींबरोबर हा व्यवसाय सुरू केला होता. या व्यवसायाची उलाढाल शेकडो कोटींची असून ४२ हजार महिला कर्मचारी येथे काम करतात.

सिंधुताई सपकाळ या गेली ४० वर्षे सामाजिक कार्य करत आहेत. त्यांना आजवर ७५० हून अधिक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. अनाथ मुलांना आईसारखी माया देणाऱ्या सिंधुताई नेहमी अभिमानाने सांगतात की, मी हजारहून अधिक मुलांची आई आहे.

उपेक्षित, वंचित घटकातील लोकांसाठी, भटक्या-विमुक्त समाजासाठी ज्येष्ठ समाजसेवक गिरीश प्रभुणे त्यांनी काम केले, त्यामुळे त्यांच्या कार्याची दाखल घेऊन त्यानाही पुरस्कार जाहीर झाला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर समाजाचे परशुराम गंगावणे यांना कळसूत्री बाहुल्या ही लोककला जपून समाजामध्ये जनजागृती आणि प्रबोधन केल्यामुळे गंगावणे यांना कला क्षेत्रातील  पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. आदिवासी कलेचा हा वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी परशुराम गंगावणे यांनी गुरे आणि गोठा विकून त्याठिकाणी लोककलेचे संग्रहालय बनवले आहे. त्यांनी कलाअंगण चॅरिटेबल ट्रस्टही सुरू केले आहे या संग्रहालयात पपेट, चित्रकथा, कळसूत्री पहायला मिळतात.

एकूण ११९ जणांना पद्म पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. यात लोक जनशक्ती पार्टीचे नेते रामविलास पासवान यांना मरणोत्तर पद्मभूषण तर तरुण गोगोई, माजी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनाही पद्मभूषण पुरस्कार जाहिर झाला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments