Friday, February 26, 2021
Home India News ६ फेब्रुवारीला शेतकऱ्यांचा चक्का जाम आंदोलन

६ फेब्रुवारीला शेतकऱ्यांचा चक्का जाम आंदोलन

किसान मोर्चाने ६ फेब्रुवारी रोजी देशभर चक्का जाम आंदोलन जाहीर केले आहे. शनिवार दिनांक ६ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ ते दुपारी ३ या वेळेत शेतकरी देशभर चक्का जाम करतील. यापूर्वी शेतकरी संघटनांनी ३० जानेवारी रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या शहीद दिनी कृषी कायद्याच्या विरोधात एक दिवस उपोषण केले होते. शेतकरी संघटनांनी २६ जानेवारी रोजी दिल्लीत ट्रॅक्टर परेड काढला, मात्र, त्या ट्रॅक्टर रॅलीमध्ये बरीच खळबळ उडाली होती. कृषी कायद्यांचा विरोध करणाऱ्या शेतकर्‍यांनी प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसेनंतरही आंदोलन थांबवलेले नाही. आता किसान एकता मोर्चाने जाहीर केले आहे की, ६ फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांतर्फे देशभरात ३ तास चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे. दरम्यान, दिल्ली सीमेवरील पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त केला असून पोलिसांची संख्याही वाढवली आहे. दिल्ली पोलिसांनी उत्तर प्रदेशला जोडणार्‍या गाझीपूर सीमा व टिकरी सीमेवर मोठमोठे बॅरिकेड्स लावले आहेत. काटेरी तारांनी मार्ग रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे. बॅरिकेड्स आणि कित्येक थरांची सिमेंटची भिंत उभारण्यात आली आहे. गाझीपूर सीमेवर रस्त्यांवर मोठमोठे खिळे टाकण्यात आले आहेत.

आंदोलक शेतकऱ्यांचा आरोप आहे की, प्रशासनानेही शेतकरी चळवळीशी संबंधित अनेक ट्वीटर अकाउंट्स बंद केली आहेत आणि चळवळीशी संबंधित बर्‍याच कार्यकर्त्यांना अटक करून गायब केले आहे. सोमवारी आयटी मंत्रालयाने सुमारे २५० ट्वीटर अकाउंट्स ब्लॉक केली आणि असे म्हटले होते की, ती बनावट होती आणि चिथावणीखोर ट्विटस करत होती.

आंदोलनस्थळी इंटरनेट बंदी, अर्थसंकल्पात शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष आणि इतरही काही मुद्यांना अनुसरुन हे आंदोलन करण्यात येणार आहे. संयुक्त शेतकरी मोर्चाच्याच नेतृत्त्वात मागील दोन महिन्यांहूनही अधिक काळापासून दिल्लीतील सीमांवर शेतकऱ्याचं आंदोलन सुरु आहे. नवीन तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. दरम्यान, या तिन्ही कायद्यांच्या बाबतीत चर्चा करण्याची तयारी दाखवली असली तरीही सरकारनं हे कायदे रद्द करण्याला स्पष्ट नकार दिला आहे. आतापर्यंत ११ बैठका होऊनही या प्रश्नांवर अद्याप तोडगा निघालेला नाही. सरकारकडून इंटरनेट बंद केल्यावर शेतकऱ्यांनी खेड्यांमध्ये महापंचायत बोलवण्याची पारंपरिक पद्धत आणि लाऊड​​स्पीकरचा अवलंब केला आहे. त्याच वेळी किसान संयुक्त मोर्चाने सोमवारी सिंघू सीमेवर बैठक घेत पोलिसांची तयारी आणि आंदोलनाची रूपरेषा यांचा आढावा घेतला. यावेळी सोमवारी ६ फेब्रुवारी रोजी तीन तासांचे चक्का जाम आंदोलन करण्याचे जाहीर करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments