गेले काही दिवस शहर व विदर्भातील वातावरण ढगाळ असल्याने तापमानात वाढ झाली होती. राज्यातही बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा खाली आल्याचे लक्षात येत आहे. हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर भागांमध्ये मोठ्या प्रमाणात शीतलहर आल्यामुळं इथं महाराष्ट्रही गारठला आहे. देशात बर्याच दिवसापासून तापमानात लक्षणीय घट झाल्याची दिसून येत आहे. वातावरणातील गारठयामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याची चिन्ह दिसत आहेत. जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश भागांमध्ये थंडीचे प्रमाण वाढल्याने महाराष्ट्रा मध्येही थंडीमुळे हुडहुडी भरायला सुरुवात झाली आहे. उत्तर महाराष्ट्र पूर्णपणे गारठला असून आता देश आणि राज्यातील थंडीच्या या लाटेचे परिणाम मुंबईतही पाहायला मिळत आहेत. हवामान खात्याकडून मुंबईतील तापमानामध्ये आणखी घट होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नाताळ, नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांनाही गुलाबी थंडीचा मनमुराद आनंद लुटता येणार आहे. मुंबईतील ही गुलाबी थंडी इतरत्र भागांमध्ये मात्र आता बोचरे रुप ठरत आहे. थंडीच्या दिवसांमध्ये कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता पाहता प्रत्येक नागरिकांने आरोग्याची योग्य काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
गेल्या दोन दिवसांमध्ये ग्रामीण भागामध्ये हाडं गोठवणारी थंडी पडली आहे. त्यातच नळयाची घरे असल्याने थंडीचे प्रमाण ग्रामीण भागात खूपच वाढले आहे. परभणीमध्ये ५.६ अंश सेल्शिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे. हे तापमान सध्यापर्यंत यंदाच्या हिवाळ्यातील सर्वाधित निचांकी आकडा दर्शवत आहे. यासोबतच बुलढाण्यातही तापमानाचा पारा ९ अंशांवर पोहोचला. पश्चिम महाराष्ट्रात महाबळेश्वरमध्ये तापमान ११ अंशांवर आले आहे. त्यामुळं या कडाक्याच्या थंडीमुळं आता अनेक भागांमध्ये चौक आणि गल्लीबोळांच्या कोपऱ्यांवर शेकोट्याही दिसू लागल्या आहेत. परभणीमध्ये तापमान अतिशय वेगानं कमी होत असल्याचं पाहायला मिळत आहे. ७ अंशांवरील तापमानाचा पारा हा अवघ्या दोन दिवसांत ५ अंशांवर आला आहे. त्यामुळे आता रस्त्यावर दिसणारी लोकांची गर्दीही काहीशा कमी प्रमाणात कमी झाली आहे.
सातत्याने बदलणाऱ्या वातावरणामुळे यंदा थंडी पडणार की नाही, असा प्रश्न विदर्भवासीयांना पडला होता. मात्र, गेल्या दोन दिवसांत पाऱ्यात चांगलीच घसरण झाली आहे. विदर्भातील गारठा वाढला आहे. रविवारी गोंदिया सलग दुसऱ्या दिवशी राज्यातील सर्वाधिक थंड ठरले. तेथे ७.४ अंश इतक्या किमान तर त्या खालोखाल नागपुरात ८.६ अंश इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली. दोन्ही शहरांतील सोमवारचे तापमान हे यंदाच्या मोसमातील नीचांकी ठरले. यंदाच्या मोसमात नागपुरातील तापमान तर १२ अंशांपेक्षा खाली गेलेच नव्हते. मात्र, बऱ्याच दिवसांच्या विश्रांतीनंतर आता थंडी परतली आहे. शुक्रवारपासून वातावरणात बदल होऊ लागले. हवेत आर्द्रता जाऊन ती कोरडी होऊन गेल्या तीन दिवसांत विदर्भातील पारा घसरला आहे.