टाटा समूहाबद्दल प्रत्येक भारतीयाच्या मनात अपार आपुलकी आहे, ती त्यांच्या या देशप्रेम आणि दानशूरपणामुळेच. भारतातील प्रख्यात उद्योगपतींपैकी एक असणाऱ्या टाटा समूहाचे प्रमुख रतन टाटा हे सदैव आपल्या सामाजिक कार्यांसाठी समाजमाध्यमात चर्चेत असतात. मात्र आता रतन टाटा एका वेगळ्याच गोष्टीसाठी चर्चेत आहेत. सोशल मिडीयावर टाटा यांना भारतातील सर्वात मोठा मानला जाणारा नागरी सन्मान ‘भारतरत्न’ देण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे. मात्र प्रसिध्द उद्योगपती रतन टाटा य़ांनी यावर आपली प्रतिक्रीया दिली आहे, मी लोकांच्या या भावनेचं कौतुक करतो मात्र सोशल मिडीयावर चालत असणाऱ्या या मोहीमा बंद केल्या पाहिजेत असे रतन टाटा यांनी म्हटले आहे. समाज माध्यमांत टाटा यांना भारतरत्न देण्यात यावा अशी मोठ्या प्रमाणात मागणी करण्यात येत होती. या सगळ्या चर्चेवर टाटांनी ट्वीटच्या माध्यमातून लोकांच्या भावनेचा आदर करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. #BharatRatnaForRatanTata हा हॅशटॅग देखील काल ट्रेंड सुरू झाला होता. सोशल मीडियावरील मागणीनंतर रतन टाटा यांनी ट्वीट करून मला भारतरत्न देण्याची मोहिम थांबवा अशी विनंती केली आहे.
कोरोनामुळे लॉकडाऊन आणि बऱ्याच गोष्टी बंद झाल्या होत्या. या काळात अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केले आहे. पगार कपात करत आहेत. यावर टाटा ट्रस्टचे चेअरमन तथा उद्योगपती रतन टाटा यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. कठीण काळात कंपन्यांवर कर्मचाऱ्यांची जबाबदारी असते. संकटाच्या काळात आपण आपल्या कर्मचार्यांशी असे वागता, हीच तुमची नैतिकता आहे का? असा सवालही टाटा यांनी उपस्थित केला. ही तिच लोकं आहेत, ज्यांनी तुमच्यासाठी काम केलंय, तुमच्यासाठी कारकीर्द देणाऱ्या या लोकांना तुम्ही आज उघड्यावर सोडून देत आहात, ही तुमच्या नितीमत्तेची व्याख्या आहे का? असं रतन टाटा यांनी म्हटलं होतं.
मोटिव्हेशनल स्पीकर डॉ. विवेक बिंद्रा यांनी सर्वप्रथम रतन टाटा यांना भारतरत्न देण्याची मागणी केली होती. त्यासाठी बिंद्रा यांनी ट्विटरवर #BharatRatnaForRatanTata ही मोहिम सुरू केली. या मोहिमेत लोकांना सहभागी होण्याचे आवाहन देखील केले. ट्वीटच्या माध्यमातून टाटा समूहाचे प्रमुख रतन टाटा म्हणाले, समाजमाध्यमांवर एका विशेष गटाकडून एका पुरस्करावरुन व्यक्त करण्यात आलेल्या भावनांचे मी आदर करतो. परंतु मी अत्यंत नम्रपणे आवाहन करतो की, सोशल मिडीयावर चालवण्यात येणाऱ्या मोहिमा बंद कराव्य़ात. मी भारतीय असणे आणि भारताच्या विकासात सदैव योगदान देत असल्याबद्दल स्व:ला भाग्यशाली समजतो, मी देशाच्या प्रगतीसाठी मी माझे योगदान कायम देत राहील.