आयुर्वेदिक डॉक्टरांना अॅलोपॅथिक शस्त्रक्रिया करण्याची परवानगी देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनने (आय एम ए) राष्ट्रीय पातळीवर आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलना बाबत माहिती देताना इंडियन मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्र अध्यक्ष, डॉ अविनाश भोंडवे यांनी सांगितले कि, “आयुर्वेद विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षणात ५८ एलोपॅथिक शस्त्रक्रिया करण्यास परवानगी दिली आहे. आयएमएने या विरोधात ११ डिसेंबर रोजी देशव्यापी बंद पुकारला आहे. आयएमएचा हा लढा आयुर्वेदाविरोधी नाही किंवा आयुर्वेदाच्या वैद्यांविरोधात सुद्धा नाही आहे, आमचा विरोध वैद्यकीय शाखांची सरमिसळ करून बनवल्या जाणाऱ्या ‘मिक्सोपथी’ ला विरोधी आहे. या बंदमध्ये रुग्णांना कोणताही त्रास होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ. सर्व तातडीच्या सेवा सुरु राहणार आहेत.
या आंदोलनात महाराष्ट्रातील आय.एम.ए.च्या २१९ शाखांमधील ४५००० डॉक्टरांसह महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणीकृत असलेले एकूण एक लाख दहा हजार डॉक्टर्स सहभागी होतील. सर्व दवाखाने, क्लिनिक्स, ओपीडीच्या सेवा सकाळी ६ ते संध्याकाळी ६ या वेळेत बंद ठेवण्यात येणार आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशनने काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात बंद विषयी सविस्तर माहिती देण्यात आली आहे. यामध्ये त्यांनी या आंदोलनात मेडिकल स्टुडन्टस नेटवर्क या आय.एम.ए.च्या पदवीपूर्व विद्यार्थ्यांच्या शाखेतर्फे एम.बी.बी.एस.चे शिक्षण घेणारे महाराष्ट्रातील ३६ सरकारी आणि खाजगी वैद्यकीय महाविद्यालयातील १५,००० वैद्यकीय विद्यार्थी यात सहभागी झालेले आहेत.
Say No to #MIXOPATHY pic.twitter.com/5Be5GkXiGp
— Indian Medical Association (@IMAIndiaOrg) December 8, 2020
महाराष्ट्रातील खाजगी आणि सरकारी महाविद्यालयात आणि अनेक नामांकित इस्पितळात पदव्युत्तर शिक्षण घेणारे १५००० ज्युनिअर डॉक्टर्स महाराष्ट्र रेसिडेंट डॉक्टर्स असोसिएशन आणि आय.एम.ए.च्या ज्युनिअर डॉक्टर्स नेटवर्क तर्फे सक्रीय सहभागी होणार आहेत. या आंदोलनाला आधुनिक वैद्यक शास्त्रातील स्पेशालिस्ट डॉक्टरांच्या ३४ संस्थांनी पाठिंबा दर्शविला आहे. यात फेडरेशन ऑफ गायनॉकोलॉजी, महाराष्ट्र सर्जिकल सोसायटी, फिजिशियन्स असोसिएशन ऑफ इंडिया, इंडियन असोसिएशन ऑफ पेडीयाट्रिशियन्स, इंडियन डेंटल असोसिएशन, असोसियेशन ऑफ कोलोरेक्टल सर्जन्स, इंडियन रेडीओलॉजीकल अँड इमेजिंग असोसियेशन, फेडरेशन ऑफ फॅमिली फिजिशियन्स ऑफ इंडिया, जीपीए- मुंबई, अशा अनेक संस्थांनी पाठिंबा दर्शविलेला आहे. आधुनिक वैद्यक शास्त्राच्या पदव्युत्तर आणि पदव्युत्तर वैद्यकीय विद्यार्थ्यांसह सर्व भारतभरातील ६ लाख आयएमए सदस्य त्यात सक्रिय सहभाग घेतील. महाराष्ट्रातील १,५०,००० डॉक्टर्स आणि पदवीपूर्व तसेच पदवीपूर्व विद्यार्थी त्यात सहभागी होणार आहेत.
इंडियन मेडिकल असोसिएशनने असेही संकेत दिले आहेत की येत्या आठवड्यात हे आंदोलन तीव्र होऊ शकते. देशभरातील खासगी रुग्णालयांनी संपावर चिंता व्यक्त केली आहे आणि सेवा सुरळीत पार पाडण्यासाठी पावले उचलली आहेत.