Sunday, March 7, 2021
Home India News १९ डिसेंबर - गोवा मुक्ती दिन

१९ डिसेंबर – गोवा मुक्ती दिन

भारताला स्वातंत्र्य मिळालं, पण याच देशाचं महत्त्वाचं अंग असलेला भाग मात्र पारतंत्र्यात राहिला. गोवा मुक्त होण्यासाठी जवळ जवळ चौदा वर्षं झगडावं लागलं. पूर्ण देश गुलामगिरीच्या जोखडातून स्वतंत्र झाला पण पोर्तुगीजांच्या गुलामगिरीचे चटके सहन करणारा गोवा काही मुक्त होऊ शकला नाही. १९४७ साली ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून भारत स्वतंत्र झाला पण गोव्यातील जनता मोकळा श्वास घेऊ शकली नाही. १४९८ ला पोर्तुगीज खलाशी ‘वास्को द गामा’ याने गोव्यात पाऊल टाकले. त्यानंतर गोव्यातून पोर्तुगीज सत्ता संपण्यासाठी १९ डिसेंबर १९६१ हा दिवस उजडावा लागला. ४७ ते ६१ दरम्यान काय काय झालं हे पाहण्यासाठी गोव्याच्या मुक्ती संग्रामाविषयी माहिती थोडक्यात जाणून घेऊया.

गोवा मुक्ती संग्रामात हिरीरीने भाग घेतलेल्या अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आता वयाची ऐंशी-नव्वदी पार केली आहे. या स्वातंत्र्य सैनिकांच्या रूपाने इतिहास आजही जिवंत आहे. निसर्गाने दिलेला ठेवा सौंदर्याची खाण असलेल्या गोव्याकडे कायमच सगळे आकर्षित होतात. पोर्तुगीज देखील असेच आकर्षित झाले. इ.स. १४९८ साली पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा याने भारतात प्रवेश केला, त्यानंतर व्यापारी वसाहत स्थापन करण्याच्या उद्देशाने पोर्तुगीजांनी इ.स. १५१० रोजी गोव्यात प्रवेश केला. तेव्हा विजापूरच्या आदिलशहाचा गोव्यावर अंमल होता. आदिलशहाची सत्ता उलटवून टाकून पोर्तुगीजांनी गोव्यावर आपली सत्ता स्थापन केली. भारतावर इंग्रजांनी दीडशे वर्षं राज्य केले परंतू पोर्तुगीजांनी गोव्यावर साडे    चारशे वर्षांहून अधिक काळ राज्य केले. पोर्तुगीजांच्या जाचातून गोवा मुक्त व्हावा यासाठी असंख्य कार्यकर्ते भूमिगत पद्धतीने आपलं काम हिरीरीने करत होते.

goa church

पण गोवा मुक्ती संग्रामाची पहिली ठिणगी पडली ती डॉ. राम मनोहर लोहिया यांच्यामुळे. डॉ. ज्युलिओ मिनेझिस या आपल्या मित्राच्या निमंत्रणामुळे डॉ. लोहिया काही दिवस विश्रांतीसाठी गोव्यात आले असता त्यांना पोर्तुगीजांनी इथल्या जनतेवर घातलेले निर्बंध प्रत्यक्ष बघायला मिळाले. इथल्या नागरिकांचे चाललेले शोषण बघून ते खूप अस्वस्थ झाले. तिथे गेल्यावर लोहिया यांच्यावर पोर्तुगीज अधिकाऱ्यांनी सार्वजनिक ठिकाणी भाषण बंदी घातली होती. पोर्तुगीज शासनाकडून गोव्यातील जनतेच्या मूलभूत अधिकारांची होत असलेली पायमल्ली लोहिया यांनी स्वतः: अनुभवली. पण असे कोणतेही निर्बंध न मानणाऱ्या लोहिया यांनी १८ जून १९४६ रोजी मडगाव येथे जाहीर सभा घेऊन पोर्तुगीजांविरुद्ध आवाज उठवला. या सभेला अनपेक्षित असा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. लोहिया यांचं भाषण ऐकायला लोकांनी प्रचंड गर्दी केली. तोवर गोव्यात सार्वजनिक सभांचे आयोजन एकदम थांबले होते. गोमंतकीय जनतेचा हुंकार ऐकणारं कोणीतरी आहे,  असे याप्रसंगी इथल्या नागरिकांना वाटून गेले. गोवा मुक्ती संग्रामाची ही पहिली ठिणगी होती, ज्यामुळे भारत स्वतंत्र झाला तसा गोवा देखील मुक्त झाला पाहिजे ही भावना सर्वदूर मनामध्ये पसरत गेली.

गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिक, निवृत्त आय.पी.एस अधिकारी प्रभाकर सिनारी यांनी आपल्या ‘अंधारातून प्रकाशाकडे’ या आत्मचरित्रात या सगळ्या परिस्थितीचं सविस्तर वर्णन केलं आहे. प्रभाकर सिनारी म्हणतात, जर भारत सरकारने आणि पंडित नेहरूंनी त्यावेळी ठाम भूमिका घेतली असती तर गोवा देखील भारता पाठोपाठ मुक्त झाला असता.

स्वातंत्र्यसैनिकांनी भारत सरकारच्या आदेशाची वाट न बघता आपला लढा सुरू ठेवला होता. अखेरीस १९ डिसेंबर १९६१ रोजी भारत सरकारने लष्कराला कारवाई करण्याचे आदेश दिले. गोव्याच्या सर्व सीमा ताब्यात घेण्यात आल्या. अखेरीस १९ डिसेंबर १९६१ च्या रात्री दहा वाजता पोर्तुगीज गव्हर्नर वासाल द सिल्वा यांनी शरणागतीच्या दस्तावेजावर सही करून ते भारतीय लष्कर प्रमुखांना दिले. पोर्तुगीजांच्या साडेचारशे वर्षांच्या गुलामगिरीतून गोवा अखेरीस मुक्त झाला. त्यामुळे दरवर्षी १९ डिसेंबर गोवा मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments