Sunday, February 28, 2021
Home India News जगभरात नव्या वर्षाचे साधेपणाने परंतु उत्साहात वेलकम

जगभरात नव्या वर्षाचे साधेपणाने परंतु उत्साहात वेलकम

कोरोना काळात नव्या वर्षाचं सर्वत्र उत्साहात स्वागत केलं जात आहे. केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना नवीन वर्षाच्या या स्वागताच्या जल्लोषावर आणि गर्दीवर नियंत्रणासंदर्भात कडक निर्बंध घालण्याबाबत निर्देश दिले होते. या पार्श्वभूमीवर मुंबईत कलम १४४ लागू करण्यात आले. मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया, जुहू बीच आणि समुद्र किनाऱ्यांवर गर्दी करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. मुंबई वाहतूक पोलिसांकडून ३१ डिसेंबरच्या रात्रीसाठी परिपत्रक जारी करण्यात आले आहे. दिल्लीमध्ये देखील नाईट कर्फ्यूची घोषणा करण्यात आली होती. तर उत्तर प्रदेश, राजस्थान, कर्नाटक, छत्तीसगड, बिहार, मध्य प्रदेशच्या राज्य सरकारांनी देखील नवीन वर्षाच्या जल्लोषावर निर्बंध घातले होते.

२०२१ नव्या वर्षाचं स्वागत साधेपणाने परंतु उत्साहात करण्यात आलं. अर्थात या स्वागताला अनेक ठिकाणी निर्बंध होते. मात्र काही ठिकाणी निर्बंध पाळत तर काही ठिकाणी मोठ्या उत्साहात नव्या वर्षाचं स्वागत करण्यात आलं. कोरोना महामारीमुळं देशातील अनेक शहरात नाईट कर्फ्यू होता. मात्र गोवा, पाटणा, भोपाळसारख्या अनेक शहरांत लोकांनी रस्त्यावर उतरुन जल्लोषात स्वागत केल्याचं पाहायला मिळाले. कोरोनाच्या नव्या प्रकाराची भारतात एन्ट्री झाल्याने सरकारने नव्या वर्षाच्या सेलिब्रेशनवर कडक निर्बंध घातले होते. मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया, जुहू बीच आणि समुद्र किनाऱ्यांवर गर्दी करण्यावर निर्बंध घालण्यात आले होते. दरवर्षी ड्रिंक अँड ड्राईव्हमध्ये ब्रीथ अॅनालायझरने मद्यपान केलं आहे की नाही याची चाचणी केली जात होती. मात्र यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ब्लड टेस्ट करून चालकाने मद्यपान सेवन केलं आलं आहे की नाही याची तपासणी करण्यात आली.

पंतप्रधान मोदी यांनी शुभेच्छा देत ट्वीट केलं आहे की, “तुम्हाला २०२१ च्या हार्दिक शुभेच्छा ! हे वर्ष उत्तम आरोग्य, आनंद आणि समृद्धि घेऊन येवो. अपेक्षा आणि कल्याण होण्याची भावना प्रबळ होत जावो.” तसेच राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांनीही जनतेला नव वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

कोरोनापासून स्वातंत्र्य मिळवायचे असेल तर नियम आणि कायदे यापेक्षा आता स्वयंशिस्त पाळणे याला सर्वोच्च प्राधान्य द्यावे लागेल. विशेषत: नवीन पिढीवर याची जास्त जबादारी आहे. नव्या वर्षात आपण जबाबदार नागरिक म्हणून सर्वांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा निर्धार मनोमन करणे गरजेचे आहे. आपली आव्हाने कमी होणार नाहीत. शासन यंत्रणा कृतीशील आणि गतीमान आहे. नैसर्गिक आणि मानवनिर्मित संकटे नेहमीच येतात परंतु त्याचा सामना सावधपणे आणि शिस्तबध्द पध्दतीने करुया असे आवाहन करून मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातल्या नागरिकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

जगभरातील लोक नवीन वर्षाच्या सेलिब्रेशन करण्यात मग्न असून सरत्या वर्षाला निरोप देत आहेत. लोक नवीन वर्षामध्ये समृद्धीची इच्छा करुन एकमेकांना संदेश पाठवत आहेत. २०२१ मध्ये कोरोना साथीच्या आजारापासून लोकांची सुटका व्हावी अशी त्यांची इच्छा आहे. सर्व प्रथम, नवीन वर्ष 2021 ची सुरुवात न्यूझीलंडमध्ये झाली. यानिमित्ताने तेथील लोकांनी फटाके फोडले आणि नवीन वर्षाचे स्वागत केले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments