गेल्या वर्षी कोरोनाच्या काळात रियल इस्टेट क्षेत्राला मोठा फटका बसला होता. जून २०१८ च्या तुलनेत जून २०१९ साली रियल इस्टेट क्षेत्राचे ८० टक्के नुकसान झालं होतं. त्यानंतर पुढच्या तीन महिन्यात, डिसेंबरपर्यंत राहत्या घरांची आणि कार्यालयीन जागेसाठी मागणी वाढल्याचं दिसून आलं. महाराष्ट्र सरकारने स्टॅम्प ड्यूटीमध्ये केलेली कपात, कमी व्याजदर, विकासकांनी राबवलेल्या अनेक आकर्षक योजना या सारख्या विविध कारणामुळे पुन्हा एकदा या क्षेत्रामध्ये आशादायक वातावरण निर्माण झाल्याचं पहायला मिळालं. रियल इस्टेट क्षेत्रासाठी करण्यात येणाऱ्या या सर्व्हेक्षणामध्ये ५० पेक्षा जास्त अधिक गुण हे या क्षेत्राला आशावादी असल्याचं सांगतात. जर हे गुण ५० असतील तर समान किंवा तटस्थ चित्र आहे असं समजलं जातं आणि ५० पेक्षा कमी गुण असतील तर या क्षेत्रात मंदी आहे असे समजण्यात येते.
२०२० च्या चौथ्या तिमाहीमधील २७ वा नाइट फ्रँक-फिक्की-एनएआरईडीसीओ रिअल इस्टेट सेंटिमेण्ट इन्डेक्स प्रसिद्ध झाला आहे. या सर्व्हेक्षणानुसार पहिल्यांदाच चौथ्या तिमाहीमध्ये ५४ गुणांसह या क्षेत्राने आशावादी विभागात प्रवेश केला आहे. त्यामुळे पुढच्या सहा महिन्यामध्ये या क्षेत्रामध्ये सकारात्मक मागणी निर्माण होण्याची आशा आहे. या क्षेत्राचा इन्डेक्स हा या वर्षाच्या अखेरपर्यंत ६५ गुणांपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. फ्यूचर सेंटिमेण्ट इन्डेक्सने देखील २०२० च्या तिसऱ्या तिमाहीमधील ५२ गुणांपासून २०२० च्या चौथ्या तिमाहीमध्ये ६५ गुणांपर्यंत प्रबळ वाढीची नोंद केली. भौगोलिकदृष्ट्या देशाच्या पश्चिमी भागातील फ्यूचर सेंटिमेण्ट इन्डेक्समध्ये लक्षणीय वाढ दिसण्यात आली. या विभागाचे फ्यूचर सेंटिमेण्ट २०२०च्या तिसऱ्या तिमाहीमधील ४७ गुणांवरून २०२०च्या चौथ्या तिमाहीमध्ये ६६ गुणांपर्यंत वाढले. त्यामुळे रिएल इस्टेट क्षेत्रासाठी ही नक्कीच एक आनंदाची बातमी आहे.
नाइट फ्रँक ही एक जागतिक स्तरावरील आघाडीची मालमत्ता सल्लागार कंपनी आहे. लंडनमध्ये मुख्यालय असलेल्या नाइट फ्रँकचे २० हजार कर्मचारी जगातील ६० बाजारपेठांतील ४८८ हून अधिक कार्यालयांमधून काम करत आहेत. हा समूह व्यक्तीगत मालक व ग्राहक ते प्रमुख विकासक, गुंतवणूकदार आणि कॉर्पोरेट भाडेकरु यांना सल्ला देतो. भारतात नाइट फ्रँकचे मुख्यालय मुंबईमध्ये आहे आणि बंगळुरु, दिल्ली, पुणे, हैदराबाद, चेन्नई, कोलकाता आणि अहमदाबाद या शहरांमध्ये १४०० हून अधिक तज्ज्ञ कर्मचारी या कंपनीसाठी काम करत आहेत. नवीनच करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार असं दिसून येतंय की या क्षेत्रासाठी आगामी काळ हा आशादायक आहे. नवीन वर्षात या क्षेत्राची सकारात्मक सुरुवात करताना आगामी महिन्यांमध्ये प्रमुख आर्थिक निर्देशकांवर बारकाईने लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे. त्यासोबतच कोरोना लसीचा विकास आणि लोकांसाठी लस मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. हे दोन घटक आगामी महिन्यांमध्ये रिअल इस्टेट विभागाची कामगिरी मोठ्या प्रमाणात निर्धारित करतील आणि रियल इस्टेटच्या व्यवसायात सुगीचे दिवस येतील, असे नाइट फ्रँक इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शिशिर बैजल म्हणाले.