Sunday, March 7, 2021
Home India News लोहरीच्या मुहूर्तावर नवीन कृषी कायद्याची होळी

लोहरीच्या मुहूर्तावर नवीन कृषी कायद्याची होळी

सुप्रीम कोर्टाच्या या निकालानंतर सर्वात मोठा प्रश्न असा आहे की, शेतकरी संघटना या समितीसमोर हजर होणार का? कारण शेतकरी संघटनांनी कालच स्पष्ट केलं होतं की, कायद्यांच्या स्थगितीचं आम्ही स्वागत करु, पण कोणत्याही समितीसमोर हजर राहणार नाही. तसेच त्यांनी शेतकरी आपलं आंदोलन सुरु ठेवणार असल्याचंही स्पष्ट केलं होतं. आज संध्याकाळी शेतकरी तीनही शेतकरी कायद्यांची प्रत जाळून लोहडी साजरी करणार आहेत. सिंघू बॉर्डरवर आंदोलन करणाऱ्या शेतकरी नेत्यांचा दावा आहे की, सुप्रीम कोर्टाने नेमलेल्या समितीचे सदस्य सरकार समर्थक आहेत. शेतकरी नेते बलबीर सिंह राजेवाल यांनी सांगितलं की, सर्वोच्च न्यायालयाच्या वतीने नेमलेले समीतीचे सदस्य विश्वासू नाहीत. कारण ते आतापर्यंत नवे कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हितासाठी असल्याचं ते लिहित होते. त्यामुळे आम्ही आमचं आंदोलन सुरुच ठेवणार आहोत.

नव्या कृषी कायद्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय काल जाहीर केला. सर्वोच्च न्यायालयाने आज केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्याच्या अंमलबजावणीला पुढील आदेशापर्यंत तात्पुरती स्थगिती दिली आहे. यासोबतच न्यायालयाने चार सदस्यीय समितीचीही स्थापना केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने कृषी कायद्यांना स्थगिती दिल्यानंतरही दिल्लीच्या सीमांवरील शेतकरी आंदोलन अद्याप सुरु आहे. शेतकरी गेल्या ४९ दिवसांपासून दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत आहेत. राजधानी दिल्लीच्या सीमेवर शेतकरी जवळपास दीड महिन्यापासून आंदोलन करत आहेत. विविध सीमांवर हजारोंच्या संख्येने आंदोलक ठाण मांडून आहेत. या आंदोलनात महिला, वयोवृद्ध आणि लहान मुलांचाही समावेश आहे. कृषी कायदे रद्द करण्यासाठी सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये अनेकवेळा चर्चा झाल्या, परंतु त्यावर तोडगा अद्याप निघालेला नाही.

शेतकरी नेत्यांनी सांगितलं की, सर्वोच्च न्यायालय स्वतः निर्णय घेऊन नवे कृषी कायदे मागे घेऊ शकतं. तसेच आणखी एका शेतकरी नेते दर्शन सिंह यांनी म्हटलं की, ते कोणत्याही समितीसमोर हजर होणार नाही. संसदेने या विषयावर चर्चा करुन तो सोडविला पाहिजे. आम्हाला कोणतीही बाह्य समिती नको आहे. संयुक्त किसान मोर्चाद्वारे घोषित आंदोलनाच्या कार्यक्रमात कोणताच बदल करण्यात आलेला नाही. आज लोहरीच्या निमित्ताने तीनही कृषी कायद्यांची प्रत शेतकऱ्यांच्या वतीनं जाळण्यात आली. १८ जानेवारी रोजी महिला शेतकरी दिवस साजरा करण्यासाठी, २० जानेवारी रोजी श्री गुरु गोविंद सिंह यांच्या आठवणींमध्ये शपथ घेणं आणि २३ जानेवारी रोजी आझाद हिंद शेतकरी दिवसाच्या निमित्ताने देशभरातील राजभवनांना घेराव घालण्याचा कार्यक्रम आखण्यात आला आहे. तसेच प्रजासत्ताक दिनी देशभरातील शेतकरी दिल्लीला जाऊन शांततेत ‘शेतकरी गणतंत्र परेड’ आयोजित करणार आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments