Monday, March 1, 2021
Home India News विजय दिवस

विजय दिवस

अवघ्या १३ दिवसांच्या युद्धात पाकिस्तानच्या ९३ हजार सैनिकांनी आत्मसमर्पण केले होते. पाकिस्तानी सैन्याने भारतीय लष्करासमोर शरणागती पत्करली होती.

१६ डिसेंबर हा भारतासाठी खूप महत्वाचा दिवस आहे. याच दिवशी १९७१ साली भारतीय सैन्याने पाकिस्तान लष्कराला धूळ चारली होती. अवघ्या १३ दिवसांच्या युद्धात पाकिस्तानच्या ९३ हजार सैनिकांनी आत्मसमर्पण केले होते. पाकिस्तानी सैन्याने भारतीय लष्करासमोर शरणागती पत्करली होती. ४७ वर्षानंतरही, भारत हा दिवस ‘विजय दिवस’ म्हणून मोठ्या अभिमानाने साजरा करतो. पण हे सामान्य युद्ध नव्हते. या युद्धाने जगाच्या राजकीय नकाशामध्ये मोठा बदल घडवून आणला व त्याच्या जखमा अजूनही पाकिस्तानला सलत आहे. त्यावेळी भारताने सुमारे १ लाख युद्धकैद्यांना ताब्यात घेतले होते आणि महत्वाचे म्हणजे बांगलादेशला पाकिस्तानपासून मुक्त केले होते, यानंतर बांगलादेश या नव्या देशाची स्थापना झाली. पूर्व पाकिस्तानमध्ये स्वातंत्र्याचा लढा चालू असताना ३ डिसेंबर १९७१ रोजी हे युद्ध सुरू झाले होते. १३ दिवसांनंतर १६  डिसेंबर रोजी पाकिस्तानी सैन्याच्या बिनशर्त आत्मसमर्पणानंतर हे युद्ध संपले. या युद्धात सुमारे ३,९०० भारतीय सैनिक शहीद झाले, तर ९,८५१ जखमी झाले होते.

पाकिस्तानचे लष्कर हुकुमशहा याहिया खां यांनी २५ मार्च १९७१ ला माजी पाकिस्तानच्या लोक भावनांना लष्करी ताकदीच्या जोरावर चिरडण्याचा आदेश दिला. पूर्व पाकिस्तान पश्चिम पाकिस्तानच्या वर्चस्वामुळे नाराज होता. पूर्व पाकिस्तानच्या लोकांवर अनेक बंधने लादण्यात आली होती. तसेच येथील अनेक नेते तुरुंगात किंवा त्यांना कायमचे संपवण्यात आले होते. अशावेळी पूर्व पाकिस्तानमध्ये सरकारविरोधात प्रचंड असंतोष होता. नागरिकांचे आंदोलन पाकिस्तान सरकार बळाच्या सहाय्याने दडपत होते. याच पार्श्वभूमीवर अनेक शरणार्थी भारतात येऊ लागले. अशा परिस्थितीत हस्तक्षेप करण्यासाठी भारतावर दबाव येऊ लागला. तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी लष्कर प्रमुख जनरल मानेकशॉ यांचा सल्ला घेतला. ३ डिसेंबर, १९७१ ला पाकिस्तानी वायुसेनेच्या विमानांनी भारतीय सीमा ओलांडत पठाणकोट, श्रीनगर, अमृतसर, जोधपूर, आग्रा येथील हवाई अड्ड्यांवर बॉम्ब वर्षाव सुरु केला. त्यावेळी इंदिरा गांधींनी तातडीची मंत्रीमंडळ बैठक घेतली. युद्ध सुरु झाल्यानंतर भारताने पूर्व पाकिस्तानमध्ये सैन्य घुसवत खूलना आणि चटगांववर ताबा मिळवला. १४ डिसेंबर रोजी भारतीय सैन्याने एक गुप्त संदेश पकडला. ज्यानुसार दुपारी अकरा वाजता ढाका गव्हर्नमेंट हाऊसमध्ये एक महत्वाची बैठक होणार होती, ज्यात पाकिस्तानचे अनेक बडे नेते येणार होते. भारताने त्यावेळी या हाऊसवर बॉम्ब टाकला. यामुळे तेथील सैन्य अधिकारी पुरते घाबरुन गेले. भारताने पूर्व पाकिस्तानमध्ये चांगलीच आघाडी घेतली होती. अरोडा आपल्या सैनिकांसोबत दोन तासात ढाका येथे पोहोचणार होते. पाकिस्तानचे कमांडर नियाजी यांच्याकडे आत्मसमर्पण करण्यावाचून अन्य कोणताही पर्याय उपलब्ध नव्हता. अरोडा आणि नियाजी यांनी एकत्र बैठक घेतली. त्यानंतर नियाजी यांनी आत्मसमर्पणाचे कागदपत्र अरोडा यांच्याकडे सूपूर्द केले. भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला होता. हाच तो अविस्मरणीय दिवस.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments