दरवर्षी जानेवारी महिन्याच्या २६ तारखेला भारताचा ‘प्रजासत्ताक दिन’ साजरा केला जातो. भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यावर यंदा कोरोनाचं संकट असलं, तरी थोड्याफार बदलांनी सोहळा त्याच दिमाखात पार पाडला जाणार आहे. त्यासाठीची तयारीही नवी दिल्लीत सुरू झाली. आपला भारत १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. पण देशाची राज्य घटना २६ जानेवारी १९५० रोजी अमलात आणली गेली. म्हणून हा दिवस ‘प्रजासत्ताक दिन’ म्हणून साजरा केला जातो. देशभरात ‘प्रजासत्ताक दिन’ मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. प्रजासत्ताक म्हणजे प्रजेची सत्ता. २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय संविधानाचा स्वीकार करून आपण स्वतंत्र प्रजेची सत्ता स्थापन केली असं मानलं जातं. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले भारतीय संविधान स्वीकारून आपण भारताला लोकशाही राष्ट्र म्हणून स्वीकारलं. १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपला देश ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. त्यामुळे हा दिवस भारताचा स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा केला जातो. मात्र १९३० साली २६ जानेवारीला लाहोर येथे काँग्रेसचं जे अधिवेशन झालं, त्यामध्येच पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संपूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती. याच अधिवेशनात तिरंगा ध्वजही फडकावण्यात आला. या दिवसाची आठवण म्हणून याच दिवशी राज्यघटना अंमलात आणण्याचं निश्चित करण्यात आलं होतं. स्वातंत्र्यांनंतर सार्वभौम भारताची राज्यघटना तयार करण्याचं काम तब्बल २ वर्षे ११ महिने आणि १८ दिवस सुरु होतं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखालील संविधान समितीनं राज्यघटनेचा मसुदा तयार केला. हे संविधान २६ नोव्हेंबर १९४९ या दिवशी स्वीकृत करण्यात आलं. याच दिवशी लोकशाही पर्वाची खऱ्या अर्थानं सुरुवात देशात झाली. त्यानंतर २६ जानेवारी १९५० रोजी देशात संविधान लागू करण्यात आलं.
भारताच्या राजधानीत म्हणजेच, दिल्लीत प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सकाळी ध्वजारोहणानंतर लाल किल्ल्यावरून पंतप्रधान राष्ट्राला उद्देशून भाषण करतात. या समारंभाचा मुख्य कार्यक्रम भारताची राजधानी दिल्ली येथे होतो. प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीमधील इंडिया गेटवर भव्य परेडचं आयोजन केलं जातं. या कार्यक्रमात भारतातील सर्व घटकराज्ये भाग घेतात. भारताच्या सर्व क्षेत्रातील वैभवाचे दर्शन घडविणारी भली मोठी मिरवणूक काढली जाते. प्रत्येक राज्यात, जिल्ह्यात, तालुक्यात, शहरांत आणि गावागावात ‘प्रजासत्ताक दिन’ साजरा केला जातो. आज देशाचा ७२ वा प्रजासत्ताक दिन. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर २६ जानेवारी १९५० रोजी देशात संविधान लागू करण्यात आलं होतं.
राष्ट्रीय शौर्य पुरस्कार दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशातील शूर मुला-मुलींना दिले जातात. या पुरस्काराची सुरुवात १९५७ साली झाली. पदक, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम असं पुरस्काराचं स्वरूप असते त्याचप्रमाणे, पुरस्कार मिळालेल्या मुलांच्या शालेय शिक्षणासाठी आर्थिक सहाय्यसुद्धा केले जाते.