पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी या देशव्यापी लसीकरण मोहिमेचा प्रारंभ करतील. राज्यात सकाळी ९ वाजता मोहिमेची सुरुवात होऊन ती सायंकाळी ५ वाजेपर्यंत चालेल. आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास यांनी सांगितले की, प्रत्येक केंद्रावर १०० जणांना लस देण्याचा प्रयत्न आहे. पंतप्रधान मोदी मुंबईमधील कूपर रुग्णालय आणि जालना जिल्हा रुग्णालयातील केंद्रात लस घेणाऱ्या कर्मचाऱ्यांशी व्हर्च्युअल संवाद साधतील. दवाई भी, कड़ाई भी’, असा नवीन नारा यावेळी मोदींनी दिला. तसंच कोरोना लसीकरणानंतरही मास्क आणि सोशल डिस्टन्स पाळणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं. महाराष्ट्राने याआधी ५११ लसीकरण केंद्रे स्थापन करण्याचे नियोजन केले होते. पण गेल्या आठवड्यात टोपे व केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील बैठकीनंतर ही संख्या ३५० केली. मात्र, नेटवर्क व इतर अडचणींमुळे ही संख्या घटवून २८५ करण्यात आली.
कोरोनाविरुद्धच्या लढाईत जगातील सर्वात मोठ्या पहिल्या लसीकरण मोहिमेची सुरुवात शनिवारपासून होत आहे. ३ हजार केंद्रांवर लसीकरण होईल. आधी संबंधितांची लेखी सहमती घेऊन सहमती पत्रही भरून घेतले जाईल. ज्यांची नावे यादीत आहेत, त्यांच्याव्यतिरिक्त काहींची नावे राखीव ठेवली आहेत. मुख्य यादीतील लोक आले नाहीत तर राखीव लोकांना लसीकरणासाठी बोलावता यावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व लोकांना मोबाइलवर संदेश पाठवला जाईल. प्रत्येक केंद्रावर १०० जणांना बोलावले जात आहे. यादीत समावेश असलेल्या एकाही व्यक्तीला लसीकरण केंद्रावरून परत पाठवले जाणार नाही.
राज्यभरात शनिवारपासून कोरोना लसीकरणास सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांसह कोरोना लसीची पूजा करून सर्वांच्या उत्तम आरोग्याची प्रार्थना केली. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात फ्रंटलाईन वर्कर्सना लस देण्यात येणार आहे. त्याबाबत पहिली प्रतिक्रिया देत टोपे म्हणाले, मागील दहा महिन्यांत ज्यांनी लाखोंच्या संख्येनं नागरिकांचे प्राण वाचवण्याचं काम केलं आज त्यांना प्राधान्यानं लस दिली जात आहे. कोरोनाच्या या काळात जवळपास ९६ टक्के रुग्ण बरे करण्याचं काम आरोग्य विभागानं केलं, त्यांच्या प्रयत्नांना मी सलाम करतो. प्राधान्यक्रमा नुसार, रुग्णवाहिका चालक, परिचारिका, डॉक्टर, वॉर्डबॉय यांना लस देण्यात येणार आहे. त्यांच्या कार्याला माझा सलाम, असं म्हणत आपल्याला, समाजाला सुरक्षितता पुरवणाऱ्या पोलीस कर्मचारी, स्वच्छतेची सेवा देणाऱ्या सफाई कर्मचारी यांना लस देत सुरक्षित करण्यावर या टप्प्यात भर देण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. लसीच्या संशोधनामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या संशोधकांच्या कार्याला सलाम करत टोपे यांनी भारतीय लस ही पूर्णपणे सुरक्षित आणि स्वस्त असल्याचं सांगितलं. शिवाय लसीच्या उपलब्धतेमुळं जनतेचा जीव सुरक्षीत वाटू लागला आहे, तेव्हा आता नागरिक आत्मविश्वासानं आयुष्य जगू शकतील. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आणि संशोधकांच्या अथक प्रयत्नानंतर देशभरात कोरोना लसींचं वितरण करण्यात आलं आहे. देशव्यापी कोरोना लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे.