Friday, February 26, 2021
Home India News पुन्हा उडाला पेट्रोल–डिझेलचा भडका

पुन्हा उडाला पेट्रोल–डिझेलचा भडका

महाराष्ट्रभरातील तब्बल १९ जिल्ह्यांमध्ये पेट्रोलच्या किंमतींने ९० रुपयांचा टप्पा ओलांडला असून मुंबई त्या उंबरठ्यावर आहे.

कोरोना काळात पेट्रोल – डिझेलच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे. मागील काही दिवसांत राज्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने वाढताना दिसत आहेत. त्यात आता राज्यातील सात जिल्ह्यामध्ये डिझेलचे दर ८० रुपयांच्या वर गेले आहेत. तेलाची आयात महागल्याने कंपन्यांनी इंधन दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आज शनिवारी देशभरात पेट्रोल आणि डिझेलमध्ये पुन्हा वाढ करण्यात आली. पेट्रोल २७ पैशांनी महागले आहे तर डिझेल मध्ये २५ पैशांची वाढ झाली आहे. काल सरकारी तेल कंपन्यांनी डिझेल- पेट्रोलच्या किंमती वाढवल्याचे जाहीर केले आहे. डिझेलच्या दरात १८ ते २० पैशांची वाढ झाली तर पेट्रोलचे दर १५ ते १७ पैशांने वाढले आहेत. त्यात आज पुन्हा वाढ झाली आहे. २५ नोव्हेंबरला ७७ रुपये ९ पैसे प्रति लिटर दराने असणारे डिझेल आज ७९ रुपये ६६ पैसे इतके झाले आहे.

इंधन वाढ शतकपुर्तीकडे

मागील ९ दिवसांमध्ये डिझेलमध्ये १ रुपया ७६ पैसे इतकी दरवाढ झाली आहे. मुंबईत मागील काही दिवसांपासून डिझेलच्या किंमतीत होणारी दरवाढ ही आता ८० रुपयांपर्यंत येऊन पोहचली आहे तर दुसरीकडे पेट्रोलच्या किंमतीमध्ये देखील सातत्याने दरवाढ सुरूच आहे. आज पेट्रोलचा भाव ९० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. वाढत जाणाऱ्या पेट्रोल- डिझेलच्या किंमतीमुळे आता सर्वसामान्य नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्रभरातील तब्बल १९ जिल्ह्यांमध्ये पेट्रोलच्या किंमतींने ९० रुपयांचा टप्पा ओलांडला असून मुंबई त्या उंबरठ्यावर आहे. मुंबई शहरामध्ये डिझेलची किंमत २४ पैशांनी वाढून ७९.६६ रुपयांवर गेली आहे. त्याचप्रमाणे पेट्रोलच्या किंमतीही १९ पैशांनी वाढल्या आहेत. सोलापूर, अमरावती, औरंगाबाद, नागपूर, परभणी, नांदेड आणि बुलढाणा या जिल्ह्यात डिझेलच्या किंमत एका लिटरला ८० रुपयांच्या वर गेली आहे. परभणीत पेट्रोल दर सर्वाधिक ९१.९५ रुपये इतके आहे.

युरोपात पुन्हा लॉकडाउन केल्याने इंधन मागणीत मोठी घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे युरोपातील रिफायनरी तात्पुरत्या बंद ठेवण्याचा विचार केला जात आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या उत्पादनाने वेग घेतला असून लवकरच काही देशांमध्ये लसीकरण सुरु होण्याची शक्यता आहे. तेल उत्पादक देशांची संघटना ओपेकने जानेवारीपासून उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे अर्थव्यवस्था सुरळीत होऊन इंधन मागणी वाढेल, असा अंदाज ओपेकने व्यक्त केला आहे. या वृत्ताने जागतिक कमॉडिटी बाजारात तेलाच्या भावात तेजी आली आहे. आज सिंगापूरमध्ये क्रूड ऑइलचा भाव ०.४१ डॉलरने वाढून प्रती बॅरल ४२.१५ डॉलर झाला आहे तर ब्रेंट क्रूडचा भाव ०.७६ डॉलरने वाढून ४४.९६ डॉलर इतका झाला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments