शेतकऱ्यांच्या विविध संघटनांनी ८ डिसेंबरला देशव्यापी बंद पुकारण्याची हाक दिली आहे. गेल्या ११ दिवसांपासून पंजाब-हरियाणाचा शेतकरी त्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन करीत आहे. हा बंद यशस्वी व्हावा, शेतकऱ्यांच्या मागण्यांचा आवाज जगभरात जावा हीच शिवसेनेची भावना आहे. महाराष्ट्रातील परिस्थिती वेगळी आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शिवसेना तसंच महाविकास आघाडी सरकारने सतत सकारात्मक, समन्वयाची भूमिका घेतल्याने पंजाब-हरियाणासारखी परिस्थिती महाराष्ट्रात उद्भवू शकत नाही. पण पंजाब-हरियाणाचा शेतकरी आंदोलनात उतरला हे केंद्राचे अपयश आहे, अशी टीकाही त्यांनी केली असे शिवसेनेचे संजय राऊत म्हणाले. कृषी कायद्याच्या विरोधात पंजाब-हरियाणाच्या शेतकऱ्यांनी गेले ११ दिवस राजधानी दिल्लीला वेढा घातलाय. मोदी सरकारने शेतकरी विरोधातील कायदे तात्काळ मागे घेण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील शेतकरी दिल्लीच्या विविध सीमांवर आंदोलन करत आहेत. दिल्लीला येणारे अनेक रस्ते बंद आहेत. दिल्ली-हरियाणा सीमेवर सिंधु, पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांच्या मागण्यांना आणि आंदोलनाला शिवसेनेने जाहीर समर्थन दिले आहे.
शेतकऱ्यांच्या देशव्यापी बंदलाही पाठिंबा देत आहे, अशी घोषणा शिवसेनेचे नेते आणि मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी केली. अकाली दलाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या मागण्या आणि आंदोलनाविषयी प्रदीर्घ चर्चा केली. विविध पक्षांनीही शेतकऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा जाहीर केला आहे. शनिवारी ५ डिसेंबर दिल्लीतील विज्ञान भवनात आंदोलनकर्ते, शेतकरी आणि सरकारमध्ये चर्चा झाली. “नवीन कृषी कायद्यांमुळे किमान आधारभूत किमतीवर काहीच परिणाम होणार नाही. हा राज्यांचा प्रश्न आहे. याचा राज्यातील बाजार समितीवर कोणताच परिणाम होणार नाही,” असे आश्वासन पाच तास चाललेल्या चर्चेत शेतकर्यांना सरकारने दिले. दिल्लीत सुरू झालेली थंडी आणि कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता, आंदोलन स्थगित करा, ज्येष्ठ नागरिक आणि मुलांना घरी पाठवण्याची विनंती सरकारने केली आहे.
टिकरी, झरौदा, औचंदी, लामपुर, मानीयारी आणि मंगेश परिसरातील सीमा सील करण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांच्या सर्व शंका आणि प्रश्न दूर केले जातील, असा दावा केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने केलाय. मात्र, शेतकरी सरकारचा हा दावा मानण्याच्या मनस्थितीत नाही आहेत. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी ८ डिसेंबरला करण्यात येणाऱ्या ‘भारत बंद’ मध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.