अर्थमंत्री निर्मला सीतारमण आपला सलग तिसरा अर्थसंकल्प मांडत आहेत. या अर्थसंकल्पात आरोग्य, सार्वजनिक वाहतूक, रेल्वे, शहरांचा विस्तार यावर भरीव तरतूद करण्यात आल्याचं स्पष्ट होते आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पाचे सादर करताना महाराष्ट्रासाठी एक मोठी घोषणा केली आहे. अर्थमंत्र्यांनी नाशिक आणि नागपूर मेट्रोसाठी मोठी आर्थिक तरदूत जाहीर केली आहे. आत्मनिर्भर भारत योजनेच्या अंतर्गत नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यासाठी ५ हजार ९७६ कोटी तर नाशिक मेट्रोसाठी २ हजार ०९२ कोटींची तरतूद केली आहे. राज्यातील मेट्रो प्रकल्पाला बळ देण्याचं काम या घोषणेतून सार्थ होणार आहे.
नाशिकच्या टायर बेस मेट्रोचे कौतुक केंद्रीय अर्थमंत्र्यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात केलं असून आता या संकल्पनेला आता देशपातळीवर राबवण्यात येणार आहे अशीही घोषणा करण्यात आली आहे. नाशिक मेट्रोसाठी हा अभिमानास्पद क्षण असून आपण यामुळे समाधानी असल्याची भावना महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात नाशिकमध्ये राबवण्यात आलेल्या टायर बेस मेट्रो म्हणजे आर्टिक्युलेटेड बस मॉडेलचे कौतुक करण्यात आले असून त्याला आता राष्ट्रीय प्रकल्प म्हणून स्वीकारण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. नाशिकच्या या टायर बेस मेट्रोची अंमलबजावणी आता देशाच्या इतर शहरातही करण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली आहे. त्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी सर्व नाशिककरांचे कौतुक आणि अभिनंदन पण केले.
भारतीय रेल्वेने देशासाठी राष्ट्रीय रेल्वे योजना २०३० तयार केली असून अर्थसंकल्पात रेल्वेसाठी एकूण १.१० लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तर येत्या काळात रेल्वेमध्ये लक्झरी कोचेस देखील सामील करणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं आहे. कोरोना व्हायरस रोखण्यासाठी लागू केलेल्या कठोर टाळेबंदीचा फटका रेल्वे सेवेला बसला होता. रेल्वेची लांब पल्ल्याची प्रवासी वाहतूक ठप्प असली तरी माल वाहतुकीतून रेल्वेला आधार मिळाला. गेल्या सहा महिन्यात देशांतर्गत माल वाहतुकीतून रेल्वेने बऱ्यापैकी कमाई केली. मात्र रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण, दुहेरी आणि चौपदरीकरण, गेल्या अर्थसंकल्पात घोषीत करण्यात आलेली पायाभूत सुविधांच्या विकासाची कामे पूर्ण कारण्यासाठी हा निधी वापरण्यात येणार आहे. तसेच २०३० पर्यंत हायटेक रेल्वेचं लक्ष ठेवण्यात आलं आहे. तसेच भारतीय रेल्वेसह मेट्रो, सिटी बस सेवेला प्रोत्साहन दिलं जाईल. यासाठी १८ हजार कोटी रुपये लागणार आहेत. आता मेट्रो लाईट आणण्यासाठी भर दिला जाणार आहे. कोच्ची, बंगळुरु, चेन्नई, नागपूर, नाशिकमध्ये मेट्रो प्रकल्पाला प्रोत्साहन देणार असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले.