देशभरातील विविध भागांमध्ये कोरोना लसीच्या वितरणास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र, गुजरात अशा भागांमध्ये कोरोनाची लस निर्धारित ठिकाणांच्या दिशेनं मार्गस्थ झाली आहेत. कोरोना लस, म्हणजे सध्याच्या घडीला खऱ्या अर्थानं एका मोठ्या संकटातील लाइफ सेव्हर. याच लाइफ सेव्हर लसीच्या येण्यानं बेळगावमध्ये लसीचं जंगी स्वागत करण्यात आलं. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास सीरमच्या कोविशिल्ड लस आणणाऱ्या वाहनाने कर्नाटक हद्दीत प्रवेश केला. वाहनानं हद्द ओलांडताच पोलीस बंदोबस्तात लस आणणारं हे वाहन बेळगावच्या व्हॅक्सिन डेपो येथे आणण्यात आलं. तिथं सुवासिनींनी लस आणलेल्या वाहनाची आरती केली. आरती केल्यानंतर वाहनातील लसी तेथील कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवण्यात आल्या. प्रत्येक राज्यात, शहरात या लसीचं मोठ्या जोशात, अगदी दमदारपणे व तितक्यात सकारात्मकतेनं स्वागत केले गेले. पण, बेळगावकरांचं स्वागत अव्वल असून एक पाऊल पुढे असल्याचे निदर्शनास आले.
वर्षभरापासून कोरोना विषाणूच्या संसर्गाचीच दहशत साऱ्या जगावर आणि देशावर पाहायला मिळालं. दर दिवशी सातत्यानं वाढणारी कोरोना रुग्णसंख्या आणि आरोग्य यंत्रणांपुढचं आव्हान देणारी परिस्थिती नक्कीच चिंताजनक होती. पण, आता या विषाणूची प्रतिबंधात्मक लस देशात दाखल झाल्यामुळं उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. स्वागताचा हा उत्साह एवढ्या वरच थांबला नाही. अगदी लसीच्या आगमनासाठी बँडबाजाचीही व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळं खऱ्या अर्थानं लस बँडबाजा बारात सह दाखल झाली असं म्हणायला हरकत नाही. कोरोनावर मात करण्यासाठीच्या या महत्त्वाच्या टप्प्यावर सध्याच्या घडीला १ लाख ४७ हजार लसी बेळगावात आल्या आहेत. दाखल झालेल्या या लसी आता आठ जिल्ह्यांना पुरवण्यात येणार आहेत. ज्याअंतर्गत एकट्या बेळगाव जिल्ह्यासाठी 37 हजार लसी आल्या आहेत.
लसीकरण संदर्भात आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले की, मला समाधान आहे, आपण लसीकरणासाठी आठ लाख लोकांच्या नावाची नोंदणी केली आहे. त्याच्या तुलनेत लसीचे डोस थोडे कमी आले आहेत. पण जेवढी लस आली आहे ती लस आज रात्रीपर्यंत किंवा उद्या पहाटेपर्यंत सर्व विभागीय कार्यालयांमध्ये निश्चितपणे पोहोचती केली जाईल. तर काही जिल्ह्यांमध्ये उद्या रात्रीपर्यंत लस पोहोचेल. तसेच १५ जानेवारीपर्यंत सर्व लसीकरण केंद्रांवर ही लस १००% पोहोचणार आहे. प्रत्येक लसीकरण केंद्रावर लसीची साठवणूक करण्यासाठी आवश्यक असणारी सर्व उपकरणं मुबलक प्रमाणात उपलब्ध करण्यात आलेली आहेत. पुढे बोलताना ते म्हणाले की, १६ जानेवारी रोजी सकाळी पंतप्रधानांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपूर्ण देशभरात लसीकरणाचं उद्घाटन होईल. महाराष्ट्रातील दोन रुग्णालयं एक कूपर रुग्णालय आणि दुसरं जालन्यातील जिल्हा रुग्णालय पंतप्रधानांशी यावेळी थेट संवाद साधू शकणार आहेत. अशा प्रकारे १६ जानेवारीला देशासह राज्यात लसीकरणाचं उद्घाटन केलं जाणार आहे.