अक्षय इंडीकर याने दिग्दर्शित केलेला ‘स्थलपुराण’ या चित्रपटातील विशेष दिग्दर्शकीय कामगिरीला त्याला यंग सिनेमा अवॉर्ड या पुरस्कारानं सन्मानित केलं गेले आहे. ऑस्ट्रेलियातील ‘आशिया पॅसेफिक स्क्रीन अकॅडमी’, ‘ग्रिफिथ स्कूल’ आणि ‘युनेस्को’ यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो. यानिमित्तानं देशभरातून अक्षयवर शुभेच्छा आणि कौतुकाचा वर्षाव होतो आहे. आशिया खंडाचा अकॅडमी अवॉर्ड अशी ओळख असलेला ‘यंग सिनेमा अवॉर्ड’ हा पुरस्कार यंदा मराठी दिग्दर्शक अक्षय इंडीकर याला जाहीर झाला आहे. सिने जगतातल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो. आशिया पॅसिफिक स्क्रीन अकॅडमी’च्या या पुरस्काराचं प्रमुख वैशिष्ट्यं म्हणजे, पुरस्कार विजेत्याला पुरस्काराबरोबर आशिया पॅसिफिक स्क्रीन अकॅडमीचं सन्माननीय सदस्यत्व मिळतं. या पुरस्कारामुळे संपूर्ण जगातल्या केवळ १३०० लोकांना मिळणाऱ्या या सदस्यत्वाचा बहुमान आता अक्षय इंडीकरला मिळणार आहे.
मूळच्या सोलापूरच्या असलेल्या अक्षयने यापूर्वीही दिग्दर्शित केलेल्या त्रिज्या या मराठी चित्रपटाला चीनमध्ये झालेल्या २२ व्या शांघाय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पहिल्या पाचांमध्ये स्थान मिळाले होते, त्याच प्रमाणे न्यू एशियन टॅलेंट साठी नामांकन आणि बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात क्रिस्टल बेअर साठी नामांकन मिळालं होतं. अक्षयने सिनेसृष्टीतील पदार्पणातच आंतरराष्ट्रीय मंच गाजवल्याचे दिसते. अक्षयनं ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांच्या जीवनपटावरील माहिती कथनात्मक फिल्म उदाहरणार्थ नेमाडे चेही दिग्दर्शन केलं आहे. आता पुन्हा एकदा स्थलपुराणच्या निमित्तानं जागतिक पातळीवर अक्षयची दखल घेतली जाते आहे.
आशिया पॅसिफिक विभागातील सुमारे ७० देशांमधून या पुरस्कारासाठी एकाची निवड केली जाते. वयाच्या अवघ्या २९ व्या वर्षी सोलापूरच्या अक्षय इंडीकर याला मिळालेला हा बहुमान ही मराठी सिनेसृष्टीसाठीच नवे तर अवघ्या भारतीय सिनेजगतासाठी आनंदाची आणि अतिशय अभिमानास्पद बाब आहे. यापूर्वीहि स्थलपुराण हा चित्रपट ‘बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट’ महोत्सवातही नावाजला गेलाय. स्थलपुराण ही एक कोकणातील एका गावात घडणारी कथा आहे. गोवा राज्यात त्याचे चित्रीकरण करण्यात आले आहे. हा चित्रपट आठ वर्षांच्या दिघू नावाच्या अतिशय लोभसवाण्या मुलाची गोष्ट सांगतो. वडिलांच्या शोधात अनुभवलेल्या अनेक घटनांचा साक्षीदार बनणारा दिघू निसर्गाला, आजूबाजूच्या जगाला, जन्म मृत्यूच्या चक्राला समजून घेण्याचा प्रयत्न करताना दिसतो. त्या प्रयत्नांचा वेध घेणारा हा सिनेमा असल्याचं अक्षयने सांगितले.