Sunday, February 28, 2021
Home International News जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अलिबाबा समूहाचे जॅक मा बेपत्ता

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अलिबाबा समूहाचे जॅक मा बेपत्ता

कोरोना काळात विविध देशांना मदत करणारे जॅक मा अचानक बेपत्ता झाल्यामुळे चीनच्या हुकुमशाहीवर पुन्हा एकदा जगभरातून प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये गणले जाणारे अलिबाबा समूहाचे संस्थापक जॅक मा हे गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता आहेत. काही दिवसांपूर्वी जॅक मा यांनी चीनच्या बँकिंग व्यवस्थेवर टीका केल्यानंतर जॅक मा कुठेही दिसलेले नाहीत. चिनमध्ये हे पहिल्यांदाच घडत नसून याआधीही अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. याआधीही सरकार विरोधात बोलणाऱ्या अनेकांना चिनमध्ये नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं. याआधी शी जिनपिंग सरकारवर टीका करणारे प्रॉपर्टी बिजनसमन रेन झिकियांग अचानक बेपत्ता झाले होते. त्यांनी कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी शी जिनपिंग यांना सल्ला दिला होता. त्यानंतर त्यांना १८ वर्षांसाठी कारागृहात पाठवण्यात आलं होतं. चीनचे अरबपती शिआन जिआनहुआ वर्ष २०१७ पासून नजरकैदेत आहेत.

जॅक मा यांनी चीनची बँकिंग व्यवस्था आणि सरकारी बँकांसंदर्भात बोलताना ऑक्टोबर मध्ये शांघाईत दिलेल्या भाषणात टीका केली होती. जगभरातील कोट्यवधी लोकांचा आदर्श असलेले जॅक मा यांनी सरकारला आव्हान दिलं होतं. त्यांनी चीनमधल्या बँकिंग व्यवस्थेवर, व्यापारांवर आणि अर्थव्यवस्थेवर मोठ्या प्रमाणावर टीका केली होती. जॅक मा यांच्या भाषणानंतर सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाकडून संताप व्यक्त करण्यात आला होता. तेव्हापासून जॅक मा यांच्यावर सत्ताधाऱ्यांकडून निशाणा साधण्यात येत होता. तसेच जॅक मा यांनी स्थापन केलेला अलिबाबा समूहावर कारवाई करण्यात आली होती. एवढंच नाहीतर जॅक मा यांच्या इतर उद्योगांवरही कारवाई करण्यात आल्याचं मीडिया रिपोर्ट्समधून समोर येत आहे.

नोव्हेंबर महिन्यात चिनी अधिकाऱ्यांनी जॅक मा यांच्यावर कारवाई करत धक्का दिला. जॅक मा यांच्या एंट ग्रुपचे ३७ अब्ज डॉलर्सचे आयपीओ निलिंबित केले. जॅक मा यांच्या एंट ग्रुपचे आयपीओ रद्द करण्याचे आदेश थेट चिनी राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या वतीने देण्यात आले होते. त्यानंतर जॅक मा यांना ख्रिसमसच्या आदल्या दिवशी जॅक मा यांच्यावर देशाबाहेर जाण्यास बंदी घालण्यात आली. जोपर्यंत अलिबाबा समूहावर करण्यात आलेली कारवाई सुरु आहे,  तोपर्यंत जॅक मा देशाबाहेर जाऊ शकत नाहीत, असं चिनी अधिकाऱ्यांनी जॅक मा यांना सांगितलं होतं. त्याचप्रमाणे जॅक मा त्यांचा प्रसिद्ध टीव्ही शो अफ्रीका बिजनेस हीरोज यातही नोव्हेंबरपासून दिसलेले नाहीत. एवढंच नाहीतर या शोमधूनही जॅक मा यांचा फोटोही हटवण्यात आला आहे. या शोच्या फायनलपूर्वी काही आठवड्यांआधी जॅक मा यांनी एक ट्वीट केलं होतं. त्या ट्वीटमध्ये ते म्हणाले होते की, ते सर्व स्पर्धकांच्या भेटीची प्रतिक्षा करु शकत नाहीत. त्यानंतर पासून त्यांच्या तिनही ट्विटर अकाउंटवरुन एकही ट्वीट करण्यात आलेलं नाही.

चिनी सरकारच्या विरोधात वक्तव्य केल्यामुळे चिनमधील सत्ताधाऱ्यांनी जॅक मा यांचा आवाज दाबवण्याचा प्रयत्न केला असल्याचं बोललं जात आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments