ब्रिटन सरकारने याबाबतची माहिती संसदेत दिली, आरोग्य मंत्री मॅट हँकॉक यांनी हाउस ऑफ कॉमन्समध्ये म्हटले की, लंडन आणि आजूबाजूच्या परिसरात कोरोना बाधितांची संख्या सात दिवसांमध्ये दुप्पट झाली आहे. त्यामुळे तातडीने पावले उचलण्याची आवश्यकता होती. वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी लंडन आणि जवळपासच्या परिसरात तिसऱ्या पातळीवरील निर्बंध लागू करण्यात आले आहेत. याचाच अर्थ पूर्णपणे लॉकडाउन लागू करण्यात येण्याची शक्यता आहे. हँकॉक यांनी सांगितले की, ब्रिटनमध्ये नव्या प्रकारच्या कोरोना विषाणूची ओळख पटली आहे. इंग्लंडच्या दक्षिण-पूर्व भागात वेगाने कोरोना फैलावण्यामागे हे देखील एक कारण असू शकते. प्राथमिक संशोधनात कोरोना विषाणूचा हा नवीन प्रकार सध्याच्या विषाणूपेक्षा अधिक वेगाने फैलावत आहे. सध्या नवीन प्रकारच्या विषाणूची लागण एक हजार बाधितांना झाली आहे. मुख्यत: दक्षिण इंग्लंडमध्ये हा विषाणू अधिक वेगाने फैलावत आहे. कोरोनाच्या नव्या प्रकाराची माहिती जागतिक आरोग्य संघटनेला देण्यात आली आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला आळा घालण्यासाठी काही देशांमध्ये लसीकरण सुरू करण्यात आले आहे. मात्र, कोरोनाचे संकट अधिक वाढण्याचे चिन्हे दिसत आहेत. ब्रिटनमध्ये कोरोनाच्या तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून अलर्ट जारी करण्यात आला आहे. करोना संसर्गाच्या नव्या विषाणू प्रकारामुळे बाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्यामुळे प्रशासनाने तातडीची हालचाल करण्यास सुरुवात केली असून पूर्णपणे लॉकडाउन लागू केला आहे.
मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनीही मोठा इशारा दिला आहे. आगामी चार ते सहा महिने महासाथीच्या दृष्टीने आव्हानात्मक असणार असल्याचे त्यांनी सांगितले. बिल अॅण्ड मेलिंडा फाउंडेशनचे सह-अध्यक्ष बिल गेट्स यांनी दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, कोरोना महासाथीच्या आजारात आगामी चार ते सहा महिन्यांचा काळ वाईट असू शकतो. त्यामुळे या काळात जेवढ या महामारीपासून आपले संरक्षण करणे गरजेचे आहे. इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मॅट्रिक्स अॅण्ड अॅवेल्यूएशनच्या अंदाजानुसार, दोन लाखांहून अधिक जणांचा मृत्यू होण्याची शक्यता आहे. मास्कचा वापर करणे, सोशल डिस्टेंसिंग आदीसारख्या उपाययोजना अंमलात आणल्यास हे संभाव्य मृत्यू रोखता येऊ शकतात. हँकॉक यांनी सांगितले की, राजधानीमध्ये दर सात दिवसांनी बाधितांची संख्या दुप्पट होत आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत २३ डिसेंबर रोजी एक आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.