गेल्या रविवारी अमेरिकेच्या कोषागार आणि वाणिज्य विभागावर सायबर हल्ला झाल्याची माहिती उघड झाली होती. जवळपास महिनाभरापासून हा हल्ला सुरू होता आणि रविवारी त्याची माहिती मिळाल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे होते. अमेरिकेच्या ऊर्जा विभागावर सायबर हल्ला झाला आहे आणि हा हल्ला आतापर्यंतच्या कुठल्याही सायबर हल्ल्यापेक्षा मोठा असल्याचं अमेरिकेच्या ऊर्जा विभागाने सांगितलं आहे. अमेरिकेच्या अण्वस्त्रांची देखरेख ही या विभागाची मुख्य जबाबदारी आहे. मात्र, हॅकिंगचा शस्रास्त्र गोदामावर कुठलाही परिणाम झाला नसल्याचंही विभागाने स्पष्ट केलं आहे. दुसरीकडे मायक्रोसॉफ्ट या टेक कंपनीनेदेखील आम्हाला आमच्या सिस्टिममध्ये धोकादायक सॉफ्टवेअर सापडल्याचं सांगितले. रशियाने हा हल्ला केला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. परंतु, रशियाने मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत.
US cyber-attack: Over 50 firms affected by massive data breach through SolarWindshttps://t.co/CNfGkVYxsL#cybersecurity #databreach #tech #encryption #hacked #leaked #privacy #security #hacker #leaks #news #usa #gov #trump #govt #solarwinds #cisa #fbi #microsoft #cisco #equifax pic.twitter.com/qwJjDxUPDA
— Linkdood (@LinkdoodAsia) December 21, 2020
सायबर सिक्युरिटी इन्फ्रास्ट्रक्चर एजन्सी (सीसा) ही अमेरिकेची सर्वोच्च सायबर एजन्सी आहे. ‘मालवेअरमुळे केवळ बिझनेस नेटवर्कचं नुकसान झाल्याचं’ प्रवक्त्या शायलीन हायन्स यांनी म्हटलं आहे. मार्च २०२० मध्येच हॅकिंग सुरू झालं होतं, असे सीसाने सांगितलं. मात्र, या हल्ल्यात कोणती माहिती चोरण्यात आली, याचा अजून पत्ता लागलेला नाही. या हल्ल्यामुळे ‘महत्त्वाच्या पायाभूत स्ट्रक्चरचं नुकसान’ झाल्याचं सीसाने सांगितलं. तसंच या सायबर हल्ल्यामुळे फेडरल एजंसी आणि खाजगी क्षेत्रातील कंपन्यांच्या सुरक्षेलाही बाधा पोहोचली. या नुकसानीमुळे ‘गंभीर धोके’ निर्माण झाल्याचं सीसाचं म्हणणं आहे.
एकीकडे ट्रम्प यांनी या हल्ल्याबद्दल काहीही प्रतिक्रिया दिली नसून, दुसरीकडे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी सायबर सुरक्षेला बायडन प्रशासन सर्वोच्च प्राधान्य देणार असल्याचं म्हटलं आहे. बायडन म्हणाले, “सर्वात आधी विरोधकांना सायबर हल्ला करण्यापासून रोखायला हवे. आम्ही हे करू आणि याला आमचं प्राधान्य असणार आहे. अशाप्रकारचे हल्ले करणाऱ्यांना मोठी नुकसान भरपाई द्यावी लागेल. शिवाय, अमेरिकेच्या सहकारी आणि मित्र राष्ट्रांशी चर्चा करून एकत्रितपणे हे लागू करण्यात येईल.” गुरुवारी या हल्लाविषयी बोलताना ‘हा हल्ला परतवून लावणं अत्यंत क्लिष्ट आणि आव्हानात्मक असेल’, असं सीसाने म्हटलं आहे. अण्वस्त्राची सुरक्षा करणाऱ्या नॅशनल न्युक्लिअर सिक्युरिटी अॅडमिनिस्ट्रेशन म्हणजेच NNSA च्या सुरक्षा ऑपरेशन्सचं कुठलंही नुकसान झालं नसल्याची माहितीही त्यांनी दिली .
हल्ल्याची व्याप्ती आणि परिणाम बघता हा हल्ला उल्लेखनीय म्हणावा लागेल’, असं मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष ब्रॅड स्मिथ यांनीही म्हटले आहे. हा सामान्य सायबर हल्ला नाही. या हल्ल्याने केवळ अमेरिकाच नाही तर संपूर्ण जगासाठी गंभीर तांत्रिक त्रुटींची शक्यता उघड केल्याचं ते म्हणाले.