Monday, March 1, 2021
Home International News जो बायडन यांच्या शपथविधी सोहळ्यात घातपाताची शक्यता होती

जो बायडन यांच्या शपथविधी सोहळ्यात घातपाताची शक्यता होती

६ जानेवारी २०२१  रोजी अमेरिकेतील कॅपिटल इमारतीवर झालेल्या हल्ल्यानंतर पुन्हा तशी स्थिती निर्माण होऊ नये, म्हणून अमेरिकेतील नॅशनल गार्डच्या तुकड्या वॉशिंग्टनमध्ये पाठवण्यात आल्यात. ट्रंप समर्थकांनी १७ जानेवारी २०२१  ला सशस्त्र आंदोलनाची धमकी दिली आहे आणि वॉशिंग्टन डीसीमध्ये मोर्चा काढण्याचाही इशारा दिला आहे.  मात्र, सुरक्षेचा बंदोबस्त पाहता ट्रंप समर्थकांच्या काही गटांनी या मोर्चापासून दूर राहण्याचं आवाहन केलंय.  मेरीलँड, न्यू मेक्सिको आणि यूटाच्या राज्यपालांनी संभाव्य निदर्शनाआधी आणीबाणीच्या स्थितीची घोषणा केली आहे. तर कॅलिफोर्निया, पेन्सिल्व्हेनिया, मिशिगन, वर्जीनिया, वॉशिंग्टन आणि विस्कॉन्सिन यांनी नॅशनल गार्ड्स तैनात केलेत. अमेरिकेच्या सर्व ५० राज्यं आणि डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबियामध्ये २० जानेवारी २०२१ रोजी होणाऱ्या इनॉग्रेशन आधी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. याच कार्यक्रमात अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडन राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर हिंसक निदर्शनांची शक्यता पाहता सर्व राज्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

अमेरिकेचे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की ते जो बायडेन यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत. ७८ वर्षीय डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते बायडेन २० जानेवारीला अध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. त्याचबरोबर,  ५६ वर्षीय भारतीय वंशाच्या नेत्या कमला हॅरिस उपराष्ट्रपतीपदाची सूत्रे स्वीकारतील.  आपल्या ट्विटर अकाऊंटवर १२ तासांच्या बंदीनंतर ट्रम्प यांनी दोन ट्विट केले. ते म्हणाले, “जे लोक विचारत आहेत त्यांना मी सांगेन की मी २० जानेवारीला शपथविधी कार्यक्रमाला जाणार नाही.”

अमेरिकेतील नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन २० जानेवारीला राष्ट्राध्यक्ष कार्यालय व्हाइट हाऊसची सूत्रे हाती घेतील. त्यांनी पहिल्या दहा दिवसांत ट्रम्प यांच्या कार्यकाळातील वादग्रस्त निर्णय बदलून नवी अमेरिका उभी करण्याच्या अनेक प्रस्तावांना हिरवा कंदील दाखवण्याची तयारी दर्शविली आहे. व्हाइट हाऊसचे नवे चीफ ऑफ स्टाफ रोन क्लीन म्हणाले,  बायडेन कार्यकाळाच्या पहिल्या दिवशी देशासमोर चार मोठी आव्हाने आहेत. कोरोना महामारी,  आर्थिक संकट, पर्यावरणासंबंधी संकट व वंशभेदाशी तोंड देण्यासाठी सुमारे एक डझन प्रस्तावांवर स्वाक्षरी करतील. अमेरिकेला पुन्हा पॅरिस करारामध्ये समाविष्ट करणे, सात इस्लामिक राष्ट्रांवरील प्रवास निर्बंधांना रद्द करणे हे प्रस्ताव असतील.

वॉशिंग्टन डीसीमध्ये बायडेन यांच्या शपथ समारंभात सशस्त्र लोक हस्तक्षेप करण्याची शक्यता आहे,असा इशारा एफबीआयने दिला आहे. त्याचा सामना करण्यासाठी राजधानीचे रूपांतर छावणीत करण्यात आले आहे. २५ हजारांहून जास्त नॅशनल गार्ड‌्सची तैनाती करण्यात आली आहे. कॅपिटल हिल्सवरील हिंसाचारानंतर सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्यात आली. शपथ समारंभाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एफबीआय या गुप्तचर संस्थेने वॉशिंग्टनमध्ये पुन्हा हिंसाचाराची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे २० ते २५ टक्के लोक शपथविधीच्या दिवशी आपले घर सोडून इतर शहरांत आश्रय घेण्याच्या तयारीत आहेत. पॅट्रियट अॅक्शन्स फॉर अमेरिका हा गट हिंसेसाठी लोकांना चिथवत आहे. त्यामुळे कर्फ्यूसारखी स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. रस्ते बंद केले जात आहेत.

निवडणुकीच्या निकालांच्या संसदेच्या पडताळणीवर भाष्य करताना ट्रम्प म्हणाले की आपण २० जानेवारीला सुरळीत पद्धतीने सत्ता हस्तांतरित करू. ट्रम्प यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, मी निवडणुकीच्या निकालांशी पूर्णपणे सहमत नाही आणि या विचारांवर मी ठाम आहे. तरीही २० जानेवारीला पद्धतशीरपणे सत्ता हस्तांतरण होईल.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments