Monday, March 1, 2021
Home International News आंतरराष्ट्रीय 'मर्क कम्पाउंड चॅलेंज' स्पर्धेत सौमित्रची बाजी

आंतरराष्ट्रीय ‘मर्क कम्पाउंड चॅलेंज’ स्पर्धेत सौमित्रची बाजी

पुण्यातील ‘आयसर’ या संस्थेत पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर सौमित्रने डेन्मार्क येथे आपले पीएचडी शिक्षण पूर्ण केले. लहानपणापासूनच संशोधनात करिअर करायचे ठरविल्यामुळे आयआयटीत मिळणारा प्रवेश नाकारून सौमित्रने आयसर मध्ये पदवी शिक्षण घेऊन संशोधनात करिअर करण्याचा निर्णय घेतला. येथे अभ्यास करत असताना, त्याला रसायनशास्त्रात गोडी निर्माण झाली. पुढे त्याने त्यातच करिअर करण्याचे ठरविले. पीएचडी शिक्षण घेत असताना, अनेक नामवंत शास्त्रज्ञांसोबत त्याने काम केले आणि त्याचे अनेक प्रबंध प्रसिद्ध झाले आहेत. या क्षेत्रात मानाची मानल्या जाणाऱ्या मर्क कम्पाउंड चॅलेंज  या स्पर्धेत त्याने सहभाग घेतला. या स्पर्धेत विद्यार्थ्यांना एक विशिष्ट प्रकरच्या रसायनशास्त्राचे उदाहरण दिले जाते. यात दिलेल्या छोट्या रेणूला त्याचा प्रवास करण्यासाठी रसायनशास्त्राचा आधार घेत सर्वोत्तम असा मार्ग निर्माण करून द्यायचा असतो. यासाठी स्पर्धकांना ९६ तासांचा अवधी दिला जातो. यात वैयक्तिक किंवा दहा जणांच्या चमूसह सहभागी होता येतो. सौमित्रने वैयक्तिक सहभाग घेतला होता. त्याने शोधलेला रासायनिक मार्ग हा सर्वोत्तम ठरला आणि १३२ टीम्समधून तो विजयी झाला. त्याच्यासोबत जर्मनीतील १० स्पर्धकांचा चमूही विजेता ठरला. या दोन्ही चमूंना दहा हजार युरोचे बक्षीस विभागून देण्यात आले.

रसायनशास्त्रात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ‘मर्क कम्पाउंड चॅलेंज’ या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतीय सौमित्र आठवले याने बाजी मारत जगभरातील तब्बल १३२ चमूंना गारद केले. सलग ९६ तास चालणाऱ्या या स्पर्धेत सौमित्रचा एकट्याचा चमू होता. त्याने केलेल्या संशोधनाचा फायदा भविष्यात औषधनिर्माणशास्त्रात होऊ शकतो, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. या ९६ तासांत रसायनशास्त्राच्या सर्व कसोट्यांमधून जात रेणूसाठी हा मार्ग निश्चित केल्याचे सौमित्र सांगतो. ही स्पर्धा तुलनेत अवघड असते, यामुळे चमूत जेवढे जास्त सभासद असतील ते सर्व यासाठी प्रयत्न करत असतात. मात्र, मी हे एकट्यानेच केले, असे सौमित्र सांगतो. या संशोधनाचा फायदा भविष्यात औषध निर्माण शास्त्रापासून ते रसायनशास्त्रातील कोणत्याही प्रयोगासाठी होऊ शकतो, असा विश्वासही त्याने व्यक्त केला. भविष्यात या क्षेत्रात जेवढे संशोधन करता येईल, तेवढे करण्याचा त्याचा संकल्प आहे. याचबरोबर तरुण विद्यार्थ्यांनी आपल्याला आवडेल त्या क्षेत्रात करिअर करावे. हे करत असताना त्यामध्ये झोकून देउन काम करण्याची तयारी असावी. याचबरोबर परिस्थिती आणि व्यवहार्यता याचा विचार करूनही निर्णय घ्यावा, असा सल्लाही सौमित्रने आत्ताच्या तरुण पिढीला दिला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments