बदलत्या जीवनशैलीमुळे स्तनांच्या, गर्भाशयाच्या व बीजांडाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढू लागले आहे. गर्भाशयाच्या कर्करोगाचे अनेक प्रकार आहेत. गर्भाशयाच्या आतील आवरणामधील पेशींमध्ये बदल होतो. त्या पेशी फार भरभर वाढायला लागतात. तसेच त्यांच्या रचनेतही बदल होतो. हळूहळू त्या इतक्या संख्येने वाढतात की, गर्भाशयाच्या स्नायूंमध्ये, गर्भाशयाच्या मुखाजवळ तसेच रक्तवाहिन्यांद्वारा शरीरात इतर ठिकाणी पसरत जातात. अशा प्रकारच्या रोगाला गर्भाशयाचा कॅन्सर असे म्हणतात. गर्भाशयाचा कर्करोग साधारणत: पन्नाशीनंतर आढळून येतो. भारतात दर वर्षी सुमारे १३ हजार स्त्रियांचा गर्भाशयाच्या कर्करोगाने मृत्यू होतो. या कर्करोगाबद्दल थोडक्यात माहिती घेऊया. भारतात बरीच वर्षे गर्भाशयमुखाचा कर्करोग हा स्त्रियांमध्ये आढळणारा सर्वांत महत्त्वाचा व प्रथम क्रमांकाचा कर्करोग होता. गर्भाशयाचा कर्करोग हा हळूहळू वाढणारा कर्करोग आहे. विशेष म्हणजे यात सुरुवातीच्या टप्प्यात, पांढरे जाणे, योनीमार्गातील द्रावाला दुर्गंधी येणे किंवा समागमानंतर रक्तस्राव होणे यासारखी कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. कर्करोगपूर्व किंवा कर्करोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यात इमेजिंग तंत्रज्ञानातही हा आजार कळून येत नाही. त्यामुळे गर्भाशयाचा कर्करोग भारतीय स्त्रियांमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. शिवाय, यातून वाचण्याचे प्रमाण पण फार अल्प आहे. अशाप्रकारचा त्रास होणाऱ्या स्त्रियांमध्ये गर्भाशयाचा कर्करोगाची शक्यता जवळपास १० टक्के एवढी असते. कर्करोगाची लक्षणे दिसल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. कारण, यातील अनेक रुग्णांमध्ये या कर्करोगाचे निदान फारच उशिरा होते, त्यामुळे उपचार घेण्यास उशीर झाल्याने यामध्ये होणारे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे.
पॅप स्मिअर ही आर्थिकदृष्ट्या परवडणारी आणि सोपी चाचणी आहे. डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये किंवा बाह्यरुग्ण विभागात ओटीपोटाचा भाग तपासून ही चाचणी करता येते. त्यामुळे, स्त्रियांमधील गर्भाशयाच्या कर्करोगाची चाचणी आणि निदान करण्यासाठी ही पद्धत वापरली जाते. यात रुग्णाला पाठीवर झोपवून स्पेकलमच्या साह्याने गर्भाशयाची तपासणी केली जाते. हा आजार किंवा इतर काही समस्या आहे का, हे तपासण्यासाठी गर्भाशयाच्या काही पेशी खरवडून काढल्या जातात आणि त्यांना मायक्रोस्कोपखाली तपासले जाते. २१ ते ६५ या वयोगटातील लैंगिकरित्या सक्रिय असलेल्या महिलेने दर ३ वर्षांनी पॅप स्मिअर चाचणी करून घेण्याचा सल्ला दिला जातो. ३० किंवा त्याहून अधिक वय असलेल्या स्त्रियांनी दर पाच वर्षांनी पॅप चाचणी करून घ्यावी. एचआयव्ही संसर्ग, केमोथेरपी किंवा दिर्घकाळासाठी स्टेरॉइड घेणाऱ्या स्त्रिया, अवयव रोपणामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी करणारी औषधे घेणे, आधी गर्भाशयाचा कर्करोग झालेला असल्यास किंवा पॅप स्मिअरमध्ये कर्करोगपूर्व पेशी आढळून आल्यास, धूम्रपान करणाऱ्या किंवा अनेक वर्ष संतती नियमनाच्या गोळ्या घेणाऱ्या, अनेक जोडीदारांशी लैंगिक संबंध असणाऱ्या अशा स्त्रियांना गर्भाशयाचा कर्करोग होण्याची शक्यता अधिक असल्याने त्यांनी वारंवार पॅप स्मिअर चाचणी करण्याचे डॉक्टर सुचवितात.