Friday, February 26, 2021
Home Lifestyle News दिवाळी आणि रांगोळी

दिवाळी आणि रांगोळी

संस्कार भारतीने विकसित केलेल्या या तंत्राच्या सहाय्याने काढलेल्यारांगोळया या सध्याच्या काळात महाराष्ट्रीय संस्कृतीचा एक अविभाज्य भाग बनल्या आहेत.

आली माझ्या घरी ही दिवाळी,

सप्तरंगात न्हाउनी आली,

आली माझ्या घरी ही दिवाळी….

दिवाळी म्हटलं कि डोळ्या समोर येतो तो पहिला फराळ. फराळ खाण्याबरोबर तो घरी बनविण्याचीही मजा काही औरच असते. हल्ली महिला सुद्धा घर, नोकरी सांभाळून थकून जातात, त्यामुळे घरी फराळ करण्यापेक्षा बाहेरूनच मागवितात. फराळ नंतर अगदी लहानापासून मोठ्या माणसांपर्यंत सर्वाना आवडणारे विविध आकाराचे, वेगवेगळ्या आवाजाचे फटाके, घरी बनविलेला कंदील, रंगीबेरंगी वेगवेगळ्या आकाराच्या पणत्या, घराला केलेली विद्युत रोषणाई, लहानग्यांसाठी बनविलेले किल्ले, त्यावर असणारे मातीचे महाराजा, सिंहासन, मावळे, सैन्याचे पुतळे, तोफा, त्यावर केलेली रोषणाई, दिवाळी उत्सवानिमित्त घेतलेले नवीन कपडे अशा अनेक गोष्टींचे खूप अप्रूप वाटते. दररोज अगदी न चुकता दिवाळी ते भाऊबीज पर्यंत दारासमोर काढलेली मोठी वेगवेगळ्या रंगानी सजविलेली रांगोळी सुद्धा दिवाळीचे खास आकर्षण असते. आणि जर येणाऱ्या पाहुण्यांनी त्याचे आवर्जून केलेले कौतुक म्हणजे सोने पे सुहागा.

maharashtra rangoli

रांगोळीची हि परंपरा अगदी पुरातन काळापासून चालत आली आहे. जसजसा काळ बदलत गेला तसतसे रांगोळी मध्येही बर्याच प्रमाणात बदल झाले आहेत. पूर्वीच्या काळी उंबरठा, तुळशी वृन्दावनापुढे, अंगणामध्ये रांगोळी काढली जात असे. पूर्वी शेणाने सारवलेल्या जमिनी असत त्यामुळे सारवणाला कायम रांगोळीची जोड असे. त्यात हळदी-कुंकवाची चिमूट टाकण्याची पध्दत होती. आजलाही काही खेडेगावातून ही प्रथा पाळली जाते.

दारामध्ये रांगोळी काढली तर घरात साप किंवा कोणते सरपटी जनावर येत नाही असे पूर्वी सांगितले जात असे. काही ठिकाणी गारगोटीचे दगड भाजून त्याची भुकटी करून त्या भुकटीचे रांगोळी काढली जाते तर कुठे कुठे तांदुळाच्या रवाळ पिठाने काढली जाते. या रांगोळया व त्यांची विशिष्ट चिन्हे, आकार इत्यादींची विविध सणावारांशी सांगड घातली गेली. उदा. गौरी येतात तेव्हां घरभर तिची पावले काढली जात असत, चैत्रमहिन्यात चैत्रांगण, शुभचिन्ह म्हणून स्वस्तिक, गोपद्म, शंख, महिरप इत्यादी रेखाटले जाते. रांगोळी उठावदार दिसावी यासाठी गेरू या तपकिरी-लाल रंगाच्या मातीने रांगोळी काढण्याची जागा सारवून घेतात. कणा, ठिपक्यांची रांगोळी, संस्कार भारती, आत्ता तर रांगोळीच्या सहाय्याने नेत्यांची, देवतांची सिनेमा तारकांची हुबेहूब व्यक्तिचित्रे, निसर्गचित्रे अशा एक ना अनेक प्रकारच्या रांगोळ्या हल्ली काढल्या जातात.

गणपती आणि दिवाळीच्या सुमारास अशा प्रकारच्या रांगोळयांची प्रदर्शनेही भरतात. ‘संस्कार भारती’ या भारतीय संघटनेने महाराष्ट्रात मोठया प्रमाणावर व मोठया आकृत्या असलेल्या रांगोळया काढण्याची एक नवीन पध्दत सुरू केली आहे. दोर, पेन्सिल अशा साध्या वस्तूंच्या मदतीने, स्वस्तिक, गोपद्म, चक्र, शंख, गदा, पद्म, ध्वज इत्यादी प्रतिके एकमेकांना जोडून भव्य रांगोळया काढल्या जातात. तसेच रांगोळीत रंग भरून पूर्ण झाली की त्याभोवती पणत्या किंवा मेणबत्त्या पेटवून सुशोभित करतात. संस्कार भारतीने विकसित केलेल्या या तंत्राच्या सहाय्याने काढलेल्यारांगोळया या सध्याच्या काळात महाराष्ट्रीय संस्कृतीचा एक अविभाज्या भाग बनल्या आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments