Monday, March 1, 2021
Home Lifestyle News दुर्मिळ योग : गुरु आणि शनीची २० वर्षाने जवळीक

दुर्मिळ योग : गुरु आणि शनीची २० वर्षाने जवळीक

गॅलिलिओच्या जीवनकाळात म्हणजेच सतराव्या शतकात हे ग्रह इतके समीप आले होते. अवकाश संशोधकांच्या मते ही बाब लक्षवेधी असली तरीही हे दोन्ही ग्रह दर २० वर्षांनी एकमेकांच्या जवळून मार्गक्रमण करतात. पण यावेळी मात्र हे अंतर खूपच कमी असणार आहे. गुरु आणि शनी हे ग्रह दर २० वर्षांनी एकमेकांच्या जवळून मार्गक्रमण करतात. पण, यांचं इतकं समीप येणे अतिशय खास आहे. मुख्य म्हणजे वैज्ञानिकांच्या मते यंदाच्या वेळी या दोन्ही ग्रहांमध्ये फक्त 0.१ अंशाचंच अंतर असणार आहे. त्यामुळे या ग्रहांची युती पाहण्यासाठी सर्वत्र उत्सुकता दिसून येत आहे. हवामानाची परिस्थिती पूरक असल्यास सोमवारी सुर्यास्तानंतर जगभरातून हे सुरेख दृश्य पाहता येणार आहे. खगोलशास्त्राचे प्राध्यापक डेव्हिड वेनट्रॉब यांच्या म्हणण्यानुसार अशा प्रकारची घटना कोणाही व्यक्तीच्या जीवनात फक्त एकदाच घडते. २१ डिसेंबर २०२० हा यंदाच्या वर्षातील सर्वात लहान दिवस असल्याची बाबही समोर येत आहे. दिवस लहान तर रात्र मोठी असल्याचे सांगण्यात आले. सोमवारी म्हणजेच सायंकाळी 6.30 ते 7 वाजण्याच्या सुमारास देशातील कोणत्याही भागातून ही ग्रहांची युती पाहण्याची संधी सर्वांनाच मिळणार आहे.

जवळपास ३९७ वर्षांपूर्वी म्हणजेच जुलै १६२३ मध्ये हे दोन्ही ग्रह अतिशय कमी अंतरावर एकमेकांच्या जवळ आले होते. पण, त्यावेळी सूर्य फार जवळ असल्यामुळे त्यांना पाहणे शक्य झाले नव्हते. त्या आधीही मार्च १२२६ मध्ये हे ग्रह अशाच पद्धतीने एकमेकांच्या जवळ आलेले असताना तेव्हा मात्र हे दृश्य पाहता आले होते असं म्हटले जाते आहे. सोमवारी गुरू आणि शनी मधील अंतर फक्त ०.१ अंश राहणार असल्यामुळे नुसत्या डोळ्यांनी पाहताना हे दोन ग्रह एकच आहेत, असे भासेल. छोट्या दुर्बिणीतून किंवा झूम असलेल्या कॅमेऱ्याने पाहिल्यास या दोन ग्रहांची जोडी दिसू शकेल. मोबाइलमध्ये ही दुर्मीळ घटना टिपण्यासाठी मोबाइल स्टँडवर लावून ‘नाइट मोड’वर छायाचित्र घ्यावे, असे तज्ञानी सुचविले आहे. ज्योतीर्विद्या परिसंस्थेच्या वतीने २१ आणि २२ तारखेला केसरीवाडा येथे टेलिस्कोप आणि स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली असून, मर्यादित आकाशप्रेमींना पूर्वनोंदणी करून गुरू-शनीची युती पाहता येणार आहे. खगोल विश्व संस्थेच्या वतीने पुसाणे या गावी सोमवारी संध्याकाळी सहा ते आठ या वेळेत गुरू-शनी युती दर्शनाचा कार्यक्रम होणार आहे. खगोल विश्वच्या फेसबुक पेजवर मोठ्या टेलिस्कोपच्या साह्याने ही युती लाइव्ह सुद्धा दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्तीत लोकांनी या दुर्मिळ घटनेचा आस्वाद घ्यावा.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments