Sunday, February 28, 2021
Home Lifestyle News खणाची साडी - अपडेटेड ओल्ड वर्जन

खणाची साडी – अपडेटेड ओल्ड वर्जन

अस म्हणतात कि, नवीन कपडे ठेवायला कपाटात जागा नसते, आणि कुठे बाहेर जायचं म्हटल्यावर घालायला नवीन कपडे नसतात. ही खरचं गमतीची बाजू झाली पण साडी म्हणजे स्त्रियांच्या मनाचा हळवा कोपरा. कपाट कितीही साड्यांनी भरलेलं असलं तरी बाजारातील प्रत्येक नवीन साडी या महिला वर्गाला खुणावतेच. प्रत्येक दोन चार महिन्यांनी नाविन्यपूर्ण साड्या बाजारात येत असतात अन महिलांना त्याची भुरळ पडते. एखादी नवीन वस्तू, प्रकार वापरुन पाहण्याची आवड सर्वांना असते, त्यातही काही खास ट्रेन्डला महिलांची पसंती असते.

khanachi saree

हल्लीच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळं सणासुदीशिवाय साड्या फारशा नेसल्या जात नाहीत. मग त्या नुसत्याच कपाटात थप्पीला लावून ठेवण्याशिवाय पर्याय नसतो. या साड्यांचं करायचं काय, असा प्रश्न पडणं साहजिक आहे. तसंच खणाची साडी ही महाराष्ट्रीय परंपरेचा अविभाज्य भाग. खणाची साडी नसेल तर उत्सवांना काय शोभा. असा आग्रह जुन्या पिढीतील आपल्या आजीचा असतो. तरुण मुलींना मात्र टिपिकल साडीपेक्षा काहीतरी वेगळं हवं असतं. या खणांच्या साड्या आता एका वेगळ्या रंगाढंगात पाहायला मिळत आहेत. खास डिझाइन केलेल्या या साड्यांना मराठी अभिनेत्रींनी पसंती दिल्याचं दिसून येत आहे.

new trend kanachi saree

महिलावर्गात सध्या एका जुन्या पद्धतीच्या साडीची क्रेझ निर्माण होऊन मागणी वाढलीये. जुनी फॅशन थोड्या हटके पद्धतीने अपडेट होतचं असते आणि फॅशन ट्रेन्ड म्हणून सुपरहिट होते. त्यामुळेच सध्या महिला वर्गाचा कल वाढलाय तो जुन्या प्रकारच्या पण नवीन रुपात आलेल्या खण साडीकडे. यापूर्वी खणाच्या चोळ्या पारंपरिक वस्त्र म्हणून घातल्या जायच्या. काळानुसार त्यावर पडदा पडत गेला. पण आता पुन्हा नव्याने बाजारपेठा सजल्यात त्या नवीन पध्दतीच्या खण साडीने. या साडीचं वैशिष्ट्य म्हणजे त्या पूर्ण खणाच्या चोळी सारख्या दिसतात. या साड्या नथ, सरस्वती, स्वस्तिक अश्या अनेक पॅटर्न आणि विविध रंगात उपलब्ध असल्याने महिलावर्गाची खास पसंतीस उतरत आहेत. खण साडी अन त्यावर ट्रेन्डिंग ऑक्सिडाईज दागिन्यांची सांगड महिलांवर अगदी शोभून दिसते, त्यांचे सौंदर्य अधिकचे खुलवते. अनेक मराठमोळ्या अभिनेत्रींनी सुद्धा त्यांच्या काही खास कार्यक्रमात हा खास खण साडीचा पारंपरिक लुक परिधान केलेला दिसतो. खण साडी अन त्यावर मॅचिंग नथीच चित्र असलेला खणाचा मास्क सध्या ट्रेंड मध्ये आहे.

maharashtrian girl in khanachi saree

खण साडी त्यावर तशीच पारंपरिक नथ, हातात हिरव्या बांगड्या, कपाळावर चंद्रकोर अशी मराठमोळी वेशभूषा कोणाला आवडली नाही म्हणजे नवलंच! त्यामुळेच हा ट्रेन्डिंग लूक सणावाराला महिलावर्गाचं खास आकर्षण ठरतोय. या खण साड्या बाजारात अगदी रास्त दरात उपलब्ध आहेत. पाचशे ते पाच हजार रुपये किंमती असलेल्या या साड्या बाजारपेठेत उपलब्ध होत आहेत. याच साड्यांपासून लहान मुलींसाठी शिवलेले फ्रॉक, कुर्ते हे ही सध्या बाजारपेठांमध्ये उपलब्ध आहेत. प्रत्येक वयातील महिलांना या साड्या तेवढ्याचं शोभून दिसतात.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments