देशातील तब्बल २५ टक्क्यांहून अधिक लोकांना जीवघेणे आजार असल्याचं या अहवालात सांगण्यात आलं आहे. तर ४० टक्के वृद्ध कुठल्या ना कुठल्या अपंगत्त्वाचे बळी असल्याचंही या अहवालात सांगण्यात आलं आहे. याशिवाय २० टक्के वृद्ध व्यक्तींची मानसिक आजारांचे बळी आहेत. त्यामुळं वयोवृद्ध व्यक्तींची अधिक काळजी घेण्याची गरज या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. वयोवृद्धांवरील या अहवालाचा उपयोग योजना बनवण्यासाठी केला जाणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी ही माहिती दिली. या अहवालाद्वारे वृद्धांचा शारीरीक, मानसिक, आर्थिक, सामाजिक स्तरावर अभ्यास केला गेला. याचा उपयोग करुन वृद्धांसाठी योजना तयार केल्या जाणार आहेत. जगात आतापर्यंत करण्यात आलेला हा सर्वात मोठा सर्व्हे असल्याचं डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले. २०११ च्या जनगणनेनुसार देशात एकूण लोकसंख्येच्या ८.६ टक्के लोक ६० वर्षांहून अधिक वय असलेले होते. त्यावेळी ज्येष्ठ नागरिकांची संख्या १०.३० कोटी होती. म्हणजेच दरवर्षी ज्येष्ठ नागरिकांच्या संख्या ३ टक्क्यांची वाढ होत आहे. ही वाढ अशीच सुरु राहिली, तर २०५० पर्यंत भारतात तब्बल ३१.९० कोटी ज्येष्ठ नागरिक असतील. त्यामुळं या नागरिकांसाठी विविध योजना तयार करण्याची गरज असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी सांगितलं.
ज्येष्ठ नागरिकांच्या तपासणीदरम्यान, त्यांना अनेक गंभीर आजार असल्याचं निदर्शनास आलं. अनेक वयोवृद्धांना हायपरटेन्शन, दृष्टीची समस्या, वजनवाढीची समस्या, कुपोषण, श्वासासंबंधीचे आजार असे अनेक आजार असल्याचं समोर आलं. गंभीर आजारांनी ज्यांना ग्रासलं आहे, त्यातील ७७ टक्के लोकांना हायपरटेन्शन, ७४ टक्के लोकांना हृदयासंबंधीचे आजार, ८३ टक्के लोकांना मधुमेह, ७२ टक्के लोकांना श्वासासंबंधीचे आजार, तर ७५ टक्के लोकांना कुठल्या ना कुठल्या स्वरुपाचा कॅन्सर असल्याचं समोर आलं. याशिवाय ५८ टक्के लोकांना स्ट्रोक, तर ५६ टक्के ज्येष्ठांना संधीवाताचा त्रास असल्याचंही कळालं. याशिवाय ४१ टक्के ज्येष्ठ नागरिक मानसिक आजारांना बळी पडल्याचंही या अहवालात सांगण्यात आलं आहे.
ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरातील नागरिकांना वेळेवर आरोग्य सुविधा मिळतात. त्यांचं आरोग्य चांगलं राहतं मात्र, ग्रामीण भागात आरोग्य सुविधांची अजूनही वानवा असल्याचं समोर आलं आहे. शिवाय, सामाजिक सुरक्षेचा विचार केला तर छोटी राज्य आणि केंद्रशासित प्रदेश वृद्धांसाठी अधिक सुरक्षित असल्याचं या सर्व्हेत समोर आलं आहे. सिक्कीम वगळता भारतातील सर्व राज्यातील वयोवृद्ध व्यक्तींचा या सर्वेक्षणात अभ्यास करण्यात आला. ४५ वर्षांहुन अधिक वय असणाऱ्या ७२,२५० व्यक्तींचा यामध्ये समावेश होता. त्यातील ३१,४६४ लोकांचं वय हे ६० वर्षांहून अधिक होतं. तर यातील ६,७४९ लोकांचं वय ७५ वर्षांहून अधिक होतं. त्यामुळे वरील आकडेवारी पाहता गरज आहे ती फक्त घरातील वयोवृद्ध माणसांची काळजी घेण्याची, सुरुवात आपल्याच घरापासून करावी. निसर्गाचे चक्र आहे हे ज्याला विरोध करून चालत नाही, लहानपणी पालक बनून ज्यांनी तुमची काळजी घेतली, मोठे झाल्यावर तुम्ही त्यांचे पालक बनून जबाबदारी घ्यायला काहीच हरकत नसावी. तरुण पिढीने जबाबदारी म्हणून नव्हे तर परम कर्तव्य म्हणून या गोष्टीकडे पाहणे गरजेचे आहे.