मागील ८ महिन्यांपासून जग कोरोना सारख्या महामारीचा सामना करत आहे. लॉकडाउनमुळे जगातील कित्येक कर्मचारी वर्क फ्रॉम होम करत आहेत. करोनाचा प्रादुर्भाव वाढत असलेल्या भागांमध्ये घरुन काम करणं अनिवार्य आहे. करोनामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे या काळात माणसाला अनेक प्रयोग करायला भाग पडले आहे. सद्यस्थितीत वर्क फ्रॉम होम करणं हा एकमेव पर्याय असताना अनेकांना नव्या कार्यपद्धतीशी जुळवून घेताना कठीण जात आहे. वर्क फ्रॉम होम हा प्रयोग यातीलच एक म्हंटलं तर चुकीचं ठरणार नाही. पण, वर्क फ्रॉम होममुळे सतत एकाच जागी, एकाच खोलीत बांधलं गेल्यानं एकटेपणा जाणवू शकतो, असं मानसोपचारतज्ज्ञ सांगतात. प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात. वर्क फ्रॉम होम करताना येणाऱ्या तांत्रिक आणि इतर अडचणींमुळे अनेकांना ते नकोसं झालं आहे. पण म्हणतात ना नाण्याच्या दोन बाजू असतात, हे विसरुन चालणार नाही. सध्या घरुन काम करण्याचा कंटाळा आला असला तरीही त्याची दुसरी सकारात्मक बाजू आपण पाहूया. वर्क फ्रॉम होम करताना तुम्ही कुटुंबाला जास्तीत जास्त वेळ देऊ शकता, नवनवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करू शकता. मुख्य म्हणजे वाहतूक कोंडीमध्ये जाणार विनासायास त्रासातून मुक्तता मिळाली आहे, ही नक्कीच दिलासादायक बाब आहे.

वर्क फ्रॉम होम करण्याने मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या थकवा येण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यात कुटुंब मोठं असेल किंवा घरात लहान मुलं असतील तर वर्क फ्रॉम होम करणे थोडं कठीणच होऊन जाते. वर्क फ्रॉम होम असल्यामुळे वेळेचं बंधन नसल्यानं अवेळी व्हिडीओ कॉल्स, कॉन्फरन्स कॉल्स येणं या गोष्टी सांभाळणं कठीण जातं. त्याचसोबत शारीरिक हालचालींवर मर्यादा येतात. पण घरी असल्यामुळे थोडा वेळ तुम्ही घरच्यांशी संवाद साधू शकता. मुलांसोबत वेळ घालवू शकता. इतर दिवशी ऑफिसच्या कामामुळे ज्या गोष्टी शक्य होत नाहीत त्या गोष्टी अमलात आणू शकता. अर्थात, ऑफिसचं काम सांभाळून इतर गोष्टींसाठीही वेळ काढू शकतो.
वर्क फ्रॉम होममुळे घरातून काम करणाऱ्यांच्या कामाचे तास वाढल्याचे दिसून आले आहे. अनेकजण कामाच्या निर्धारित तासांपेक्षा एक ते दोन तास अधिक काम करतात, असं दिसून आले आहे. वर्क फ्रॉम होमच्या करण्यात आलेल्या सर्वेत ६४ टक्के लोकांनी आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्याचे सांगतिले तर ७५ टक्के लोकांनी वर्क फ्रॉमहोममुळे मानसिक असंतुलन झाल्याचे मान्य केले आहे. घरातून काम करणाऱ्या लोकांच्या शारीरिक हालचाली कमी झाल्या आहेत. त्यामुळे रोजचा चालण्याचा व्यायाम देखील कमी झाला आहे. ऑफिसला जाणे आणि माघारी येणे यातून होणारा चालण्या, धावण्याचा रोजचा व्यायामदेखील कमी झाला. लोकांचे भावविश्व त्यांच्या घर आणि फ्लॅटपुरते मर्यादित झाले असून सामाजिक संपर्क देखील कमी झाले आहेत. त्यामुळे काही काळापर्यंत वर्क फ्रॉम होम हे काहीना चांगले वाटत असले तरी काहीसाठी ते अडचणीचे ठरले आहे.