अनुकरण म्हणजे एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीच्या वर्तनाची केलेली नक्कल अथवा प्रतिकृती असे म्हणता येईल. अनुकरणकर्ता हा अनुकरणीय व्यक्तीच्या वर्तनासमान क्रिया करतो. अर्थात अनुकरण हे कधी सहेतुक घडते, तर कधी अभावितपणे घडते. आपण इतरांचे नेहमीच व प्रत्येक बाबतीत अनुकरण करतो, असे नाही. रेल्वेत अथवा मोटारीत इतर प्रवासी भांडू लागले, की त्या भांडणात आपण सामील होतोच, असे नाही. ज्या क्रियांना आपल्या प्रयोजनांच्या दृष्टीने काही ना काही अर्थ असतो, त्याच क्रियांचे आपण अनुकरण करतो. भोवतालची माणसे संकटकाळी पळू लागली व आपल्यावरही ते संकट आहे असे आपणास वाटले, म्हणजे आपण पळू लागतो केवळ अनुकरणासाठी अनुकरण, असा प्रकार होत नाही. अनुकरण ही काही उपजत व अनिवार्य सहजप्रवृत्ती नव्हे. मुले मोठी होऊ लागली, की आईवडिलांचा तसेच परिसरातील विविध जेष्ठ व्यक्तींचा आदर्श स्विकारून त्यांचे अनुकरण करतात. प्रौढ माणसेदेखील स्वतः थोरामोठ्या व्यक्तींच्या जीवनाचे आदर्श अनुसरण्याचा प्रयत्न करतात. कथा कादंबऱ्यांतल्या, काव्य नाटकांतल्या तसेच चित्रपटांतल्याही उदात्त वा अन्यथा आकर्षक व्यक्तींच्या वर्तन प्रकारांनीही कित्येक माणसे प्रभावित होतात व त्यांचे अनुकरण करू लागतात.
अनुकरण हा बालकांच्या मनोविकासाचा गाभाच आहे. त्याच्या मते, अनुकरणाचे अहेतुक व सहेतुक असे किमानपक्षी दोन प्रकार मानले पाहिजेत. या प्रक्रियेत ग्रहण, आत्मसातकरण व उत्क्षेपण अशा तीन अवस्था असतात. पहिल्या अवस्थेत बालक आदर्शाचे प्रतिमाग्रहण करीत असते तर दुसरीत ते आपल्या हालचाली, लकबी आणि वृत्ती इ. गोष्टी आत्मसात करीत असते आणि तिसरीत त्याला आपल्या आदर्शाची चांगलीच जाण आलेली असते. आदर्शरूप व्यक्तीच्या भावजीवनाची तसेच आपण तिच्यासारखे वागत असतो याचीही उमज बालकाला आलेली असते. याच अवस्थेत अनुकरणाद्वारे इतरांचे आकलन बालकास होत असते. उत्क्षेपण अवस्थेच्या योगानेच आपण इतरांची भूमिका उमजू आणि समजू शकतो. इथे आपण केवळ अंधानुकरणच करीत असतो असे नव्हे तर त्या कृतीत आदर्शरूप व्यक्तीच्या भूमिकेची जाण आणि स्वतःचे निरीक्षण यांची गुंफणही करत असतो. म्हणूनच करपल्लवी, नेत्रपल्लवी इ. संकेतांची देवाणघेवाण होऊ शकते. परिणामतः दोन व्यक्तींमध्ये सुसंवाद निर्माण होतो.
पुढे अधिक कोंबडी पळू लागली की तिची पिल्लेही पळू लागतात. इतर माणसे हसू लागली की आपणासही हसू येते. जेव्हा एक व्यक्ती दुसरीचे अनुकरण करते तेव्हा त्या दोहोंच्या वर्तनात समानता येते, हे उघड आहे. परंतु ‘वर्तनातील साम्य’ आणि ‘वर्तनाचे अनुकरण’ या दोन संकल्पनांत भेद करणे जरूरीचे आहे.
साभार :- मराठी विश्वकोश