आयुष्य प्रत्यक्षात इतकं सोपं असतं का? कोणाला पैशाचा प्रॉब्लेम आहे, कुणाची करीअरची गाडी पुढे जात नाहीये, कुणाला कसल्या ना कसल्या शारीरीक तक्रारी आहेत, कुणी भरघोस उत्पन्न मिळेल, अशा व्यवसायाच्या शोधात आहे. कोणी आजुबाजुच्या जवळच्या भांडखोर लोकांपासुन त्रस्त आहे, कोणी कर्जाच्या डोंगराने परेशान आहे, कोणी भाड्याच्या घरामुळे व्याकुळ आहे, तर कूणाला आपल्या मुलांमुलींच्या सुरक्षिततेच्या चिंता सतावत आहेत. कुणाला आपल्या गमावलेल्या आप्तेष्टांच्या आठवणी सतावत आहेत तर कोणी भरल्या घरात सर्व सुख सुविधा पायाशी असुनही उत्साहाच्या अभावाने, एक प्रकारच्या रितेपणामुळे निराशेने ग्रस्त होवुन प्रेमासाठी भुकेला आहे. हे कमी म्हणुन की काय, रोजच संघर्षाचे छोटेमोठे प्रसंग आमच्या आयुष्यात यायला आतुर असतातच. ह्या जगात प्रत्येक गोष्ट ही अद्वितीय आहे, गुलाब दिसायला सुंदर असतो, पण म्हणुन मोगऱ्याचं महत्व कमी होत नाही, त्याचा सुगंध ही त्याची ओळख! त्या दोघात डावं-उजवं अशी तुलना करता येईल का? प्रत्येक फुल अद्वितीय आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक फळाचा स्वतःचा एक गोडवा आहे, एक चव आहे, आंबा रसाळ, चवदार म्हणुन चिक्कु, अननस खराब म्हणावेत का? संत्रा-मोसंबीने ईर्ष्या करावी का? केळीने माझे नशीबच फुटकं म्हणुन रडत बसावे का? प्रत्येकाची स्व:ताची खासियत असते, ती फक्त ओळखून मान्य करता आली पाहिजे.
आयुष्यात आहे त्याचा स्वीकार केल्यास नव्याण्णव टक्के चिंता दूर होतात. समजा, एखाद्याचा दात तीव्रपणे ठणकतोय, आता इथे कसा काय मार्ग काढणार, एक उपाय आहे, डोळे बंद करुन, त्या दुखणाऱ्या दाताकडे संपुर्ण लक्ष द्या, त्या त्रासदायक संवेदना अनुभवा, त्या ठिकाणी शंभर टक्के मन एकाग्र करा, आणि वेदनांची तीव्रता कमी होईल. गंमत अशी आहे, की प्रत्यक्ष वेदना तितकं दुःख देत नाहीत, जितकं वेदनांमुळे मनात येणारे विचार परेशान करतात, वेदनांना विचारांपासुन तोडलं की चिंता पळुन जाते! एखाद्या गोष्टीचा नको तितका पाठपुरावा केला कि, वेळ येते ती फक्त मनस्तापाची.
आयुष्य ही भगवंताने आपल्याला दिलेली अनमोल भेट आहे, आयुष्य सतत आनंदी राहण्यासाठी आहे. आयुष्य उत्साहाने भरभरुन जगण्यासाठी आहे, आयुष्य भव्यदिव्य स्वप्नं बघण्यासाठी आणि ती स्वप्ने मनमुरादपणे जगण्यासाठी आहे, आयुष्य आपल्या आणि इतरांच्या चेहऱ्यावर हसु फुलवण्यासाठी आहे. जीवनाचा प्रत्येक क्षण निष्पापपणे बागडण्यासाठी आहे, मनातले सर्व अपराधी भाव, भुतकाळ-भविष्यकाळ, काल्पनिक जबाबदाऱ्यांचे ओझे, सगळे सगळे फेकुन द्या, मोकळे आणि रिते व्हा, प्रत्येक क्षणाला, निरापराध वृत्तीने, निरागसपणे सामोरे जा! प्रत्येक गोष्ट आपल्याला आलीच पाहिजे, प्रत्येक गोष्ट मला मिळालीच पाहिजे हा अट्टाहास कशासाठी? काही वेळेला काही गोष्टी सोडून देण्यातच भल असते. लेट इट बी म्हणून काही गोष्टी सोडूनच द्याव्या जेणेकरून निस्वार्थी आयुष्य जगणे सोप्पे जाईल.