Monday, March 1, 2021
Home Lifestyle News स्वामी विवेकानंद जन्मदिन - राष्ट्रीय युवा दिवस

स्वामी विवेकानंद जन्मदिन – राष्ट्रीय युवा दिवस

स्वामी विवेकानंदांचा जन्म १२ जानेवारी १८६३ मध्ये कोलकात्यात झाला. त्यांच मुळ नाव नरेंद्रनाथ दत्त होतं. त्यांचे वडील कोलकाता उच्च न्यायालयात वकील होते तर आई भूवनेश्वरी देवी या धार्मिक विचारांच्या होत्या. विवेकानंद हे परिवर्तनाच्या चळवळीतले अग्रदूत असलेले समाजवादी आहेत. सर्वधर्म परिषदेनंतर केवळ एक वर्षानं आपला सर्वांत जवळचा शिष्य अळसिंगा पेरूमल यांना पत्र पाठवून त्यांनी कळवलं, मी साधू नाही, मी संत नाही. मी गरीब आहे. मला गरीबांच्याबद्दल प्रेम वाटतं आणि दारिद्र्य, अज्ञान यांच्या गाळात रुतून राहिलेल्या वीस कोटी भारतीयांच्या मुक्तीचा मार्ग मी शोधतो आहे.  स्वामी विवेकानंदांचा जन्मदिवस भारतात राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा केला जातो. धर्म, मानवता, स्वातंत्र्य, वेदान्त तत्वज्ञान या सारख्या इतर अनेक विषयांवर त्यांचे विचार नेहमीच प्रत्येक भारतीयाला मार्गदर्शक ठरतात. धर्माच्या विषयावरील त्यांच ज्ञान अचाट होतं.

स्वामी विवेकानंदानी शिकागो येथे आजपासून सुमारे ११ सप्टेंबर १८९३ रोजी जागतिक धर्म संमेलनात भाग घेतला. त्यांठिकाणी विवेकानंदानी धर्म आणि मानवता यावर केलेल्या ऐतिहासिक भाषणाचा आजही प्रत्येक भारतीयाला गर्व आहे. विवेकानंदाच्या नावाची एक वेगळीचं कथा आहे. शिकागोच्या विश्व धर्म संमेलनात भाग घ्यायचं ठरल्यानंतर विवेकानंदांच्या समोर खर्चाचा मोठा प्रश्न उभा होता. त्यावेळी राजपूताना परिसरातील खेतडीच्या राजाने त्यांचा हा खर्च उचलण्याची तयारी दर्शवली आणि तिथे त्यांना स्वामी विवेकानंद या नावाने भाग घ्यायचे सुचवले. विवेकानंदांनीही आनंदाने या नावाचा स्वीकार केला.

अमेरिकेतून भारतात परतल्यानंतर विवेकानंदानी संपूर्ण देश फिरून पालथा घातला. त्यांनी भारताच्या गरीबी, गुलामी आणि जातीय व्यवस्थेचं चिंतन केलं. वेदान्त तत्वज्ञानावर त्यांनी भारतभर भाषणे दिली. विवेकानंदानी १ मे १८९७  साली कोलकाता येथे रामकृष्ण मिशनची स्थापना केली. विवेकानंद कोणत्याही धर्माचा तिरस्कार करत नव्हते. त्यांनी भारतासमोर आणि जगासमोर वेदान्त तत्वज्ञानाची मिमांसा केली ती नक्कीच धर्माचे खऱ्या अर्थाने चिंतन करते. विवेकानंद म्हणायचे की आपण वेदान्ताशिवाय श्वासही घेऊ शकणार नाही, मनुष्याच्या जीवनात जे काही घडतंय ते वेदान्ताचा प्रभावातूनच घडतंय. विवेकानंदांच्या मते वेदान्त तत्वज्ञान हेच खऱ्या अर्थाने धर्माची शिकवण देत आहे. वेगवेगळ्या धर्मातील चांगल्या गोष्टी कशा स्वीकारायच्या ते वेदान्त तत्वज्ञानामधून शिकता येतं. ४ जुलै १९०२ रोजी वयाच्या अवघ्या ३९ व्या वर्षी बेलूर येथील मठात त्यांचा  दम्याचा त्रासामुळे मृत्यू झाला. स्वामी विवेकानंदांचे विचार हे युवा वर्गासाठी कायमचं महत्वपूर्ण राहिले आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments