काही वेळेला असे होते कि अनेक छोट्या मोठ्या आजारांवर घरातल्या घरातच सर्व उपाय उपलब्ध असतात आणि आपण मात्र बाहेर त्याचा शोध घेत असतो. पाहुया काही असे सोपे उपाय जे आले आहेत डायरेक्ट आजीच्या बटव्यातून.
आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे आहाराकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे अॅसिडीटीची समस्या डोकं वर काढते. अपुरी झोप, मसालेदार पदार्थ किंवा उन्हाच्या तडाख्यामुळे अॅसिडीटीचा त्रास वाढतो. अॅसिडीटीवर जेष्ठमध अतिशय फायदेशीर ठरते. याचे चूर्ण चाटण बनवून खाल्ल्यास नक्कीच आराम मिळतो. कडूलिंबाची सालही अॅसिडीटीवर उपयुक्त ठरते. रात्रभर कडूलिंबाची साल भिजवून ठेवा आणि सकाळी ते पाणी प्या. किंवा थोडीशी बेडीशेप पाण्यात उकळवा. पाणी थंड करुन ते प्या. याचा खूप फायदा होईल. त्रिफळा चूर्ण देखील अॅसिडीटीवर उपयुक्त ठरेल. हे देखील कोमट पाण्यासोबत घ्या.
चेहऱ्यावर आलेले डाग, ब्लॅक स्पॉट घालवण्याच्या नादात अनेक जण अनेक प्रकारच्या नामांकित कंपनींच्या क्रिम, फेस वॉश, सनस्क्रिन लावतात. पण या सगळ्यामुळेही चेहऱ्यावर अॅलर्जी, इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. निस्तेज त्वचा, दाग-धब्बे घालण्यासाठी काही घरगुती, सोप्या उपायांचाही फायदा होऊ शकतो. त्वचा आणि चेहऱ्याची सुंदरता कायम राखण्यासाठी कोरफड रामबाण मानलं जातं. कोरफडचा गर चेहऱ्यावरील काळे डाग नष्ट करण्याचे काम करतं. कोरफडमध्ये व्हिटॅमिन ई चं तेल आणि लिंबू रस मिळवून ती पेस्ट चेहऱ्यावर लावल्याने डाग जाण्यास मदत होते. त्याचप्रमाणे जसे शरीरावर बाहेरून उपचार करणे जरुरीचे असते तसेच अंतर्गत सुद्धा बिघाड सुधारणे गरजेचे असते. त्यासाठी ताक पिणं त्वचेसाठी अतिशय फायदेशीर मानलं जातं. ताकात लॅक्टिक अॅसिड आढळतं. जे चेहऱ्यावर येणारे डाग-धब्बे हटवण्यासाठी फायदेशीर ठरु शकतं. चेहऱ्यावर ज्या ठिकाणी काळे डाग आहेत, त्या ठिकाणी कापसाने ताक लावा. सुकल्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ करा.
असंतुलित आहार, पोट खराब असणे, पान-मसाल्यांचं सेवन यामुळे तोंड येण्याचं प्रमाण अधिक असतं. अनेकांना सतत तोंड येण्याची समस्या असते. त्यामुळे जेवतांना अनेकांना त्रास होतो. तोंड आल्यास एक ग्लास कोमट पाण्यात अर्धा चमचा मिठ घालून ते पाणी थोडावेळ तोंडात धरुन ठेवा. तुळशीचे दोन-तीन पाने चावून त्याचा रस प्या. विड्याच्या पानाचं चूर्ण तयार करुन त्यात थोडं मध मिसळून ते फोडीवर लावावे. विड्याच्या पानाचा रस काढून त्यात साजूक तुप घालून फोडीवर लावावे.
सतत बदलत्या हवामानामुळे साथीचे रोग पसरत आहेत. सर्दी खोकल्यावरील गुणकारी औषध म्हणून आलं प्रचलित आहे. आल्याचा रस व मध सम प्रमाणात बाटलीमध्ये साठवून दोन-दोन चमचे दोन वेळा घेतल्यास सर्दी, खोकला पडसे बरे होतात. अजीर्ण झाल्यास आल्याच्या रसात लिंबाचा रस व मीठ घालून पाणी प्यावे. आले तोंडात ठेवताच लाळग्रंथी सक्रिय होतात. ताप आल्यावर तुळशीचा रस प्यायल्यानंतर ताप कमी होतो. मलेरीया आणि डेंग्यू झाल्यानंतर ही तुळशीचा रस पिल्यावर आराम मिळतो. रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि वारधक्य कमी करण्यासाठी तुळशीचा रस पिल्याने फायदा पोहचेल. तुळशीमध्ये इगेनॉल हे द्रव्य असल्याने मधुमेह रोगावर नियत्रंण मिळवण्यासाठी ही फायदा पोहचतो. सध्याच्या बदलत्या वातावरणात बाहेरचे पदार्थ खाणे शक्यतो टाळलेच पाहिजे. त्याचप्रमाणे जर काही आजार जर घरगुती उपायाने बरे हॉट नसतील तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.