Monday, March 1, 2021
Home Lifestyle News १ डिसेंबर - जागतिक एड्स निर्मूलन दिन

१ डिसेंबर – जागतिक एड्स निर्मूलन दिन

जगामध्ये सर्वत्र १ डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स दिवस म्हणून साजरा केला जातो. जागतिक आरोग्य संघटनेच्या एड्स ग्लोबल कार्यक्रमात काम करणाऱ्या थॉमस नेट्टर आणि जेम्स डब्ल्यूने जागतिक एड्स दिवस साजरा करण्याचा विचार १९८७ मध्ये मांडला होता. त्यानंतर १९८८ सालापासून १ डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिवस साजरा करण्यात येतो. एड्स सारख्या महाभयंकर रोगाबद्दल आणि त्याच्या संक्रमणाबद्दल लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी हा दिवस पाळला जातो.  महाभयंकर रोग असलेल्या एड्स आणि एचआयव्ही संसर्गाबाबत मोठय़ा प्रमाणात जनजागृती करण्याची गरज आहे. यासाठीच १ डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स निर्मूलन दिन म्हणून पाळला जातो. गेल्या काही वर्षांपासून मोठय़ा प्रमाणात जनजागृती करण्यात आल्याने एचआयव्हीची लागण होण्याचे प्रमाण काही प्रमाणात कमी झाले आहे. तरीदेखील अद्याप धोका कमी झालेला नाही आहे. १९८६ साली भारतामध्ये चेन्नईच्या वेश्यावस्तीत पहिल्या एड्सच्या रुग्णाचं निदान झालं. पाठोपाठ अनेक मोठय़ा शहरातून एड्सच्या तपासण्यांची सुविधा होती अशा ठिकाणी  रुग्ण सापडू लागले आणि एड्स नावाचा भयंकर आजार देशात उत्पन्न झाल्याची बातमी सर्वत्र पसरली.

एचआयव्ही हा एक व्हायरस आहे. हा व्हायरस शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीवर हल्ला करुन त्या पेशी नष्ट करतो. यामुळे व्यक्तीचं शरीर सर्वसामान्य आजारांचाही सामना करु शकत नाही. तसेच जर योग्य वेळी एचआयव्हीवर उपचार घेतले नाहीत तर हा आजार आणखी गंभीर होत जातो आणि एड्सचं कारण ठरतो. एड्स हा असा आजार आहे, ज्यांच्यावर अद्याप कोणताही प्रभावी उपचार वैज्ञानिकांना सापडलेला नाही. यापासून बचाव करणं हा या आजारावरील एकमेव उपचार आहे. हा आजार ह्यूमन इम्युनो डेफिशियन्स व्हायरसच्या संसर्गामुळे होतो. एचआयव्ही इन्फेक्शन झाल्यानंतर सिंड्रोम बनतो. एचआयव्हीची लागण एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत होऊ शकते. परंतु, एड्स हा काही  संसर्गजन्य रोग नाही.

एचआयव्हीबाबत लोकांमध्ये अजूनही खूप गैरसमज आहेत. मच्छर चावल्याने, एचआयव्ही संसर्गीत व्यक्तीला स्पर्श केल्याने, एकत्र जेवल्याने, संसर्ग झालेल्या व्यक्तीशी बोलल्याने किंवा एकाच शौचालयाचा वापर अनेक लोकांनी केल्यामुळे एचआयव्ही होतो, असे एक ना अनेक गैरसमज लोकं बाळगून आहेत. एकीकडे असुरक्षित लैंगिक संबंध, दूषित रक्त संक्रमण, मातेकडून गर्भाला, नवजात शिशूला होणारे संक्रमण, ड्रग्स सेवन करणाऱ्या व्यक्ती या सर्व गोष्टींतून एचआयव्ही विषाणूंचा प्रसार आणि एड्सची लागण वाढत चाललेली दिसत आहे.

एड्स हा फक्त लैंगिक संबंध ठेवल्यानेच होतो असे नाही तर ज्याला हा रोग झालाय त्या व्यक्तीचं रक्त जर तुमच्या शरीरात गेलं तरी तो होऊ शकतो. किंवा त्या व्यक्तीला टोचलेली सुई जरी दुसऱ्याला टोचली गेली तरी हा रोग होऊ शकतो. एखाद्या व्यक्तीला इंजेक्शन देण्यासाठी वापरलेली सुई पुन्हा वापरु नये. सुरक्षित लैंगिक संबंध ठेवावे. तसेच एखाद्या व्यक्तीने शेविंग करण्यासाठी वापरलेलं ब्लेड पुन्हा वापरु नये. एचआयव्हीपासून बचाव करण्यासाठी जागरुकता अत्यंत आवश्यक आहे कारण यावर कोणताही प्रभावी उपचार अजून वैज्ञानिकांना सापडलेला नाही.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments