Friday, February 26, 2021
Home Maharashtra News मनसे आणि अ‍ॅमेझॉन वाद गंभीर वळण

मनसे आणि अ‍ॅमेझॉन वाद गंभीर वळण

मराठी भाषेवरून पुन्हा एकदा मनसे आणि अ‍ॅमेझॉन यांच्यात वाद पेटला आहे. अ‍ॅमेझॉनवर मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध व्हावा, यासाठी मनसेने सुरु केलेल्या मोहिमने आता आक्रमक स्वरुप धारण केले आहे. अ‍ॅमेझॉनने मनसे आमच्या कामात अडथळे आणत आहे, असा दावा करत अॅमेझॉनने दिंडोशी न्यायालयाचे दार ठोठावले. दिंडोशी कोर्टाकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्यानंतर कोर्टाने राज ठाकरे आणि मनसे सचिवांना आगामी वर्षात ५ जानेवारीला कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. परंतु आपण मराठीच्या भूमिकेवर ठाम राहणार असल्याचं मनसेने सांगितलं असून ॲमेझॉनची मस्ती लवकरच उतरवणार, असा इशारा मनसेने दिला आहे.

अ‍ॅमेझॉनवर मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध व्हावा,  यासाठी मनसेने मोहीम सुरु केली होती. अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट यांनी सात दिवसांत मराठी भाषेत अ‍ॅप सुरू करावे,  अन्यथा दिवाळी मनसे स्टाईलने होईल असा इशारा मनसे नेते अखिल चित्रे यांनी दिला होता. यासाठी त्यांनी कंपन्यांच्या कार्यालयात जाऊन भेटही दिली होती. याशिवाय ‘नो मराठी, नो अ‍ॅमेझॉन’  असा मजकूर लिहिलेले बॅनर वांद्रे पूर्व,  वांद्रे पश्चिम,  माहीम,  अंधेरी परिसरात लावण्यात आले होते. मराठी भाषेला आपल्या वेबसाइटवर स्थान द्यावे, अशी मागणी मनसेने ॲमेझोनकडे केली होती. तसे केल्याने मराठी लोकांना वेबसाइटवरून आवश्यक वस्तूंची योग्य निवड करणे सोपे होईल आणि ते हवी असलेली गोष्ट खरेदी करू शकतील, असे मनसेचे म्हणणे आहे. ज्याप्रमाणे या कंपन्यांनी दक्षिण भारतातल्या भाषांना प्राधान्य देऊन तिथे त्यांच्या भाषेत ॲप सुरू केले, तसेच महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर मराठीत ॲप आणावे, अन्यथा मनसे आपल्या स्टाईलने धडा शिकवेल,  असा इशारा देण्यात आला होता. मात्र,  ॲमेझोनकडून सकारात्मक उत्तर न मिळाल्याने मनसेने ॲमेझोनविरोधात मोहीम हाती घेतली. मनसे आणि ॲमेझोन यांच्यात सुरु असलेला ‘नो मराठी, नो अ‍ॅमेझॉन’ वाद आता चांगलाच चिघळला आहे. आता हा वाद कोर्टातही गेला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेला ॲमेझोननं कायदेशीर नोटीस बजवली आहे

मनसे कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांना मुंबईतील ॲमेझोन कार्यालयाच्या १०० मीटर परिसरात उपस्थित राहण्यास मज्जव करण्यात आला आहे. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पुढल्या ५ जानेवारीला त्यांची इच्छा असल्यास उपस्थित राहू शकतात,  असे दिंडोशी कोर्टानं बजावलेल्या नोटिस मध्ये म्हटले आहे. ॲमेझोनला सनदशीर मार्गाने आंदोलन केल्याचे समजत नसेल तर आता मनसे आपल्या स्टाईलने आंदोलन करेल, अशी प्रतिक्रिया मनसे कामगार सेनेचे अध्यक्ष मनोज चौहान यांनीही दिली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments