Monday, March 1, 2021
Home Maharashtra News भंडारा दुर्घटना अत्यंत दुर्दैवी घटना

भंडारा दुर्घटना अत्यंत दुर्दैवी घटना

भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात शिशु केअर युनिटला लागलेल्या आगीत नवजात अर्भकांच्या झालेल्या मृत्यूबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र दुःखद घटना म्हटले आहे. ही घटना कळताच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी संवाद साधून या संपूर्ण घटनेची तात्काळ चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारी घटना भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात घडली आहे. नवजात शिशु केअर युनिटमध्ये आग लागून दहा बालकांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. दरम्यान या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चौकशीचे आदेश दिले असून मृत बालकांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदत दिली जाणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

भंडारा जिल्ह्यातील सर्व सामान्य रुग्णालय हे गरिब आणि दुर्गम भागातून येणाऱ्या रुग्णांसाठी मोठा आधार आहे. त्यामुळे या रुग्णालयात सर्व प्रकारच्या उपचाराची व्यवस्था करण्यात आली. जन्मतःच एखाद्या नवजात बालकला काही अचानक त्रास झाला, वजन कमी असेल, बाळाची प्रकृती ठीक नसेल तर त्याला या अतिदक्षता नवजात केअर युनिटमध्ये ठेवण्यात येते. संसर्गाचा धोका टाळण्यासाठी हे यूनिट काचेने पूर्णपणे बंद असते. यातील तापमान हे बाळाच्या प्रकृतीनुसार नियंत्रित केले जाते. आणि या ठिकाणी हॉस्पिटलच्या डॉक्टर आणि परिचारिकां व्यतिरिक्त कुणालाही आत जाण्यास परवानगी नसते. तसेच प्रकृती नाजूक असल्यामुळे नवजात बाळांची विशेष काळजी घेतली जात आहे. सामान्य रुग्णालयाच्या या युनिटमध्ये मध्ये एकूण १७ नवजात बालके दाखल केली होती. शनिवारच्या मध्यरात्री जवळपास २ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. जिल्हा सामान्य रुग्णालयातील आऊट युनिटमधून धूर निघत असल्याचे समोर आले ड्युटीवर असलेल्या नर्सने दार उघडून पाहिले, तर त्या रूममध्ये मोठ्या प्रमाणात धूर होता. त्यामुळे त्यांनी लगेच दवाखान्यातील अधिकाऱ्यांना सांगितले. त्यानंतर तातडीने अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून दवाखान्यातील लोकांच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आले. मॉनिटरमध्ये असलेली सात बालके वाचवण्यात आली आहेत तर आउट युनिटमधील १० मुलांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे भंडाऱ्यात एकच खळबळ उडाली आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील शिशु केअर यूनिटला आग लागून झालेल्या दुर्घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील आगीच्या दुर्दैवी घटनेचे वृत्त समजून तीव्र दु:ख झाले. घटनेत प्राण गमावलेल्या निष्पाप बालकांच्या कुटुंबीयांना आपल्या शोकसंवेदना कळवतो, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक असून सरकारने याची गंभीर दखल घेतली आहे. संबंधित दुर्घटेनेस दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल तसेच अशा दुर्घटना पुन्हा होऊ नये यासाठी राज्यातील अन्य रुग्णालयातील शिशु केअर युनिटचे तातडीने ऑडिट करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments