Friday, February 26, 2021
Home Maharashtra News शरजील उस्मानीवर गुन्हा दाखल

शरजील उस्मानीवर गुन्हा दाखल

स्वारगेट पोलीस स्थानकाच्या हद्दीत गणेश कला क्रीडा रंगमंच या ठिकाणी शनिवारी एल्गार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं.  या परिषदेत वक्ता म्हणून शरजील याला आमंत्रित करण्यात आलं होतं. “आजचा हिंदू समाज सडलेला आहे, आता मुस्लिमांना मारण्यासाठी काही कारण नको, मुस्लीम आहात हे कारण पुरेसे आहे,” असं वक्तव्य शरजीलने आपल्या भाषणात केलं होतं. या वक्तव्यानंतर नवा वाद निर्माण झाला आहे. आता शरजीलच्या अटकेची मागणी भाजपाकडून करण्यात येत आहे.चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी शरजील उस्मानी याच्यावर पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपकडून सत्ताधारी ठाकरे सरकार आणि शिवसेनेच्या भूमिकेवर जोरदार टीकास्त्र सोडण्याचं सत्र सुरु असतानाच सदर प्रकरणी अत्यंत मोठी बातमी समोर आली आहे. ज्यामध्ये शरजीलविरोधात पुण्यातील स्वारगेट पोलिस स्थानकात १५३अ कलमाअंतर्गत चिथावणीखोर वक्तव्य केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.

एल्गार परिषदेमध्ये आमंत्रित करण्यात आलेला २४ वर्षीय शरजील उस्मानी हा अलिगढ मुस्लिम विद्यापीठाचा विद्यार्थी नेता आहे. सीएए आणि एनआरसी या कायद्यांविरोधात केलेल्या आंदोलनासाठी तो ओळखला जातो.  १५  डिसेंबर २०१९ रोजी अलिगढ मुस्लिम विद्यापीठामध्ये सीएए-एनआरसी या कायद्यांच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनावेळी झालेल्या संघर्षामध्ये त्याचा सहभाग असल्याच्या आरोपांवरून त्याला उत्तर प्रदेश पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. सध्या तो जामीनावर बाहेर आहे.

शरजील उस्मानीनं हिंदुंच्या भावना दुखावणारं आणि भारतीय संघराज्याच्या विरोधात घृणास्पद अशा आशयाची वक्तव्य केली होती. तिथं भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी असणाऱ्या प्रदीप गावडे यांनी उस्मानीविरोधात तक्रार दिली होती. ज्यानंतर पुणे पोलिसांनी त्याच्याविरोधात प्रक्षोभक वक्तव्य केल्याबद्दल गुन्हा नोंदवला आहे.  या दोन्ही वक्तव्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. ज्यानंतर स्वारगेट पोलीसांनी याचा रितसर एफआयआर नोंदवण्यात आल्याचं सांगत अजामीनपात्र गुन्हा नोंदवला गेल्याची माहिती दिली.

हिंदू समाजाबद्दल केलेले अपमानकारक, आक्षेपार्ह आणि गंभीर वक्तव्य पाहता आणि त्यावर राज्य सरकारतर्फे तातडीने आणि कठोरातील कठोर कारवाईच्या प्रतिक्षेत असणाऱ्या भाजपच्या वतीनं देवेंद्र फडणवीस यांनी शरजीलवरील कारवाईची मागणी करण्यासंदर्भातील पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिलं. एक युवक राज्यात येतो, छातीठोकपणे हिंदुत्त्वावर शिंतोडे उडवितो आणि डोक्यावर मिरे वाटून निघून जातो आणि त्यावर काहीही कारवाई होत नाही, हा प्रकार अतिशय आश्चर्यजनक आहे,’ असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. हे पत्र मिळताच त्याच्यावर गुन्हा दाखल करून, शरजीलच्या मुसक्या आवळत महाराष्ट्रात आणून, अशा विधानांचे परिणाम काय असतात, यासंदर्भात कायदेशीर कारवाई करून त्याला अद्दल घडवाल, असंही त्यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून म्हटलं होतं.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments