आज महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात दररोज शुद्ध आणि आरोग्यदायी दूध पोहोचतं. जवळपास आठ दशकांहून अधिक काळ दर्जेदार दुधाचा पुरवठा चितळे महाराष्ट्राला करत असून, छोट्या व्यवसायाचा आज चितळे दुधाच्या रुपानं एक मोठा उद्योग होण्याचा प्रवास नक्कीच प्रेरणादायी आहे.
सांगली जिल्ह्यातील भिलवडी या गावात भास्कर गणेश चितळे यांनी १९३९ मध्ये दुधाचा व्यवसाय सुरू केला. सांगली जिल्ह्यात चितळे दुधाच्या रुपात एका अर्थानं महाराष्ट्रातील दुग्ध क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली. कृष्णा नदीमुळे बारमाही पाण्याची उपलब्धता आणि आजूबाजूला असलेल्या सुपीक जमिनीमुळे भिलवडी हे गाव शेती आणि डेअरी व्यवसायासाठी चांगले असेल असा त्यांचा अंदाज होता. महत्त्वाचं म्हणजे त्या काळी असलेली ब्रिटिश रेल्वे भिलवडीपर्यंत पोहोचलेली होती आणि रेल्वे मुंबईशी जोडलेली होती. त्यामुळे भिलवडीतल्या दुधाचा थेट मुंबई बाजारपेठ मिळू शकणार होती. त्यामुळे व्यवसायासाठीच्या सगळ्या शक्यता विचारात घेऊन त्यांनी भिलवडीत दूध व्यवसाय सुरू केला.
भिलवडीमध्ये दूधासह काही दुग्धजन्य उत्पादनं तयार व्हायची आणि मुंबईतल्या विक्रेत्यांकडे जायची. पण मुंबईत कशा पद्धतीने दुधाचा व्यवसाय होतो हे चितळेंना अंदाज येत नव्हता. त्या काळी मुंबईत असलेले काही ब्रँड चितळेंचं दूध त्यांच्या नावाने विकत असल्याचं चितळेंच्या कानावर आलं. त्यामुळे चितळेंनी सुरतमध्ये कामाला असलेल्या आपल्या मुलाला, भाऊसाहेब चितळे यांना मुंबईत येऊन राहायला आणि दुधाचा व्यवसाय पाहायला सांगितलं. त्यानुसार मुंबईत दोन वर्ष व्यवसाय केल्यावर त्यांच्या लक्षात आलं की मुंबई हे स्थलांतर करणाऱ्यांचं गाव आहे. मुंबईत रोज दूध घेणारे ग्राहक मिळणं कठीण आहे आणि दुधाच्या व्यवसायात नफा मिळवायचा असल्यास रोजच्या रोज दूध घेणारा ग्राहक हवा. त्यामुळे त्यांनी मुंबई सोडून पुण्यात व्यवसाय करायचं ठरवले. सुरुवातीला पुण्यातही अन्य विक्रेत्यांना उत्पादनं पुरवली जात होती. मात्र काही काळातच त्यांनी आपल्या नावाने ग्राहकांना उत्पादनं पुरवण्याचा निर्णय घेतला आणि चितळे या ब्रँन्डनेमची उत्पत्ती झाली. या दुधावर आणि दुग्धजन्य उत्पादनांवर कशा पद्धतीने प्रक्रिया करायची हे प्रोफेशनल ज्ञान घेण्याचं नानासाहेब चितळे यांनी ठरवलं. आपल्या वडिलांबरोबर आणि भावांबरोबर काही वर्षे काम केल्यानंतर डेअरी तंत्रज्ञानातील शिक्षण घेण्यासाठी त्यांनी बेंगळुरूमधून डेअरी टेक्नॉलॉजीची पदविका संपादन केली.
आजच्या घडीला भिलवडी आणि शंभर किलोमीटरच्या परिसरातील दीड लाखांहून अधिक शेतकरी चितळे समूहाशी जोडले गेले आहेत. त्या काळी जोडल्या गेलेल्या काही शेतकरी, दूध पुरवठादारांपैकी काही आता स्वतः उद्योजकही बनले आहेत. पुणे, मुंबई, सांगली, कोल्हापूर, कोकण या भागांमध्ये चितळे दूध पोहोचलं. त्याशिवाय श्रीखंडासारखी काही दुग्धजन्य उत्पादनं महाराष्ट्रभर आणि सिंगापूर, दुबई, दक्षिण आशियातील काही देशांमध्ये वितरित होतात. रोज वितरित होणाऱ्या दुधामध्ये पिशवी दूधाचा वाटा सर्वात मोठा आहे. दररोज जवळपास ५ लाख ५० हजार लीटर दूध संकलित होतं. आज २०२१ मध्ये चितळे या ब्रँडचा वटवृक्ष अनुक्रमे चितळे डेअरी, चितळे बंधू मिठाईवाले, चितळे फूड्स आणि चितळे अॅग्रो या विविध क्षेत्रांमध्ये नावारुपाला आला आहे. या वटवृक्षाची धुरा चितळे कुटुबांच्या तिसऱ्या पिढीतील माधवराव चितळे, श्रीकृष्ण चितळे, श्रीपाद चितळे, संजय चितळे, विश्वास चितळे, अनंतराव चितळे, गिरीश चितळे, मकरंद चितळे आणि चौथ्या पिढीतील केदार चितळे, इंद्रनील चितळे, निखिल चितळे, अतुल चितळे, रोहन चितळे, पुष्कर चितळे सांभाळत आहेत.