Monday, March 1, 2021
Home Maharashtra News राज्य सरकारने काढले नवीन परिपत्रक

राज्य सरकारने काढले नवीन परिपत्रक

राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने काढलेल्या परिपत्रकानुसार सरकारी कर्मचाऱ्यांना भडक रंगाचे, रंगीबेरंगी कपडे घालता येणार नाहीत. सरकारी कर्मचाऱ्यांना आता जीन्स, टी शर्टही घालता येणार नाही. महिला कर्मचाऱ्यांनाही ड्रेसकोड ठरवून देण्यात आला आहे. महिलांना कार्यालयात साडी, कुर्ता, सलवार, चुडीदार, दुपट्टा अशाच प्रकारचे कपडे घालणं बंधनकारक करण्यात आले आहे. त्याचबरोबर प्रत्येक शुक्रवारी सर्व कर्मचाऱ्यांनी खादीचे कपडे घालावेत, असंही नव्या नियमांत सांगण्यात आलंय.

राज्य सरकारने नवीन वर्षात कर्मचाऱ्यांना ड्रेस कोडपासून ऑफिसच्या वेळेपर्यंत शिस्त लावण्याचा निर्णय घेतला आहे. आता मंत्रालयाच्या कॉरिडॉरमध्ये कोणत्याही वेळेत चहा पिताना चकाट्या पिटणाऱ्या कर्मचाऱ्यांवरही बंधने लादण्यात आली आहेत. अधिकारी, कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी मंत्रालयाच्या इमारतीमधील कॉरिडॉरमधील चहा विक्री बंद करण्याचा निर्णय राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने घेतलाय.

मंत्रालयाची मुख्य इमारत, विस्तारित इमारतींमध्ये काम करणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांना कँटीनमार्फत चहा पुरवला जातो. मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांसाठी कॉरिडॉरमध्ये चहाची विक्री होते. राज्याच्या कानाकोपऱ्यातून मंत्रालयात व्हिजिटर्स वेगवेगळ्या सरकारी कामांसाठी येतात. अनेकदा चहा पिण्यासाठी कॉरिडॉरमध्ये गर्दी होते. कोणत्याही वेळेत चहा पिण्यासाठी झुंबड उडालेली असते. त्यामुळे कार्यालयातील शिस्त बिघडल्याचे चित्र निर्माण होते. त्यामुळे कॉरिडॉरमध्ये चहाची विक्री न करता सहाव्या, तिसऱ्या मजल्यावरून कँटीनमधील कर्मचारी ट्रेमधून चहा पुरवतील. सकाळी साडेनऊ ते साडेदहा आणि दुपारी तीन ते चार या वेळेतच चहा पुरवण्यात येणार आहे.

मंत्रालयातून अख्ख्या राज्य सरकारचा कारभार चालविण्यात येतो. लोकप्रतिनीधी, सर्वसामान्य नागरिक, अधिकारी हे त्यांच्या कामासाठी कार्यालयाला भेट देतात. अशा वेळी राज्य शासनाचे प्रतिनिधी म्हणून सरकारी कार्यालयातील अधिकारी, कर्माचारी हे कोणत्याही वेळी चहा पितांना आढळतात. ही गोष्ट कार्यालयीन शिस्तभंग करणारी आहे. यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांची जनमानसातील प्रतिमा मलिन होताना दिसते. म्हणून शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना यापुढे कॉरिडोरमध्ये चहा उपलब्ध करून देण्याऐवजी ट्रे सर्विस द्वारे चहा पुरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व राज्य शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा कार्यालयातील दैनंदिन पेहराव कशा पद्धतीने असावा, या विषयी मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. सरकारी कार्यालयात कोणते आणि कसे कपडे घालावेत याबाबत निर्देश राज्य सरकारने जाहीर केले होते. शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची वेशभूषा अशोभनीय, गबाळी आणि अस्वच्छ असल्यास त्याचा अप्रत्यक्ष परिणाम त्याच्या एकंदर कामकाजावर होतो. परिणामी जनमानसातील प्रतिमाही मलिन होते, असा निष्कर्ष काढत राज्य सरकारने तीन आठवड्यांपूर्वी आपल्या सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी ड्रेस कोड निश्चित केला होता. महत्त्वाचं म्हणजे कार्यालयात जीन्स आणि टी-शर्ट असा पेहराव करुन येण्यास आणि स्लिपर्स घालण्यास मनाई करण्यात आली आहे. आता त्यानंतर मंत्रालयातील कर्मचारी, अधिकाऱ्यांना शिस्तीचे धडे देण्यासाठी आता राज्य सरकारनं कर्मचाऱ्यांनी कॉरिडोरमध्ये चहा पिऊ नये असं नवं परिपत्रक काढले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments