Friday, February 26, 2021
Home Maharashtra News तिरा कामतच्या १६ कोटी किंमतीच्या इंजेक्शनला ग्रीन सिग्नल

तिरा कामतच्या १६ कोटी किंमतीच्या इंजेक्शनला ग्रीन सिग्नल

अवघ्या ५ महिन्यांच्या तिरा  कामत या चिमुकलीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. तिरा ला अत्यंत दुर्धर आजारानं ग्रासलं आहे. मुंबईतील रुग्णालयात तिरा  कामतवर उपचार सुरू आहेत. तिरा  एसएमए टाइप-१ आजाराशी झुंज देत आहे. तज्ज्ञांच्या मते या आजारामुळे मुलीचे आयुष्य केवळ १८ महिन्यांपर्यंतचं असू शकते. या चिमुकलीला वाचवण्यासाठी अमेरिकेतील हे इंजेक्शन अत्यंत महत्त्वाचं आहे. हे इंजेक्शन लवकरात लवकर उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. त्यासाठी आता केंद्र सरकारकडून देखील कामत कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला आहे. या आजारावर जे इंजेक्शन आवश्यक आहेत. ते उपलब्ध करण्यासाठी १६ कोटींची आवश्यकता होती. कामत कुटुंबियांना लोकसहभागातून १६ कोटी रुपयांची मदत मिळाली. पण त्यातही एक अडचण उभी राहिली. अमेरिकेतून औषध मागवायचं असल्यानं त्यावर कर लागत होता. ६ कोटी रुपयांचा कर लागत असल्यानं हा कर माफ करावा यासाठी कामत कुटुंबीय आणि काही कलाकारांनी देखील प्रयत्न केले. अमेरिकेतून आयात करायच्या औषधांवर सहा कोटी कर रकमेची तजवीज कशी करावी, अशी भ्रांत असतानाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेल्या पत्राची पंतप्रधानांनी तत्काळ दखल घेत पूर्ण करमाफी दिली.

नेमका कशा प्रकारचा आजार आहे हा? पाहूया थोडक्यात. कोणत्याही व्यक्तीच्या शरीरात स्नायू जिवंत ठेवण्यासाठी एका विशेष जीन्सची आवश्यकता असते. या जनुकांमार्फत प्रोटीन तयार केले जाते, ज्यामुळे स्नायू जिवंत राहू शकतात. मात्र हे जीन्स तिरा च्या शरीरातचं नाही. ज्या मुलांना एसएमएचा आजार आहे, त्यांच्या मेंदूतील नर्व सेल्स आणि पाठीचा कणा काम करू शकत नाही. तर अशा परिस्थितीत मेंदूपर्यंत संदेश पोहोचत नाही. अशी मुले मदतीशिवाय चालू फिरूही शकत नाहीत. हळूहळू अशा मुलांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागतो. आणि मग त्यातच त्यांचा मृत्यू ओढवतो. तज्ज्ञांच्या मते, हा आजार जेनेटीक डिसिज म्हणजे, जनुकीय बदलांमुळे होणारा आजार आहे. शरीराचे स्नायू अत्यंत कमकूवत होतात. पहिल्यांदा हात, पाय आणि त्यानंतर फुफ्फुसांच्या स्नायूंची शक्ती कमी होते. रुग्ण रेस्पिरेटरी पॅरलेसिसमध्ये जातो. तसेच हा आजार दिवसेंदिवस वाढत जाणारा आहे. दरम्यान, यातून ती वाचू शकते मात्र यासाठी तिला तब्बल १६ कोटींच्या इंजेक्शनची गरज आहे. पालकांनी क्राऊडफंडिंगच्या माध्यमातून पैसे गोळा केले आहेत.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्र लिहिल्यानंतर त्याची दखल घेत पंतप्रधान मोदींनी तिरासाठी आवश्यक असलेल्या इंजेक्शनवरील कर माफ केला आहे. त्यामुळे तिराला आता हे इंजेक्शन लवकरात लवकर उपलब्ध होऊ शकेल.पंतप्रधानांनी अतिशय संवदेनशीलतेने पुढाकार घेत त्वरेने कारवाई केल्यामुळे निश्चितपणे तिरा कामत हिचे प्राण वाचतील,  असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे तसेच या त्वरित कारवाईबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार सुद्धा मानले आहेत. तिरा कामत हिला उत्तम निरोगी आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, अशा शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments