Monday, March 1, 2021
Home Maharashtra News हिंदुहृदयसम्राट

हिंदुहृदयसम्राट

मराठी माणसाच्या हितरक्षणासाठी आणि हिंदुत्वाच्या प्रसारासाठी गेली ४६ वर्षे आपल्या कर्तृत्व आणि वक्तृत्वाची तलवार तळपती ठेवणारे तेजस्वी नेतृत्व आणि तमाम मराठी जनतेच्या मनात आदरणीय स्थान प्राप्त करणारे ‘हिंदुहृदयसम्राट’ शिवसेनाप्रमुख बाळ केशव ऊर्फ बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रात सत्ता असताना आणि सत्तेबाहेर असतानाही राज्याच्या राजकारणावर आपला रिमोट कंट्रोल कायम ठेवला. शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची आज ९५ वी जयंती साजरी होत आहे. आज बाळासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावर होणार आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या ९५ व्या जयंती निमित्त होणाऱ्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, मनसे प्रमुख राज ठाकरे आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे एकाच व्यासपिठावर उपस्थित राहणार आहेत.

balasaheb thackrey

राजकारणात छोट्या मनाचे अनेक नेते आपण पाहतो. पण, बाळासाहेबांचे मन राजासारखे होते.  व्यापक आणि दूरदृष्टी त्यांच्या ठायी होती. त्यामुळेच महाराष्ट्रात निष्ठावंतांची एक मोठी फौज ते उभे करू शकले. त्यांच्या विचारांचा आधार, केंद्रबिंदू हा राष्ट्रीयत्वाचा होता. सत्तेसाठी, पैशासाठी कोणतीही तडजोड करू नका, असे ते सातत्याने सांगत. सत्ताधीशांचीही भंबेरी उडविण्याची शक्ती ‘व्यंगचित्रकार बाळ ठाकरे’ यांच्या कुंचल्यात होती, तीच शक्ती ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे’ यांच्या लेखणीत आणि प्रखर वक्तृत्वातही होती. मराठी माणसाच्या मनात आपल्या मराठीपणाचा अभिमान रुजविण्याचा वसा त्यांनी शिवसेनेच्या स्थापनेपासून गेली तब्बल ४६ वर्षे अविरतपणे चालविला आणि पार पाडला.

अनेकांना बाळासाहेबांच्या क्रिकेट प्रेमाची फारशी माहिती नाही. खरंतर बाळासाहेब हे क्रिकेटचे फार मोठे चाहते होते व याचा उलगडा एका मुलाखतीत भारताचे माजी दिग्गज क्रिकेट खेळाडू दिलीप वेंगसरकर यांनी केला होता. बाळासाहेबांच्या क्रिकेट बद्दलच्या आठवणी सांगताना वेंगसरकर म्हणाले, “बाळासाहेबांबद्दल एक गोष्ट निश्चित होती की, आम्ही चांगली कामगिरी करो अथवा खराब, त्यांचा नेहमी फोन यायचाच. पराभवानंतर ते आपुलकीने विचारायचे की कशामुळे पराभव होतोय?, अथवा काही बदल करायला हवेत का?. कारण बाळासाहेबांना क्रिकेटची प्रचंड आवड होती व ते नेहमी क्रिकेट सामने बघायचे.” बाळासाहेबांच्या क्रिकेट प्रेमाची आठवण करून देताना वेंगसरकर यांनी एक घटना सांगितली होती. वेंगसरकर म्हणाले ,”मला आठवतं की १९९५ साली भारत विरुद्ध वेस्टइंडीजचा एक सामना झाला होता. मी या सामन्याचे आमंत्रण देण्यासाठी बाळासाहेबांकडे गेलो होतो. बाळासाहेबांनीही सामना बघायला होकार दिला,  पण ते म्हणाले की मी केवळ दहा मिनिटेच येऊ शकतो. कारण मी तिथे आल्यानंतर सिक्युरिटी व इतर यंत्रणेवर ताण पडेल. मात्र बाळासाहेब जेव्हा सामना बघण्यासाठी आले; तेव्हा त्यांनी शेवटपर्यंत सामना बघितला. कारण त्यांचे क्रिकेटवर फार प्रेम होते.”

बाळासाहेब ठाकरे

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट केलं आहे की, ‘हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे हे चैतन्यमूर्ती, तेजमूर्ती, स्वाभिमान आणि राष्ट्रीयत्त्वाचे मूर्तिमंत!’  तसेच ‘आमचे मार्गदर्शक, हिंदूत्त्वाचे जाज्वल्य शिवसेनाप्रमुख, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीदिनी कोटी कोटी अभिवादन !

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments