सोमवारी १४ डिसेंबरला सोमवती अमावस्या असल्याने सोमवती अमावस्येनिमित्त खंडोबाच्या दर्शनासाठी जेजुरी गडावर दरवर्षी भाविकांची मोठी गर्दी होते. यावर्षी देखील किमान अडीच ते तीन लाख भाविक जमण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळणे गरजेचे असल्याने यावर्षीची यात्रा रद्द करुन भाविकांना प्रवेश बंदी करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. यापूर्वी कोविड-१९ संकटामुळेच २० जुलै रोजी होणारी खंडोबाची सोमवती यात्रा रद्द करण्यात आली होती. सोमवती अमावस्या यात्रा रद्द केली असली तरी मंगळवार पासून सुरु होणाऱ्या चंपाषष्टी उत्सवानिमित्त भाविकांना खंडोबाचे मुखदर्शन घेता येणार आहे. पाच दिवसांच्या या उत्सवकाळात सर्व पूजा प्रथेप्रमाणे केल्या जातील. तसंच अन्नदानही केले जाईल.
कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता, कोरोनाची दुसरी लाट येण्याचा संकेत असताना कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून गेले ८ महिने शासनाने मंदिरे शासनाने बंद केली होती. ही बंदी काही महिन्यानंतर उठविण्यात आली. त्यामुळे राज्यातील अनेक मंदिरे खुली झाली आहेत. असे असले तरी यंदा जेजुरी गडावर ‘यळकोट यळकोट’चा, जयघोष होणार नाही. तसेच भाविकांना तीन दिवस प्रवेशबंदी केली आहे. याचे कारणही खास आहे. ते म्हणजे, भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आणि कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी कलम १४४ नुसार जमावबंदी आदेश लागू केला आहे. परंतु, कोरोना काळात नंतर शासनाने मंदिरे सुरू केली असली तरी त्यासाठी नियम, अटी, शर्ती घातल्या आहेत. जमावबंदी आदेशामुळे येत्या सोमवारीची सोमवती अमावास्या यात्रा आणि पालखी सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
या सोमवारी १४ डिसेंबर सोमवती अमावस्या असल्याने या पार्श्वभूमीवर पेशवे लॉज येथे ग्रामस्थ खांदेकरी, मानकरी, पुजारी, सेवेकरी, देवसंस्थान विश्वस्त मंडळ, नगरपालिका प्रशासन यांची संयुक्तिक बैठक पार पडली. या बैठकीत येत्या सोमवारी येणारी सोमवती अमावस्या यात्रा, मंगळवारपासून सुरू होणारा सहा दिवसांचा चंपाषष्टी उत्सव याबाबत चर्चा झाली. या चर्चेत सोमवती यात्रा रद्द करण्याचा तर, चंपाषष्टी षढरास्त्रोत्सव ही साधेपणात साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी प्रमुख वतनदार इनामदार राजेंद्र पेशवे, सचिन पेशवे, ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष गणेश आगलावे, सचिव छबन कुदळे, उपाध्यक्ष आबा राऊत, विरोधी पक्षनेते जयदीप बारभाई, माजी नगरसेवक हेमंत सोनवणे, माजी प्रमुख विश्वस्त सुधीर गोडसे, विश्वस्त शिवराज झगडे, संदीप जगताप, पंकज निकुडे, रोहिदास माळवदकर ,रामचंद्र माळवदकर ,पंडित हरपळे, माणिक पवार, अरुण खोमणे ,संजय खोमणेपाटील, बारा बलुतेदार संघाचे अध्यक्ष संतोष खोमणे, ग्रामस्थ कृष्णा कुदळे, जालिंदर खोमणे, दिलीप मोरे, रवींद्र बारभाई, रमेश बयास, अनिल बारभाई, दिलीप आगलावे, राहुल बयास, राजेंद्र चौधरी, मानकरी, सेवेकरी, पुजारी आदी उपस्थित होते. यापूर्वीही कोविड-१९ संकटामुळे अनेक सण, उत्सव, यात्रा रद्द करण्यात आल्या आहेत.भाविकांनी प्रशासनाच्या आदेशानुसार १२ ते १४ डिसेंबरच्या काळात जेजुरीमध्ये येणे टाळावे, असे इनामदार पेशवे यांनी आवाहन केले आहे.