कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता त्या पार्श्वभूमीवर लोकल बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ज्यानंतर कोरोना काळात कार्यरत असणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी शासनानं लोकल प्रवासाची मुभा दिली. त्या पुढच्याच टप्प्यात अत्यावश्यक विभागात आणखी काही उपविभाग करत यामध्येही अन्य कर्मचाऱ्यांसाठी लोकल प्रवासाचा मार्ग शासनानं खुला केला होता. मुंबई लोकल जवळपास २२ मार्च २०२० पासून बंद करण्यात आली होती. कोरोना संसर्गापासून बचावासाठी म्हणून संपूर्ण जगात आणि देशातही सावधगिरी बाळगण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. या घोषणेनंतर अनेक सेवा ठप्प झाल्या आणि जगण्याची परिभाषा बदलली. कधीही न थांबणारी आणि थकणारी मुंबई आणि मुंबई लोकलही काही महिन्यांसाठी बंद होऊन यार्डातच उभी राहिली. अखेर टप्प्याटप्प्यानं शासनानं लोकलच्या प्रवासास मुभा देत सर्वसामान्य नागरिकांसाठी लोकलसेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
कालांतराने नियमांमध्ये शिथिलता आणली जात असतानाच रेल्वे सेवा पूर्ववत आणण्यासाठी शासन प्रयत्नशील दिसलं. त्याच धर्तीवर आणि महिला वर्गाला प्राधान्य देत नवरात्रोत्सवाच्या दिवसांमध्ये वेळांच्या मर्यादांसह प्रशासनाकडून सरसकट सर्व महिलांच्या रेल्वे प्रवासाला परवानगी देण्यात आली. १ फेब्रुवारी पासून मुंबई लोकल सर्वांसाठी खुली करण्यात येणार असल्याचं, राज्य सरकारनं सांगितलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांसोबत इतर काही लोकांना मुंबई लोकलने प्रवास करण्याची परवानगी राज्य सरकारनं दिली होती. पण सर्वसामान्यांना मात्र परवानगी देण्यात आलेली नव्हती. आता मात्र गर्दी होणार नाही अशा वेळा आखून मुंबई लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी सर्वसामान्यांना देण्यात आली आहे. १ फेब्रुवारीपासून गर्दी होणार नाही अशा वेळा आखून सर्वसामान्य प्रवाशांसाठी उपनगरीय सेवा सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मुंबई लोकलमधून प्रवास करता येईल तसेच त्यांची होणारी गैरसोयही टळेल. याशिवाय मुंबई आणि उपनगरातील विविध कार्यालये आणि आस्थापना यांनी कामाच्या वेळांमध्ये सुधारणा करावी जेणे करून सर्वांना सोयीचं होईल, असं आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
विशिष्ट वेळेतच सर्वसामान्य नागरिकांना मुंबई लोकलने प्रवास करता येणार आहे. मुंबई लोकल सर्वांसाठी सुरु करण्यासंदर्भात नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा येथे बैठक झाली होती. यात वरिष्ठ रेल्वे अधिकारी देखील उपस्थित होते.