Sunday, February 28, 2021
Home Maharashtra News महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सामनामध्ये रोखठोक

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सामनामध्ये रोखठोक

तुमच्याकडे सूडचक्र आहे तर आमच्याकडे सुदर्शन चक्र आहे. आम्हीही हाथ धुवून मागे लागू शकतो, असं मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकारच्या एक वर्षपूर्ती निमित्त सामनाला मुलाखत दिली. शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. संपूर्ण देशात केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत आहे. आपण त्यामुळं सीबीआयला वेसण घातली. दुरुपयोग व्हायला लागल्यावर अशी वेसण घालावीच लागते. ईडी, सीबीआय वर राज्याचा अधिकार नाही का? आम्ही नावं देतो, आमच्याकडे नावं आहेत. मसाला तयार आहे. पण सुडाने जायचं का ? मग जनतेने आपल्या कडून काय अपेक्षा ठेवायच्या. सुडानेच वागायचं असेल तर तुम्ही एक सूड काढा आम्ही दहा सूड काढू, असा ठोस इशारा उद्धव ठाकरेंनी दिला.

Video Courtesy : Samana

मला जेव्हा आव्हान मिळतं तेव्हा मला काम करायला जास्त स्फूर्ती येते. महाराष्ट्राच्या मातीत एक चमत्कार आहे, तेज आहे. जेव्हा संकटं आली, विविध आपत्त्या आल्या, भलेभले अंगावर धावून आले पण काय झाले? महाराष्ट्राच्या वाटेला कुणी जाईल, कुणी डिवचेल तर काय होतं याचे दाखले इतिहास जमा आहेत. भविष्यात पाहायचे असतील तर तेदेखील पाहायला मिळतील. अशी संकटं अंगावर घेऊन ती पचवून त्यांचा खात्मा करत महाराष्ट्र पुढं जात राहिला आहे. महाराष्ट्र कधी थांबला नाही, कधी थांबणार नाही. कुणी कितीही आडवे आले तरी आडवे येणाऱ्यांना जागेवर आडवं करुन महाराष्ट्र पुढं जाईल, असे पुढे उद्धव ठाकरे म्हणाले. यापुढे ते म्हणाले कि, तुम्ही सूडचक्र करणार असाल तर सूडचक्रात आम्हाला जायची इच्छा नाही. पण तुम्ही तशी वेळ आणलीत तर तुम्ही आम्हाला हिंदुत्ववादी म्हणता ना मग ठीक आहे. तुमच्याकडे सूडचक्र आहे तर आमच्याकडे सुदर्शन चक्र आहे. आम्हीही हाथ धुवून मागे लागू शकतो, असं मुख्यमंत्री म्हणाले. राजकारण राजकारणासारखं करा. तुम्ही केवळ सत्तेचा दुरुपयोग करुन अंगावर येणार असाल तर सत्ता सदा सर्वकाळ कुणाकडे राहात नसते. जनता ही मोठी ताकद आहे आणि खरी सत्ता ती असते. ती आमच्यासोबत आहे, असं मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. तसेच ईडी वगैरेचा गैरवापर करुन दबाव आणत असाल तर याद राखा.

मुलाबाळांच्या मागे लागून विकृत आनंद मिळवणाऱ्यांनो तुम्हालाही कुटुंबं आहेत. मुलंबाळं आहेत हे विसरु नका. पण आमच्यावर संस्कार आहेत म्हणून संयम ठेवला आहे, असा इशाराही त्यांनी दिला. मी शांत आहे, संयमी आहे पण याचा अर्थ असा नाही होत कि मी नामर्द आहे. ज्या पद्धतीने आमच्या लोकांच्या कुटुंबियांवर हल्ले सुरु झाले आहेत ही पद्धत निदान महाराष्ट्राची तरी नाही. हिंदुत्ववादी म्हटल्यावर एक संस्कृती आहे आणि तुम्ही कुटुंबियांवर येणार असाल, मुलाबाळांवर येणार असाल तर आमच्या अंगावर येणाऱ्यांना ज्यांना कुटुंबं आणि मुलंबाळं आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की तुम्हालाही कुटुंबं आणि मुलंबाळं आहेत. तुम्ही धुतले तांदूळ नाहीत. तुमची खिचडी कशी शिजवायची ती आम्ही शिजवू शकतो, असा मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना टोला लगावला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments